नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ‘लव्ह जिहाद’ संदर्भात प्रश्न उपस्थित केला. ‘लव्ह जिहाद’ हा एक शब्द नाही, तर त्या शब्दापाठी एका मुलीची किंवा मुलाच्या, नव्हे नव्हे त्या ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात पसलेल्या मुलामुलीच्या कुटुंबाची वाताहत आणि देशोधडीला लागल्याचे करूण वास्तव आहे. मतांसाठी मुस्लीम मतदारांचे लांगुलचालन करणार्या स्वार्थी नेत्यांनी या दुर्देवी कुटुंबांच्या आकांताकडे आणि दु:खाकडे दुर्लक्ष केले, तरीसुद्धा जे सत्य आहे, ते लपणार नाही...
जेहन मे किसने जहर डाला
न जमी मिली, ना फलक मिला
जेहन मे किसने जहर डाला...
‘द केरला स्टोरी’मधील पीडितांचा झालेला सर्वनाश व्यक्त करणारे त्या सिनेमातील वेदनादायी गीत. पण, माझ्या मते, ‘जेहन मे किसने जहर डाला’ हे त्या फसलेल्या मुलींसाठी नाही, तर आपल्याच धर्मातील मुलीबाळींच्या आयुष्याचे धिंडवडे ‘लव्ह जिहाद’चा राक्षस काढत असताना, जे लोक म्हणतात की, ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही नाही, हे गीत त्यांच्यासाठीही आहे. त्यांच्या अंतरात्म्यात, (तो मेला आहे की जीवंत माहिती नाही) जेहनमध्येही हे ‘लव्ह जिहाद’चे सत्य न स्वीकारण्याचे जहर पार सामावलेले आहे. त्यामुळेच त्यांना न्याय आणि सत्याची जमीनही मिळत नाही आणि सदसद्विवेकबुद्धीचे आकाशही मिळत नाही. केवळ सत्तेच्या भुकेपोटी हे लोक आपल्या पदाचा आपल्या समाजाने दिलेल्या अस्तित्वाचा गैरवापर करून ठासून सांगताना दिसत आहेत की, ‘लव्ह जिहाद’ नसतो!
नुकतेच अजित पवार यांनीही ‘लव्ह जिहाद’ नसतो, या खोट्या समजुतीचे समर्थन केले. सुप्रिया सुळे किंवा आता अजित पवार यांना ‘लव्ह जिहाद’ नसतोच, असे म्हणावेसे का वाटत असेल? तर नुकतेच कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेस पक्षाचा मुस्लीम अनुनय आणि या समाजाचे अपवाद वगळता, शरिया कायदाप्रेम हे सगळ्यांना माहिती आहेच. त्यामुळे पवार कुटुंबीयांना वाटत असावे की, हिंदू समाजाची बहुसंख्य मते भाजपला मिळतात. त्यात विभागणी शक्य नाही. मात्र, कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसने मतं मिळवली, तशीच महाराष्ट्रात मुस्लिमांची एकगठ्ठा मतं मिळवायची, तर त्यांचा अनुनय करायलाच हवा.
काय चांगले, काय वाईट, या फंद्यात न पडता, ते जे काही बोलतील, त्याचे समर्थन करायला हवे. त्यामुळेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे तसेच त्यांच्या पक्षातले थातूरमातूर नेते मुस्लीम समाजाचा अनुनय करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ घडतच नाही, हे म्हणत असतात. अर्थात, सगळेच राजकारणी मतांसाठी वाट्टेल ते करतात, यालाही अपवाद आहेतच म्हणा! राज्याचे महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना रूपाली चंदनशिवे आणि श्रद्धा वालकर यांच्या हत्येनंतर ‘लव्ह जिहाद’विरोधात जी काही पाऊलं उचलली आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी समर्थ साथ दिली, ती जगजाहीर आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर खासगी संस्थेद्वारे सातवेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार प्राप्त असलेल्या सुप्रिया सुळे यांचा एक जुना व्हिडिओ आठवला. गेल्या आठवड्यात त्यांचा एक जुना व्हिडिओ समाजमाध्यमावर खूप चर्चेत होता. त्यात त्यांनी किरण कुलकर्णीची कथा सांगितली. किरण कुलकर्णी एक डॉक्टर मुलगी. बुरखा घातलेली आणि तिचा कुराणचा गाढा अभ्यास. ती पाचवेळचा नमाज पढते. ‘ ‘तिहेरी तलाक’विरोधी कायदा नको, माझा शोहर माझ्या मुलांचा बाप आहे. आमचे आम्ही पाहून घेऊ,’ असे म्हणत ही किरण कुलकर्णी म्हणे सुप्रिया सुळे यांना भेटली होती. तिची कथा सांगत सुप्रिया सुळे यांनी भरपूर टाळ्या मिळवल्या आणि याच व्हिडिओच्या जोरावर त्यांच्या पक्षाने मतंही मिळवली असतीलच. असो. त्यांच्या या व्हिडिओनंतर काही दिवसांतच त्या किरण कुलकर्णीच्या आयुष्याच्या मध्यंतरानंतरची कथा नव्हे, व्यथा सांगणारा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला.
