नवे संसद भवन : भारतीय संस्कृती आणि वारशाचे प्रतीक

    27-May-2023   
Total Views |
Inauguration of New Parliament House PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीय संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण करणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील एक ऐतिहासिक घटना म्हणून भारताच्या इतिहासात या घटनेचा उल्लेख होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळपासूनच सुरू होणार्‍या सोहळ्यामध्ये भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा-प्रथा आणि वारशाचे पालन करून नव्या भारताच्या आधुनिक संसदेस राष्ट्रास अर्पण करतील. यावेळी भारतीय राजनीती आणि राजकारणाचे प्रतीक असलेला पवित्र सेंगोलदेखील पुनर्स्थापित केला जाणार आहे. त्यानिमित्ताने या नूतन संसदेच्या वास्तूचे अंतरंग उलगडणारा हा लेख...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीचा विचार करता, त्यांनी अनेक प्रसंगी भारतीय संस्कृती आणि परंपरेची आधुनिकतेशी सांगड घातली आहे. त्याचप्रमाणे मनात कोणताही किंतू अथवा न्यूनगंड न ठेवता, भारतीय संस्कृती जगभरात प्रदर्शित केली आहे. मग अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असो, काशी विश्वनाथ कॉरिडोर, महाकाल लोक, केदारनाथ विकास प्रकल्पांचे लोकार्पण असो. या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांनी हिंदू- भारतीय संस्कृतीस सर्वोच्च महत्त्व दिले. त्याच धर्तीवर नव्या संसदेच्या राष्ट्रार्पणप्रसंगी वेदमंत्रांच्या घोषात पवित्र सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीकारणार आहेत.

राष्ट्रपती भवन, संसद भवन, पंतप्रधानांचे कार्यालय असलेले ‘साऊथ ब्लॉक’ आणि ‘नॉर्थ ब्लॉक’, त्यानंतर अन्य मंत्रालयांच्या इमारती यातून संपूर्ण देशाचा कारभार चालतो. त्यापैकी राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि साऊथ, नॉर्थ ब्लॉक यांना उभारुन आता बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे कालानुक्रमे त्यात बदल करणे, त्यांची डागडुजी करणे, सुधारणा करणे हे होतच असते. संसदेच्या सध्याच्या इमारतीचा विचार केल्यास १९२७ साली ती बांधून पूर्ण झाली. त्यानंतर आजतागायत जुजबी वगळता मोठे बदल त्यात करण्यात आलेले नाहीत. मात्र, आता त्यामध्ये बदल करणे गरजेचे होऊन बसले आहे. कारण, लोकसभा सभागृहाची स्थिती पाहिल्यास पहिल्या तीन रांगा वगळता मागच्या रांगांमध्ये खासदार अगदी दाटीवाटीने बसलेले असतात. त्याचप्रमाणे १९७१च्या जनगणनेवर आधारित परिसीमन केल्यापासून लोकसभेच्या जागांची संख्या ५४५ वर अपरिवर्तित राहिली आहे. तथापि, २०२६ नंतर त्यात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आकाराने मोठ्या सभागृहांची आवश्यकता होती. त्यामुळे भविष्याचा आढावा घेत संसदेत बदल गरजेचे होते.

त्यामुळे आता संसदेच्या सध्याच्या वास्तूजवळच नवी संसदेची भव्य वास्तू बांधण्यात आली आहे. त्रिकोणी आकाराच्या या वास्तूमध्ये लोकसभा आणि राज्यसभा, मंत्री आणि खासदारांची दालने, सचिवालय असणार आहे. नव्या वास्तूमधील लोकसभेचे सभागृह सध्याच्या सभागृहापेक्षा तीन पट, तर राज्यसभेचे सभागृह चारपट मोठे असेल. नवीन संसद भवनात लोकसभेचे ८८८ आणि राज्यसभेचे ३८४ सदस्य बसू शकतात, जर दोन्ही सभागृहे एकत्र जमली तर येथे एकावेळी १ हजार २८० खासदार बसू शकणार आहेत. नव्या संसद भवनास तीन नवीन प्रवेशद्वार आहेत. त्यांना ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ म्हणून ओळखले जाणार आहे. नवीन संसदेचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संविधान सभागृह, जे इमारतीच्या मध्यभागी आहे. त्याच्या वर अशोकस्तंभ आहे.

नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. सर्व खासदारांसाठी स्वतंत्र कार्यालय असेल, त्यांचे कार्यालय पेपरलेस कार्यालय बनवण्यासाठी नवीन डिजिटल इंटरफेसने सुसज्ज करण्यात आले आहे. नवीन इमारतीमध्ये एक भव्य संविधान सभागृह, संसद सदस्यांसाठी एक विश्रामगृह, ग्रंथालय, डायनिंग हॉल आणि पार्किंगची जागा देखील आहे. नव्या संसद भवनाचे आरेखन आरेखन अहमदाबाद येथील ‘एचसीपी डिझाईन स्टुडिओ’ने केले आहे, तर ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’ने अवग्या २१ महिन्यांत ही वास्तू बांधून पूर्ण केली आहे.

नव्या संसदेच्या बांधकामात देशभरातून योगदान

‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पातील विविध संरचनांचे बाह्य आणि आतील दोन्ही अस्तर विकसित करण्यासाठी राजस्थानच्या ढोलपूर जिल्ह्यातील सर्मथुरा येथील वालुकाश्म खडक आणि राजस्थानच्याच जैसलमेरच्या लाखा गावातून ग्रॅनाईटचा दगड वापरला केला आहे. विशेषतः सरकारी कार्यालये आणि संस्थांमध्ये मुख्य बांधकाम साहित्य म्हणून दगडाचा वापर संपूर्ण भारतभर प्रचलित आहे.
नवीन संसद भवन पारंपरिक आकृतिबंध आणि घटकांमध्ये मूळ असलेल्या अंतर्गत आणि बाह्य सजावट तयार करण्यासाठी लाकडाच्या संरचनेचा व्यापक वापर केला आहे. त्यासाठी नागपुरातून लाकूड आणून वास्तुशिल्प रचना मुंबईतील कारागिरांनी केली आहे. लाकडी रचनांमुळे नवीन संसद भवनाची भव्यता आणि वैभव वाढले आहे.

नवीन संसद भवनामध्ये उत्तर प्रदेशातील भदोही येथील हाताने विणलेले गालिचे आहेत. ‘नॉट-बाय-नॉट’ तंत्राद्वारे हे गालिचे विणले जातात. ’नॉट-बाय-नॉट’ कार्पेट बनवण्याची ही पारंपरिक आणि प्रसिद्ध कलाकुसर नवीन इमारतीच्या वैभवात भर घालणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे भदोहीच्या अद्वितीय हस्तकला तंत्रांना प्रोत्साहन मिळणार आहे, ज्यामुळे कारागिरांसाठी भविष्यातील उपजीविकेच्या संधी वाढतील. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पावर बांधकाम कामगार अत्यंत उत्साहाने काम करत आहेत. हे कर्मचारी राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग बनण्यास सक्षम असल्याचा अभिमान बाळगतात. हा संपूर्ण प्रकल्प देशाच्या सर्व भागांतील कुशल, अर्धकुशल तसेच अकुशल मजुरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे.

देशाच्या सत्ताकेंद्रास प्राप्त होतोय खास भारतीय चेहरा

रायसिना हिलवरची राष्ट्रपती भवनाची भव्य वास्तू. रायसिना हिल ते इंडिया गेट असा लांबलचक ‘सेंट्रल व्हिस्टा.’ तिथून बाहेर आल्यावर तेवढेच भव्य नार्थ आणि साऊथ ब्लॉक. त्यांच्या बाजूला असलेली संसदेची प्रशस्त आणि देदीप्यमान वास्तू. संसदेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषि भवन, शास्त्री भवन, परिवहन भवन या इमारती आणि सोबतीला देशाच्या राजधानीची धीरगंभीरता. गेली अनेक वर्षे देशाच्या सत्ताकेंद्राचे हेच चित्र राहिले आहे. मात्र, आता लवकरच हे चित्र बदलणार आहे. दीर्घकाळपासून देशाच्या सत्ताकेंद्राचा चेहरा असलेल्या आणि ‘ल्यूटन्स दिल्ली’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या परिसराला खास भारतीय चेहरा लाभण्यास प्रारंभ झाला आहे.

‘सेंट्रल व्हिस्टा’ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आतापर्यंत संसदेची नवी वास्तू, राजपथाचा पुनर्विकास करून त्याचे ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण आणि ‘इंडिया गेट’जवळील मेघडंबरीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थापना, हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आता राजपथाच्या दोन्ही बाजूला केंद्रीय सचिवालयाची निर्मिती आणि पंतप्रधान व उपराष्ट्रपती यांची नवी निवासस्थाने हे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. विशेष म्हणजे, या सर्व नव्या वास्तूंवर खास भारतीय झाक असल्याने आता देशाचे सत्ताकेंद्र असलेल्या या नवी दिल्लीस खास भारतीय चेहरा प्राप्त होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या तत्त्वाचाही यामध्ये समावेश आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.