‘लोकसत्ता’मधील डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांचा लेख वाचनात आला. ‘मुस्लिमांचे आधुनिकीकरण आणि भारतीयीकरण जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच हिंदूंचेही भारतीयीकरण झाले पाहिजे,’ या हमीद दलवाईंच्या मताची आणि ‘हिंदूंनाही हमीद दलवाईंची गरज आहे,’ या अटलबिहारी वाजपेयी यांनी दलवाई यांच्या निधानानंतर दिलेल्या शोकसंदेशातील विधानाची डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी आठवण काढलेली दिसते.
आज पूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी मुस्लीम समाजात अनेक हमीद दलवाई निर्माण होण्याची हिंदू समाजाला आत्यंतिक गरज आहे. ग्रंथप्रामाण्य किंवा ग्रंथआदेश यांना महत्त्व न देता, कालसुसंगत इहवादी आणि विवेकाने विचार करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहेच. हिंदू धर्मातील उदारमतवादाने हिंदूंना संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले. हिंदू धर्माने केवळ उपासना सांगितली नाही, तर जगण्याचा मार्ग सांगितला आणि त्यामध्ये स्थळ-काळ-परिस्थिती अनुरूप परिवर्तन होत गेले. इथे वेळोवेळी विद्वतजनांनी विविध दर्शने, विविध मते मांडली आणि समाजव्यवस्था त्यावर विकसित होत गेली. निर्गुण निराकार वेदकाळाला सामान्यांसाठी पुराणकथांनी जोडले. रामायण, महाभारत आदि काव्ये ही जीवनमूल्ये सांगणारी होती. हिंदूंचा एक असा ग्रंथ नाही, तर विविध स्मृतींमधून, शास्त्रांमधून जगण्याची तर्कशुद्ध पद्धत आणि नियम सांगण्यात आले.
एकातून दुसरा विचार निर्माण होताना तो वादविवाद, चर्चा याद्वारे होत गेला. एकमेकांचे विचार आत्मसात केले गेले आणि समाजासाठी त्या त्या परिस्थितीत जे जे उत्तम ते वेचले गेले. इथे हजारो साधू-संतांनी समाजाच्या एकोप्यासाठी समता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, करुणा ही मूल्य आपापल्या साहित्यातून रुजवली. पूर्ण ऐहिक विचार करणारे गौतम बुद्ध भारतातच जन्मास आले. इथेच महावीर, गुरुनानक, संत बसवेश्वर अशा अनेकांनी समाजाच्या त्या काळातील प्रश्नांना उत्तरे दिली. बहुसंख्य समाजाने त्यांना स्वीकारले, त्यांना पाखंडी मानले नाही. एका अर्थाने हिंदू युग हे अव्याहत प्रबोधनपर्वच आहे. कारण, सुधारणावादी विचार हाच हिंदू मार्ग आहे. इस्लामी आक्रमणांनंतर धर्माचे चाक फिरते ठेवण्यात असंख्य अडचणी येत गेल्या. मात्र, ब्रिटीशकाळात आधुनिक मूल्यांचा इथल्या समाजसुधारकांनी तत्काळ अंगीकार करून समाजाला त्यासाठी तयार केले. समाजानेही जलद गतीने सुधारणांना स्वीकारले. स्त्री-पुरुष समता, अस्पृश्यता निवारण, सतीबंदी, बहुविवाहबंदी, बालविवाहबंदी, स्त्रियांना मिळकतीत समान हक्क, घटस्फोटांचे हक्क हे बदल समाजाने तुलनेने लवकर स्वीकारले.
स्वातंत्र्यानंतर संविधानिक मूल्ये स्वीकारतानाही सुधारक नेत्यांमुळेच नाही, तर सुधारणावाद हिंदूंच्या नसांमध्ये असल्याने आज ७५ वर्षे संविधानाधारित भारत उत्तम वाटचाल करत आहे. या हजारो वर्षांच्या काळात प्रस्थापित विचारांहून वेगळा विचार मांडणारे आणि मूल्ये रुजवणारे ‘हमीद दलवाई’ हजारोंच्या संख्येने प्रत्येक काळात, प्रत्येक पायरीवर होते.मात्र, मुस्लीम समाजाला हे एकमेव नाव वगळता दुसरे नाव नाही. त्यामुळे हमीद दलवाईंनी धर्मचिकित्सा करून मानवतावादी आणि सेक्युलर भूमिकेने अनेक प्रश्नांची हाताळणी केली. समान नागरी कायद्यासाठी त्यांनी पंतप्रधानांपर्यंत निवेदने दिली, जागृती कार्यक्रम आखले. मुस्लीम महिलांचे प्रश्न, लोकसंख्या नियंत्रण, तोंडी तलाक, हलाला, बहुपत्नीत्व, मुस्लीम महिलांना मूल दत्तक घेण्यास आडकाठी या विषयांना वाचा फोडली. त्यांचे कार्य थोरच होते, पण त्यांना फार कमी अवधी मिळाला आणि आज त्यांच्यानंतर या प्रश्नांची काय अवस्था आहे? तिहेरी तलाक केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपाने बेकायदेशीर झाला. मात्र, समाजाने या मध्ययुगीन प्रथा सोडाव्या, यासाठी हमीद दलवाईंच्या आधी आणि नंतर कोणीही जन्मास आला नाही. मुस्लीम समाजातील या मानहानीकारक प्रथा संविधानिक मूल्यांच्या पूर्णतः विरुद्ध आहेत आणि आजच्या युगातही चालूच आहेत.
‘हमीद दलवाईंचे वैचारिक वारसदार’ म्हणवणार्यांनी आज त्यांनी मुस्लीम समाजासाठी सुरु केलेल्या कामांपैकी कोणती कामे पूर्ण झाली? त्यांची फलश्रुती काय? मुस्लीम समाजात परिवर्तन होण्यासाठी नक्की कोणत्या अडचणी आहेत? कोणत्या गोष्टींमुळे कालबाह्य विचार हा समाज सोडून द्यायला तयार नाही? आणि या परिवर्तनासाठी हमीद दलवाईंना अपेक्षित असलेली मुस्लीम समाजाने अंगीकारावी, अशी सेक्युलर विचारधारा किती आवश्यक आहे? अशा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक युगात प्रत्येक समाजाला इहवादी विचार करून प्रश्नांची उकल करणार्या हमीद दलवाईंची गरज असतेच! ती प्रत्येक दशकात, प्रत्येक वर्षातही असते आणि हिंदू समाजात ‘परंपरेने’ असे हजारो ‘दलवाई’ जन्म घेत असतात. मुस्लीम समाजाच्या कट्टरतेने प्रतिक्रिया म्हणून आज हिंदूंनाही सहिष्णुता, सर्वसमावेशकता आदी मूल्यांवर विचार करावा लागतोय. त्याने हिंदू समाजाची प्रवाहीपणाची वीण हळूहळू उसवतेय. मुस्लीम समाजातील जिहादी तत्त्वे, त्याने होणारी धर्मांतरे, सक्तीचे विवाह आणि धर्मांतरे, भारताच्या बाहेरील निष्ठा आणि फुटीरतावाद, राष्ट्रीयतेचा अभाव अशा गोष्टी हिंदूंना कट्टर होण्यास भाग पाडत आहेत. अशा वेळेस हिंदू समाजासाठी मुस्लीम समाजामध्ये अधिकाधिक ‘हमीद दलवाई’ निर्माण होणे अत्यावश्यक आहे.