मुंबई : 'द केरला स्टोरी' हा सुदिप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट सध्या चर्चेत आहे. परंतु चित्रपटाच्या कथेच्या सत्यासत्यतेवरून अनेक वाद रंगत असताना निर्माते विपुल शाह यांनी केरळ येथील धर्मांतराला बळी पडलेल्या मुलींमधील प्रातिनिधिक स्वरूपातील २५ कन्यांना मुंबईत आणून पत्रकार परिषद घेतली. यावेळी, उपस्थित मुलींनी आपल्यासोबत झालेले अत्याचार, बळजबरी सांगत आत्मकथन केले. केरळमधील सद्य परिस्थिती सांगत या मुलींनी त्यांना मदत करत असलेल्या विविध यंत्रणा आणि संस्थांबद्दही माहिती पुरवली.
यावेळी, निर्माते विपुल शाह म्हणाले, "या चित्रपटाची चर्चा झाली, चित्रपटाला संपूर्ण भारतातून तसेच इंग्लंड सोडून इतर देशांतूनही मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु, हा प्रोपोगांडा चित्रपट असल्याने असे काही होत नसल्याचे बिनबुडाचे आरोप अनेकांनी केले. उत्फुर्त प्रतिसाद चित्रपटाला मिळत असला तरीही हे आरोप पुसून टाकण्याचे महत्वाचे कार्य करायचे होते. या आरोपांना आणि चर्चाना उत्तर म्हणून सत्यता लोकांसमोर आणणे हे आमचे कर्तव्य आहे." असे म्हणत्ये पुढे म्हणाले, "ज्या महिला धर्मांतराला बळी पडल्या आहेत अशांपैकी केवळ २५ मुलींना आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. ही केवळ केरळ येथीलच गोष्ट नाही तर संपूर्ण भारतात हे असे सुरु आहे. केवळ चित्रपट पाहणेच नव्हे तर त्याचा आवाज पुढे पाठवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या चित्रपटातून ३ मुलींच्या मध्यातून हजारो मुलींची कथा सांगितली आहे."
दरम्यान दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, "या चित्रपट निर्मितीमागे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणे हा उद्देश नव्हता. दहशतवाद इस्लाम धर्माला बदनाम करतो. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही हा कट रचला जातो. इस्लाम धर्माच्या नावाचा गैरवापर होतो. हा चित्रपट वास्तवावर भाष्य करतो."
आर्ष विद्या अमाजाचे महत्वाचे कार्य
पत्रकार परिषदेत पीडित मुलींपैकी श्रुतीने आर्ष विद्या समाजाच्या योगदानाबाबत भाष्य केले. श्रुती म्हणाली, "ज्या मुलींचे धर्मांतर झाले आहे, त्यांना आर्ष विद्या समाजांतर्गत मदत केली जाते. १९९९ पासून ते २०२३ पर्यंत २५ वर्षात जवळपास ७ हजार मुलींना धर्मांतर झाल्यानंतर त्यांच्या घरी पुन्हा पोहोचवण्यात आले आहे. या कार्यासाठी केवळ केरळचा नाही तर इतरही राज्यातून मदतीसाठी फोन येतात. आर्ष विद्या समाजातर्फे आश्रमात ३०० मुलींना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी मदत म्हणून चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी चित्रपटाच्या प्राप्त निधीतून ५१ लाख रुपयांची मदत आश्रमाला जाहीर केली आहे."