भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध सन्मान आणि विश्वासाचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
सिडनी येथे भारतीय समुदायास केले संबोधित
23-May-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे परस्परांचे बळकट भागिदार आहेत. दोन्ही देशांचे संबंध हे सन्मान आणि विश्वासावर आधारित आहेत. त्याचप्रमाणे भारत संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो आणि संकटाच्या वेळी धावून जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सिडनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सिडनी येथे भारतीय समुदायास संबोधित केले. यावेळी भारतीय समुदाय हजारोंच्या संख्येने उपस्थित होता, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजदेखील उपस्थित होते.
भारताला आज ‘ग्लोबल गुड फोर्स’ म्हटले जाते. कारण जेथे जेथे आपत्ती येते, तेथे तेथे जि भारत मदतीला तत्पर असतो. नुकतेच तुर्कस्तानमध्ये भूकंपाने विध्वंस घडवून आणला, तेव्हा भारताने 'ऑपरेशन दोस्त'च्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला. भारताकडे शक्तीची कमतरता नाही, भारताकडे साधनांचीही कमतरता नाही. त्याचप्रमाण भारताकडे हुशार तरुणाईचीही कमतरता नाही. त्यामुळे करोनासारख्या भीषण जागतिक महामारीमधून भारत समर्थपणे उभा राहिला आहे. भारत संपूर्ण जगाला कुटुंब मानतो आणि त्यामुळेच जगाला मदत करण्यासाठी भारत नेहेमीच सज्ज असतो, असे पंतप्पधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत ऑस्ट्रेलिया संबंधांचा सर्वात मोठा आधार म्हणजे परस्पर विश्वास आणि परस्पर आदर हे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत – ऑस्ट्रेलियाचे संबंध केवळ राजनैतिक नाहीत तर परस्पर देशातील नागरिकही एकमेकांशी जोडले गेले आहेत. ऑस्ट्रेलियात राहणारा प्रत्येक भारतीय ही भारताची ताकद आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये भौगोलिक अंतर असले तरीही हिंदी महासागर दोघांना जोडतो. त्याचप्रमाणे योग, क्रिकेट, टेनिस, मास्टरशेफ, सण – उत्सवदेखील दोन्ही राष्ट्रांना आणि नागरिकांना जोडत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
उद्योग क्षेत्रातील धुरीणांशी चर्चा
ऑस्ट्रेलियातील आघाडीचे उद्योगपती आणि फोर्टेस्क्यू मेटल्स ग्रुप आणि फोर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. अँड्र्यू फॉरेस्ट यांची भेट घेतली. हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याच्या फोर्टेस्क्यू समूहाच्या योजनेचे पंतप्रधानांनी स्वागत केले. नवीकरणीय उर्जेसंदर्भातील भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर अधिक भर देत पंतप्रधान मोदी यांनी भारताने हाती घेतलेल्या हरित हायड्रोजन सारख्या परिवर्तनीय सुधारणा आणि उपक्रमांची विस्तृत माहिती दिली.
त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन सुपरचे मुख्य कार्यकारी पॉल श्रोडर यांच्यासोबतच्या भेटीत ऑस्ट्रेलियन सुपरला भारतासोबत काम करण्यासाठी आमंत्रित केले. तसेच कॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप, रॉय हिल, एस. किडमन या कंपन्यांच्या कार्यकारी अध्यक्ष जीना राइनहार्ट एओ यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेल्या परिवर्तनशील सुधारणा आणि उपक्रम अधोरेखित करत,त्याविषयीची माहिती त्यांना दिली. तसेच खाण आणि खनिज क्षेत्रातील तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्य विकासात भागीदार बनण्यासाठी आमंत्रितही केले.
पीएम मोदी इज द बॉस !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचे संबोधन ऐकण्यासाठी ऑस्ट्रेलियातील भारतीयांनी अलोट गर्दी केली होती. ते पाहून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीचदेखील भारावून गेले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे येथील उत्साह पाहून “पीएम मोदी इज द बॉस” असेच म्हणावे लागेल, असेही कौतुकोद्गार त्यांनी काढले."