चैतन्यशील ‘चित्रकार’

    19-May-2023   
Total Views |
chetan

मूक व कर्णबधिर असला तरी कुंचल्याच्या फटकार्‍यांतून इतरांच्या चेतना जागवणारा चैतन्यशील चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर याच्याविषयी...

जन्मतःच मूक व कर्णबधिर असलेल्या चेतन पाशिलकर याचा जन्म रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा खेडेगावात झाला. चेतनचे प्राथमिक शिक्षण गावातच तर, माध्यमिक शिक्षण देवगड येथे झाले. चेतनचे वडील चंद्रकांत पाशिलकर हे रोहा येथील एका खासगी कंपनीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. चेतनची मोठी बहीण ‘एम.ए’ असून, ‘एम.एससी’ पूर्ण करून लहान भाऊ वडिलांच्या जागी कंपनीच्या नोकरीत रुजू आहे. अशा या छोटेखानी पण सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या चेतनने आपल्या दिव्यांगत्वावर लिलया मात करून यशाची पताका निरंतर फडकवत ठेवली आहे.

जन्मापासून श्रवणदोष असल्यामुळे चेतनचे सुरुवातीचे शिक्षण शारीरिकदृष्ट्या आव्हान असलेल्या शाळेमध्ये पूर्ण झाले. मात्र, कलेचा भोक्ता असलेल्या चेतनच्या अंगी असलेले गुण कुंचल्यातून उमटू लागले अन् चित्रकला हेच चेतनच्या भावनेचे माध्यम बनले, त्याचबरोबर सभोवतालच्या लोकांकडून चांगली दाद आणि प्रेरणा मिळाल्याने चेतनची चित्रकारिता हळूहळू बहरत गेली. शालेय शिक्षण सुरू असतानाच चित्रकलेसाठी त्याला सर्वच शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले. मग पुढील शिक्षण चित्रकलेलाच धरून पुणे इथे झाले. त्यानंतर ‘एसएससी’ आणि ‘जीडी आर्ट डिप्लोमा’, ‘बी.एफ.ए. पेंटिंग’ कला शाखा पुणे विद्यापीठातून पूर्ण केले.

पुढे शिक्षण चालू ठेवत ‘एमएफए’ चित्रकला पदवी प्रथम श्रेणीने ‘म’ मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. जे. जे. स्कुलमधूनच ‘फाईन आर्ट्स’मध्ये ‘मास्टर्स’ डिग्री मिळवली. त्याचदरम्यान चेतनने विविध स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून अनेक पदके आणि पुरस्कार पटकावले. शिक्षण घेताना आलेल्या आव्हानांना चेतन धैर्याने तोंड देत आला आहे. आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून चित्रकला कशी जोपासता येईल, हे त्याने पाहिले. शिकत असतानाच चित्रकलेसाठी चेतनला तब्बल १०५ हून अधिक पुरस्कार मिळाले. शारीरिकदृष्ट्या असलेल्या आव्हानांना जिद्दीने व चिकाटीने तोंड देत चित्रकलेच्या दुनियेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून अद्वितीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये दहा सुवर्णपदके, २६ इतर पदके, ३० चषक आणि १९५ हून अधिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. २०१८ साली राष्ट्रीय पदक, मार्च २०२३ मध्ये फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या ‘इंटरनॅशनल अ‍ॅबिलिम्पिक’ या दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेत चेतनने सुवर्णपदकावर नाव कोरून भारत देशाचे नाव जगात उंचावले आहे.

२०१९ मध्ये विवाहानंतर तो ठाण्यातील हायलॅण्ड रेसिडेन्सी, येथे वास्तव्यास आहे. पत्नी आरतीने ‘डिप्लोमा अ‍ॅनिमेशन’ आणि त्यालाच अनुसरून विविध सॉफ्टवेअरचे शिक्षण घेतले आहे. एका जाहिरात कंपनीमध्ये ती नोकरी करीत आहे. आरतीच्या शिक्षणाचा चेतनला त्याच्या अदाकारी, कलाकारीत खूप फायदा झाला. आरतीमुळेच माझी चित्रकला बहरली आणि जास्तीत जास्त परिपक्व होत गेली, त्याचबरोबर ‘अ‍ॅबिलिम्पिक’ स्पर्धेसाठी तिची आणि तिचे वडील सुरेश महाजन यांची खूप मदत झाली. महाजन हे सासरे असले तरी तेच त्याचे संवादक बनून माझी भूमिका मांडत असल्याचे चेतन आवर्जून नमूद करतो. अगदी लहानपणापासून चित्रकलेवर अतोनात प्रेम आणि श्रद्धा असल्याने तसेच आईवडिलांचा आशीर्वाद, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच कलेच्या क्षेत्रात पाय रोवू शकल्याचे चेतन सांगतो. चेतनला बोलता येत नसले तरी तो विविध स्पर्धा, कार्यक्रमांना तसेच बक्षीस समारंभांना उपस्थिती दर्शवून होतकरू कलाकार व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो. चेतनने निर्मिती केलेल्या अनेक कलाकृती आहेत. त्याच्या काही पेंटिंग्स भारतीय सैन्य दलातील ‘एनएसजी कमांडोज’ यांना त्याने समर्पित केल्या आहेत.

जीवन म्हणजे फक्त जन्म घेणे आणि वेळ आली की निघून जाणे इतकंच नसतं. या दोन्ही वेळा आपल्या हातात नसतात. पण, मधला सगळा वेळ मात्र फक्त आपला असतो. तो वेळ कसा वापरायचा याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असूनही सारेजण तो इतरांसाठी कसा व्यतीत केला, याचा हिशोब मांडण्यात घालवतात. तेव्हा फक्त स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठीसुद्धा जगायला हवे, असे उदात्त विचार असणार्‍या चेतन पाशिलकर याला भविष्यात आपल्या दिव्यांगत्वावर मात करून चित्रकलेचा प्रचार-प्रसार करायची इच्छा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी करून त्यांना योग्य आणि उत्तम व्यासपीठ मिळवून द्यायचे आहे. दिव्यांगांसाठी अहोरात्र काम करायची जिद्द त्याने मनी बाळगली आहे, अशा या कलाविश्वातील चैतन्यशील चित्रकार अर्थात चेतन पाशिलकर याला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.