वर्षभरापूर्वी दै.‘मुंबई तरुण भारत’तर्फे महाराष्ट्रातील नवउद्यमींची गाथा सांगणारी ‘स्टार्टअप फर्स्ट’ ही व्हिडिओ मालिका आणि लेखमालिका आम्ही प्रसिद्ध केली होती. त्यानिमित्ताने काही मोजक्या स्टार्टअप्सचा प्रवास मांडला होता. अशी ही ‘स्टार्टअप’ची संकल्पना २०१२-१३ पासून देशभरात रुजू झाली. मात्र, आजघडीला भारतात एकूण ९० हजारांवर ‘स्टार्टअप्स’ची नोंद असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याचाच केलेला हा उहापोह...
करोनानंतर जगावरील मंदीचे सावट, युक्रेन-रशियाचे गडद होत चाललेले युद्धाचे ढग, अमेरिकेवरील कर्जसंकट अशी चहूबाजूंनी निराशाजनक स्थिती असताना, भारतीय अर्थव्यवस्था वर्तमानात व भविष्यातही या सगळ्यातून तावूनसुलाखून निघेल, असे खुद्द ‘रिझर्व्ह बँके’च्या अहवालात म्हटले आहे. धोरणात्मक आणि ठोस निर्णय, वित्तीय क्षेत्राला मिळणारा ‘बूस्टर’ हे या यशाचे कारण ठरणार आहे. तसेच गेल्या नऊ वर्षांमध्ये कधी नव्हे, इतकी भारतीय ‘स्टार्टअप्स’ उद्योगाने देखील मोठी भरारी घेतली आहे. म्हणूनच अमेरिका आणि चीननंतर सर्वांत मोठ्या ‘स्टार्टअप्स’चा देश म्हणून भारताने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
भारतीय ‘स्टार्टअप्स’ने बुलेट ट्रेनचा वेग जणू धारण केलेला दिसतो. नवनिर्मिती, उद्योगविश्वाचा सकारात्मक दृष्टिकोन, गुंतवणूक आणि सरकारची पाठबळ देणारी धोरणे हीच यामागची प्रमुख कारणे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही गेल्या नऊ वर्षांत ‘स्टार्टअप्स’च्या संख्येत एकूण ३०० पटींनी वाढ झाल्याची माहिती नुकतीच एका कार्यक्रमात दिली होती. २०१४ मध्ये तर स्टार्टअप्सची संख्या केवळ ३५० इतकीच होती. आता ९० हजार ‘स्टार्टअप्स’सह १०२ ‘युनिकॉर्न’सह भारत जगात दुसर्या स्थानी पोहोचला आहे.
‘नॅसकॉमने’ही यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केला आहे. ‘नॅसकॉम’ अध्यक्षांच्या मते, जगावर मंदीचे ढग कायम आहेतच. मात्र, नवतंत्रज्ञानाची कास या कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. भारताने ऑगस्ट २०२२ मध्येच एकूण १०० ‘युनिकॉर्न’चा टप्पा गाठला आहे. भारतातील एकूण ‘युनिकॉर्न’च्या मूल्याचा विचार केला, तर ते २५ लाख कोटींच्या घरात आहे. ही निश्चितच भारतासाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एकूण ४४ कंपन्या गेल्या वर्षभरात ‘युनिकॉर्न’म्हणून उदयास आल्या. तसेच ज्या ‘स्टार्टअप्स’चे मूल्य शेअर बाजारात नोंदणीविना एक अब्ज डॉलर्स इतके होते, अशा कंपन्यांना ‘युनिकॉर्न’ म्हणून संबोधले जाते. गेल्या तीन महिन्यांतच सुमारे १४ स्टार्टअप्स ‘युनिकॉर्न’ म्हणून उदयास आले आहेत.