त्यानुसार किरण कुलकर्णीबाबत सुप्रिया सुळे जे बोलल्या, ते खोटे नव्हतेच; पण किरण कुलकर्णी कोण? तिचे पुढे काय झाले तर? १९९६ साली संभाजीनगरमधील काँग्रेसचे पुढारी असलेले अगदी नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीची किरण मुलगी. त्याकाळीही ती आधुनिक पोशाखात वावरायची. आईवडिलांनी पाण्यासारखा पैसा ओतून तिला उत्तम शिक्षण दिले, डॉक्टर बनवले. ती सलीम चाऊस नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. तिचा निकाह झाला. मात्र, काही वर्षांतच सलीमचा तिच्यामधला ‘इंटरेस्ट’ संपला. कदाचित तिच्याकडून अपेक्षित धनलाभ उकळता आला नसेलही. काहीही असो, पण त्याने किरण पत्नी असतानाच दुसर्या मुस्लीम महिलेशी विवाह केला. किरणला आणि तिला दोघांनाही मुलं आहेत. मात्र, किरण आणि किरणच्या मुलांना ‘काफीर’ म्हणून सतत छळले गेले. शेवटी किरणने सलीमला सोडले आणि ती कष्ट करून आपल्या मुलांना सांभाळत आहे.
नगराध्यक्ष आणि समाजात प्रतिष्ठा, आदर, इज्जत असलेल्या किरणच्या पित्याच्या हृदयाला काय वाटले असेल? सुप्रिया सुळे राजकीय मनोवृत्तीने तावून-सुलाखून निघाल्या आहेत. त्यामुळे त्या म्हणतील की, त्यानंतर मला किरण भेटली नाही, तर मी काय सांगणार? ती जेव्हा भेटली होती, तेव्हा जे तिने सांगितले तेच मी बोलले. पण, ‘ये जो पब्लिक हैं, वो सब जानती हैं...’ त्यामुळेच धर्मांतरण केलेल्या किरण कुलकर्णीचे जुन्या का असेना, पण त्या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना इतके कौतुक आहे पाहून, समाजात संतापाची लाट उसळली. आता त्यांचे बंधुराज अजित पवार ‘लव्ह जिहाद’चे सत्य नाकारत आहेत. पवार कुटुंबीयांबद्दल काय म्हणावे? पण, ते ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाबद्दल तोंडातून साधा ‘ब्र’ उच्चारत नाहीत. वर त्या घटनांचे सत्य स्वीकारत नाहीत. याबद्दल खेद वाटतो.
नुकतेच मुंबईतील खिंडीपाडा- भांडूपमध्ये १३ वर्षांच्या मुलीला १९ वर्षांच्या सैफ खान याने फूस लावून आझमगडला पळवून नेले. सैफ तिला आझमगडला घेऊन गेला, हे त्याच्या घरातल्या सगळ्यांना माहिती होते. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. भांडूप पोलिसांनी त्या मुलीला परत आणले. १३ वर्षांची इयत्ता सहावीला शिकणारी मुलगी. पीडितेला आणि तिच्या पालकांना भेटले. अतिशय निरागस आणि काय घडतं आहे, हे कळण्याचंही वय नसलेली ती बालिका. भांबावलेली, अगदी शून्यातच गेलेली ती मुलगी. तिच्या आणि तिच्या आईच्या मते, ही मुलगी दिवसभर तर अशीच शांत, अगदी पुतळ्यासारखी बसते. संवेदनाहीन. मात्र, रात्र झाली की कमालीची भेदरते. तिला वाटते, कुणीतरी तिच्या जवळ येत आहे, कुणीतरी तिच्याजवळ उभे आहे. या बालिकेची मानसिकता आणि तिच्या पालकांचे दु:ख सांगू शकत नाही.
