पाकिस्तानचे लष्कर इमरानपुढे हतबल

    16-May-2023   
Total Views |
imran khan

पाकिस्तानमधील राजकीय अस्थैर्याचा परिणाम त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणार्‍या कर्जावर होत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून परिस्थिती अशीच राहिली, तर तेथे अराजकता माजेल. इमरान खान लोकप्रिय असले तरी त्यांच्याच काळात घेतल्या गेलेल्या लोकानुनयी निर्णयांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले.

पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर आहे, हे विधान अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. यापूर्वी अनेकदा पाकिस्तान फुटून त्याचे तुकडे होणार किंवा तो दिवाळखोरीत जाणार, यावर चर्चा झडली आहे. पाकिस्तान फुटणार म्हणजे त्याची फाळणी होऊन त्यातून दोन किंवा अधिक देश तयार होणार असे नाही. ही फूट अंतर्गत असून देशाचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर पेलणार्‍या लष्कर, संसद, न्यायालय आणि माध्यम या स्तंभांमधील आहे. माजी पंतप्रधान इमरान खान हे या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर गेल्या ७६ वर्षांपैकी सुमारे चार दशकं पाकिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था असली तरी तिचे नियंत्रण लष्कराच्याच हातात होते. उर्वरित काळ थेट लष्कराच्या हातात सत्ता होती. लोकशाही मार्गाने आलेले सरकार कमकुवत करणे, विरोधी पक्षांना ताकद पुरवून सत्ताधारी पक्षाला जेरीस आणायचे, पंतप्रधान किंवा सरकारमधील उच्चपदस्थांविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून आपल्याच हातातील न्यायव्यवस्थेकडून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणे, अशा खेळांचा तेथील लष्कराला प्रदीर्घ अनुभव आहे. पण, बहुदा पहिल्यांदाच असे होत आहे की, पाकिस्तानमधील विरोधी पक्ष नेत्याने सरकारसह लष्कराला जेरीस आणले आहे.

दि. ९ मे रोजी इमरान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने अटक करण्यात आली. पाकिस्तान सरकारने इमरान खान यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार ते देशद्रोह अशा स्वरुपाच्या आरोपांखाली १४८ गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका खटल्यासाठी इमरान खान लाहोर येथील निवासस्थानाहून इस्लामाबाद उच्च न्यायालयात गेले असताना तिथे पाकिस्तान रेंजर्सनी कमांडो कारवाई करून त्यांना अटक केली. त्यांनी इमारतीच्या काचा फोडून इमरान असलेल्या कक्षात प्रवेश केला. गर्दी पांगवण्यासाठी डोळे झोंबणार्‍या फवार्‍याचा वापर केला गेला. इमरान खानना खेचून गाडीत भरण्यात आले. अटक करताना इमरान खान यांना मारहाण झाल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. पाकिस्तानच्या ‘नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो’ म्हणजेच लोकपालाने इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिवी यांच्याविरूद्ध ‘अल-कादिर ट्रस्ट’ घोटाळ्यातील सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यांना चौकशीसाठी दोन वेळा बोलावूनही ते न आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

इमरानच्या अटकेची बातमी वार्‍यासारखी पसरली. ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनी रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयाला तसेच लाहोर येथील लष्करी अधिकार्‍यांच्या आलिशान वसाहतीत घुसून लूटमार केली. काही लोकांनी या वसाहतीत फिरणारे मोरही पकडून आणले. लाहोरमध्ये आंदोलकांनी महामार्ग अडवून ठेवल्यामुळे शहराचा देशाच्या उर्वरित भागाशी संबंध तुटला. यापूर्वी पाकिस्तानात आंदोलनांना हिंसक वळण लागले असले त्यांना लष्कराचा पाठिंबा असायचा. पहिल्यांदाच आंदोलकांनी लष्कराला लक्ष्य केले. इमरानला अटक केल्यानंतर त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करून त्यांच्याविरूद्ध चाललेल्या सर्व खटल्यांमध्ये जामीन दिला आणि पुन्हा अटक करण्यावर प्रतिबंध लावला. पाकिस्तानचे लष्कर एवढे हतबल कधीही नव्हते.

यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये संसदेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. आता असे चित्र आहे की, या निवडणुकांमध्ये इमरान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाचा दणदणीत विजय होणार आहे. अर्थात, या विजयासाठी इमरान यांच्या कर्तृत्त्वापेक्षा पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती जबाबदार आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात राजीनामा देईपर्यंत असाच रोष इमरान खान यांच्या सरकार विरोधात होता. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचा प्रयत्न आहे की, निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात किंवा मग या निवडणुका होण्यापूर्वीच इमरान खानना कोणत्या तरी खटल्यात दोषी ठरवून शिक्षा व्हावी. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर अटा बांदियाल यांची इमरान खानशी जवळीक सर्वांना माहिती आहे. लष्कर प्रमुख असिम मुनिर यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये सूत्रं हाती घेतली असली तरी पाकिस्तानच्या लष्कराच्या वरिष्ठ पदांवर अजूनही कमर जावेद बाजवा यांनी नियुक्त केलेले अधिकारी आहेत. मुनिर यांच्या निवडीत बाजवांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी त्यांना अजून आपल्या विश्वासातले अधिकारी नेमता आलेले नाहीत.

सप्टेंबर २०२३ मध्ये अनेक अधिकारी निवृत्त होणार असल्याने तेव्हा मुनिर यांना ही संधी मिळेल. पाकिस्तानी लष्करात इमरान खान समर्थक अधिकारी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळेच लष्कराला इमरान खान यांच्याविरूद्ध कारवाई करताना विचार करावा लागत आहे. पाकिस्तानमधील सत्ता संघर्षाला वांशिक आणि धार्मिक किनारही आहे. इमरान खान हे वंशाने पश्तुन असले तरी त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून पंजाबमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा या दोन्ही राज्यांमध्ये त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. पाकिस्तानवर अनेक वर्षं सत्ता गाजवणारे शरीफ कुटुंबीय सौदी अरेबियाच्या अत्यंत जवळचे आहेत. भुट्टो कुटुंबीय शिया असून त्यांचे इराणशी नातेसंबंध आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं पाकिस्तानने स्वतःला आखाती अरब देशांशी जोडून घेतले होते. या काळात सुन्नी वहाबी विचारसरणी पाकिस्तानमध्ये वेगाने पसरली. इमरान खान यांचा कल अरब देशांपेक्षा तुर्कीकडे आहे. त्यांच्या काळात पाकिस्तानमध्ये सुफी विचारसरणीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. यातून पाकिस्तानमध्ये अनेक इस्लामिक संघटना मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. इमरान खान यांचा कल रशिया आणि चीनकडे असून सध्याच्या सरकारचा कल अमेरिकेकडे असल्याने अमेरिका आणि चीनमधील संघर्षाचाही पाकिस्तानवर प्रभाव आहे.

इमरान खानना सत्तेवर आणण्यात पाकिस्तानच्या लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा,पंतप्रधान असलेल्या नवाझ शरीफ यांचे भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नसल्याने त्यांनी शरीफ यांना अनेक खटल्यांमध्ये अडकवले. सरकार विरोधात प्रचंड मोर्चे काढण्यासाठी इमरान खान यांना मदत केली. २०१८ साली इमरान खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले होते. अल्पावधीतच लष्कर आणि इमरान खान यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. इमरान खानची चीन आणि रशियाशी सलगी लष्कराला खुपत होती. त्यामुळे अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला वार्‍यावर सोडले असे लष्कराला वाटते.

पाकिस्तान आणि चीन यांच्यातील जवळीकीमुळे भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत असल्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे पाकिस्तानने चीन आणि अमेरिकेत समतोल साधावा, असे त्यांना वाटत होते. पण, इमरान खान यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. एप्रिल २०२२ मध्ये इमरान खानचे सरकार पाडण्यात लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे असले तरी इमरान यांची लोकप्रियता आणि चीनचा त्यांना असलेला पाठिंबा यामुळे लष्कर इमरान खानविरुद्ध कठोर कारवाई करू शकले नव्हते. नोव्हेंबर २०२२ मध्ये इमरान खानच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी त्यांना गोळ्या लागल्या होत्या. मार्च २०२२ मध्ये इमरान खानना अटक करण्याचा प्रयत्न झाला असता, त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराला वेढा घालून पोलिसांना दरवाजावरच अडवले.

पाकिस्तानमधील राजकीय अस्थैर्याचा परिणाम त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणार्‍या कर्जावर होत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून परिस्थिती अशीच राहिली, तर तेथे अराजकता माजेल. इमरान खान लोकप्रिय असले तरी त्यांच्याच काळात घेतल्या गेलेल्या लोकानुनयी निर्णयांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले. सप्टेंबर २०२३ मध्ये निवडणुका होऊन इमरान खान सत्तेवर आल्यास तेथील परिस्थिती आणखी चिघळू शकेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.