प्रमुख शहरी भागांतच नव्हे, तर ग्रामीण भागात पोहोचलेल्या सुविधांचे पायाभूत जाळे आणि तंत्रज्ञान याचा एकत्रित परिणाम नव्या उद्यमींसाठी फायदेशीर ठरला. नवनिर्मितीचा ध्यास आजच्या या तरुणाईकडे आहे, शिवाय जोखीम घेण्याची धमकही आहे. तसेच नवतंत्रज्ञान भारतीय तरुण उद्योजकांनी लवकर आत्मसातही केले. महत्त्वाचे म्हणजे, एकूण ‘स्टार्टअप्स’पैकी महिला संस्थापक किंवा सहसंस्थापकांची संख्या ही १८ टक्के इतकी आहे. एकूण ‘युनिकॉर्न’पैकी ३६ कंपन्यांमध्ये महिला या संस्थापकांच्या भूमिकेत आहेत. ही संख्या आणखी वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक महिला संस्थापक-सहसंस्थापकांना २० हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे,
हे फार कमी जणांना माहिती असेल. याबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आवाहन केले आहे. सरकार कॉर्पोरेटस कंपन्या, सरकार, शैक्षणिक संस्था आणि ‘स्टार्टअप्स’ यांच्यातील समन्वय योग्य असेल, तर देशातील जनतेच्या दैनंदिन समस्यांवर तोडगा काढणारे व्यवहार्य संशोधन सहज शक्य होईल. आता गरज आहे ती म्हणजे ‘स्टार्टअप्स’शी बड्या कॉर्पोरेट कंपन्यांसह सरकारी संस्थांनी भागीदारी करून त्यांना प्रोत्साहन देण्याची!
‘स्टार्टअप्स’कडे पाहण्याचा दृष्टिकोनही गेल्या काही काळापासून बदलत गेला. तरुणांना नव्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळत गेले. शिवाय, गुंतवणूकदारांनीही ‘स्टार्टअप्स’ या संकल्पनेवर विश्वास दर्शवला. भारतीय टेलिव्हिजनवर ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेला प्रोत्साहन देणारा ’शार्क टँक इंडिया’ हा कार्यक्रमही प्रचंड लोकप्रिय ठरला. मनोरंजनासह ‘स्टार्टअप्स’ आणि व्यावसायातील विविध संकल्पना सोप्या भाषेत समजवून सांगणारा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची ओळख बनली. अनेक ‘स्टार्टअप्स’ कंपन्या या मंचावर आल्या नाहीत.
मात्र, अनेक नवउद्यमींना या कार्यक्रमातून प्रेरणा नक्कीच मिळाली. अनेक तरुण आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करतात, हे पाहून प्रेक्षकांचे कधीकधी डोळेही पाणावले. नोकरी शोधणार्यांपेक्षा नोकरी देणारे तरुण पुढे आले. त्यांनी नव्या संकल्पना मांडल्या. नवीन संधी शोधल्या. ‘शार्क टँक इंडिया’ तर एक उदाहरण, अशा अनेक परिषदांमध्ये गुंतवणूक मिळवण्यासाठी विविध स्तरावरील लढाया यशस्वीरित्या लढल्या. सगळेच काही यशस्वी झाले नाही. काही अपयशाच्या कहाण्याही आहेत. पण, या सगळ्या प्रयत्नांतूनच भारतात ९० हजार ‘स्टार्टअप्स’ आणि १०२ ‘युनिकॉर्न्स’ कंपन्या उभ्या राहिल्या. मात्र, कित्येक तरुणांना या स्पर्धेत टिकून राहता आले नाही. पण, तरीही त्यांनी हार मानली नाही. पुन्हा नव्या जोमाने ते कामाला लागले.
भारत हा नव्या संधी शोधणार्यांचा देश असून आज सर्वाधिक लोकसंख्येचा आपला देश ही जगातील मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे नवनिर्मिती इथल्या मातीतच रुजलेली. भविष्यात येऊ घातलेल्या ’डिजिटल इंडिया अॅक्ट’नंतरही संधीची आणखी कवाडे खुली होणार आहेत. त्याचबरोबर भारतातील ‘स्टार्टअप्स’ मंदी किंवा आर्थिक नुकसानासाठी सुसज्ज आहेतच. शिवाय, गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या विश्वासालाही ते सार्थ ठरवत आहेत.
भारतीय ‘स्टार्टअप्स’ने ‘कोविड’ काळात तग धरून राहण्याचीही कला अवगत केली. या टाळेबंदीच्या काळात तावूनसुलाखून निघालेल्या या कंपन्या नव्याने आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. या अहवालानुसार, ‘स्टार्टअप्स’मध्ये तो आत्मविश्वास तर आहेच, शिवाय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुठल्याही वादळाला तोंड देण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, गुंतवणूक कमी असूनही जगातील तिसर्या क्रमांकाचे ‘टेक स्टार्टअप्स’ भारताकडे आहेत. एकूण २५ हजारांहून अधिक ‘टेक स्टार्टअप्स’ आज कार्यरत असल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे. सरकारचे पाठबळ आणि भविष्यातील संधींमुळे ‘स्टार्टअप्स’च्या या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता निश्चित आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.