दुसरी घटना खेड-मंचरची. चार वर्षांपूर्वी दहावीला असलेल्या त्या मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. त्यावेळी तिच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण, जाऊ दे, पालकांनी त्यानंतर त्या मुलीचा विषयच सोडला. तिच्या पालकांनी तिचा विषय काय सहज सोडला असेल? त्यांच्या मनाला काय यातना झाल्या असतील! छे! शब्दच नाहीत व्यक्त करायला. त्यानंतर सध्या ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यानंतर पालकांची ती मोठ्या कष्टाने दडपलेली वेदना बाहेर आली. आपल्या मुलीसोबतही असेच बरेवाईट झाले असेल, या भीतीने या पालकांनी प्ाुन्हा मुलीचा शोध घेतला. तर काय चित्र समोर आले? त्या मुलीला सिगारेटचे चटके दिले गेले होते, तिचा अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. तिला ‘बीफ’ खाण्यासाठी आणि नमाज पढण्यासाठी बळजबरी करण्यात आली होती. पालकांनी हिमतीने तिला त्या नरकातून बाहेर आणले. या दोन घटना नुकत्याच घडलेल्या. या घटना सामान्य घरातल्या मुलींबरोबर घडल्या!
पण, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या स्व. शीला दीक्षित. त्यांच्या लेकीसोबत काय घडले? त्यांच्या लाडक्या लेकीनेही सय्यद मुहम्मद या व्यक्तीशी लग्न केले. पण, त्यानंतर या सय्यदने काय केले? त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी शीला दीक्षितांच्या लेकीने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली. या सय्यदने शीला यांच्या कन्येला त्रास दिला, पैशासांठी छळलेही. सगळ्या संपत्तीचा अपहार करत, हा सय्यद शीला यांच्या मुलीच्या भाचीसोबत पळून गेला. याबाबत वर्तमानपत्रांमध्ये नंतर सविस्तरही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आयुष्याच्या शेवटी शीला दीक्षित या सगळ्यामुळे खूप खचल्या असणारच! हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे आहे, असे कागदोपत्री कुणीही म्हंटले नाही, म्हणून काय ते प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे नाही का? केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या लेकीनेही पी. एम. मोहम्मद रियाझ याच्याशी लग्न केले. आता मोहम्मद रियाझ केरळ सरकारमध्ये मंत्री आहे आणि तोच पुढचा मुख्यमंत्री व्हावा, अशी पिनराई यांची इच्छा आहे.
पिनराई आपल्या लेकीपुढे हतबल आहेत आणि तिच्यासाठी ते काहीही करू शकतात, असे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे. हे सगळे काय आहे? ये प्यार नही षड्यंत्र हैं, असे म्हणणारे उगीच म्हणतात का? आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीची सदस्य म्हणून ‘लव्ह जिहाद’ पीडितांच्या पालकांना भेटताना वाटते, ‘हे परमेश्वरा, हे कोणते जग? एखाद्याच्या लेकीबाळीला बरबाद करणारे हे कोणते लोक आणि त्यांना तसे करायला भाग पाडणारा कोणता त्यांचा धर्म? यापेक्षाही दु:ख वाटते ते हे की, पुरोगामित्व आणि निधर्मीपणाच्या बुरख्याआड काही नेते मंडळी ‘लव्ह जिहाद’चे सत्य नाकारत आहेत.
अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांचे ते वाक्य तर कुप्रसिद्धच आहे की, “ ‘लव्ह’ माहिती आहे, पण ‘जिहाद’ माहिती नाही.” सुप्रिया सुळे काय, अजित पवार, शशी थरूर काय किंवा अबू आझमी काय किंवा ज्यांना कुणीही हिंदू समजत नाही, ते नावापुरता आव्हाड असणारे जितेंद्र, या सगळ्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसून आयुष्य बरबाद झालेल्या मुलींचे दु:ख समजत नाही. यांना जनतेचे अंतरंग, त्यांची वेदना कळत कशी नाही? त्यांना कळो ना कळो, पण हिंदू जनतेला कळले आहे की, आता सहन करायचे नाही. ‘द केरला स्टेारी’ सिनेमामध्ये शेवटी नायिकेला तुरूंगसदृश्य वास्तूत नेले जाते. तिथे तिच्यासारख्याच महिला-मुली असतात. त्या गीत गातात-
आमचे युद्ध अमर आहे,
जित आमचीच आहे
आम्ही आता सगळ्या सोबत आहोत...
मला वाटते की, हे गीत समस्त जागृत हिंदूंचे आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि सर्वच ‘जिहाद’विरोधात आमचे युद्ध अमर आहे. त्यात जित आमचीच आहे. कारण, आम्ही सगळे सोबत आलो आहोत!
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.