पुणे : कोरोना महामारीच्या काळात बनावट कागदपत्रे, बनावट भागीदारी दस्त तयार करून जम्बो कोविड सेंटरचे कोट्यवधींचे कंत्राट मिळविणार्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीच्या चार संचालकांपैकी राजू नंदकुमार साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. साळुंखे हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे पार्टनर आहेत. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे.
डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध भादवि ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजीत पाटकर हे अद्याप फरार आहेत. याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे, (वय ४७) यांनी फिर्याद दिली होती. सुजित पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.
आरोपींनी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या भागीदारी कंपनीमार्फत पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनाचे कंत्राट मिळविले होते. निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता बनावट पार्टनरशिप डीड तयार करण्यात आले. ही निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची फसवणूक करण्यात आल्याचा ठपका एफआयआरमध्ये ठेवण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी १० एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करीत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या भागीदारी पत्रांमधील तफावत असल्याचे समोर आली होती. बनावट भागीदारी पत्र मुंबई महापालिका आणि पीएमआरडीए यांना सादर करण्यात आले होते. दोन्हीही भागीदारी पत्रांच्या कागदपत्रांमध्ये मोठी तफावत आहे. याप्रकरणी १९ एप्रिल २०२३ रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजू साळुंखे यांना अटक झाली आहे. आता संजय राऊत यांचे इतर ३ पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा यांना अटक होणं बाकी आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना बोगस कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते. या रुग्णालयात ३ रूग्णांचा मृत्यू झाला होता. मी हा घोटाळा बाहेर काढला होता. त्यानंतर पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले होते.
किरीट सोमय्या, माजी खासदार तथा भाजपा नेते