‘स्वप्नपूर्ती फाऊंडेशन’च्या माध्यमातून वनवासी पाडे, खेड्यातील ५२ हजार विद्यार्थ्यांना वैदिक गणित, करिअर मार्गदर्शन करणार्या सचिन काकडे-पाटील याच्या ‘स्वप्नपूर्ती’चा हा प्रवास...
सचिन काकडेचा जन्म छ. संभाजीनगर जिल्ह्यातील कोलते टाकळीचा. गावातील जि. प. शाळेत असताना उनाडक्या करणे, शाळा बुडवून विहिरीत, नदीत पोहणे, सूर पारंब्या अन् डोंगरदर्या, निसर्गात हिंडणे या सचिनच्या खोड्या. साहजिकच त्याचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, सचिनचे आजोबा आणि वडील हे दोघेही हाडाचे शिक्षक. म्हणून घरातूनच सचिनला शिक्षणाचे संस्कार मिळाले. सचिनला शिक्षणाचा मुळीच गंध नाही, हे पाहून त्याच्या वडिलांनी-आजोबांनी त्याला गावाकडून छ. संभाजीनगरला शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. पाचवीपर्यंत काठावर उत्तीर्ण होणारा आपला मुलगा शहरात काय दिवे लावणार, याबद्दल त्याचे पालक चिंताग्रस्त असत. मुळातच हुशार असणार्या सचिनने मात्र इर्ष्येने प्रचंड अभ्यास करुन सहावी आणि सातवीच्या वर्गात शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. सचिनची प्रगती बघून काकडे कुटुंबीयही गावाकडून छ. संभाजीनगरला मुलाच्या शिक्षणासाठी स्थायिक झाले. ‘मुकुल मंदिर’शाळेतून सचिनने विशेष प्राविण्यासह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
मराठी माध्यमातून शिकणारा सचिन नंतर ’आयआयटी’चे स्वप्न पाहू लागला. त्यासाठी त्याने बारावीला प्रचंड अभ्यासही केला. मात्र, ‘आयआयटी’चे स्वप्न केवळ चार गुणांनी हुकले. नंतर सचिनने नाशिकच्या ’के. के. वाघ महाविद्यालया’त विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. ग्रामीण भागातील होतकरु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, असे त्याला वाटे. ती मुलेही हुशार असतात. पण, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने उच्च शिक्षणाच्या त्यांच्या संधी हुकतात, असे त्याला जाणवत होते. खेडोपाडी राहणार्या मुलांमध्येही बुद्धिमत्ता, मेहनतीची तयारी, चिकाटी असतेच. केवळ योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अशी मुले शिक्षणात, करिअरमध्ये मागे पडतात, हा अभ्यास सचिनने केला. त्यांच्यासाठी कार्य करता यावे, म्हणून तो वनवासी पाड्यावर जात असे. शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून विद्यार्थ्यांना एकट्यानेच वैदिक गणित, संगणक साक्षरता, करिअर मार्गदर्शन, खगोलशास्त्र यासंबंधी सचिन मार्गदर्शन करु लागला. त्याचे कार्य पाहून पुढे त्याचे खोलीमित्र, सहाध्यायी या कामात जोडले गेले.
त्यातून २०१४ मध्ये ’स्वप्नपूर्ती फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण, या कार्यासाठी पैसाही हवा होता. विद्यार्थ्यांना खर्चासाठी मिळणार्या पैशांतील काही रक्कम समाजकार्यासाठी द्यावी, असे आवाहन सचिनने केले. शिक्षण घेत असतानाच सचिन आपल्या मोजक्या मित्रांना घेऊननाशिकजवळील खेडे, दुर्गम वनवासी पाडे येथील आश्रमशाळा, जि. प. शाळा, झोपडपट्ट्यांमधील विद्यालयात जाऊन शालेय विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, वैदिक गणित मार्गदर्शन आदी विषयांचे ज्ञान देत गेला. ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य ११ सदस्यांना घेऊन सुरू झाले. हळूहळू ‘स्वप्नपूर्ती’चे उपक्रम वाढू लागले. आजवर ’स्वप्नपूर्ती’चे जवळपास एक तप पूर्ण झाले असून, त्यामध्ये शाळाभेट, गणेशमूर्ती संकलन, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम, चांगल्या कपड्यांचे संकलन करुन गोरगरिबांना वाटणे, रक्तदान शिबिरे, वृद्धाश्रम, अनाथाश्रमांना भेटी देऊन काम करणे आदी उपक्रम राबविले जातात. शाळाभेटी उपक्रमातून ‘स्वप्नपूर्ती’ने आजवर ५२ हजारांहून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासह ज्ञानदानाचे कार्य केले. आज ’स्वप्नपूर्ती’चे राज्यातील पाच जिल्ह्यांत २,६००हून अधिक स्वयंसेवक संस्थेसाठी कार्यरत आहेत.
दरम्यान, सचिनने पुणे विद्यापीठातून ‘स्मार्ट ग्रीड’ विषय घेऊन ‘एमटेक’चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विविध विषयांवर संशोधनपर प्रबंध सादर करुन सचिनने २५ राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. बुद्धीबळासह विविध क्रीडास्पर्धांतही त्याने उज्वल कामगिरी करुन महाविद्यालयाला अनेक पारितोषिके मिळवून दिली. सचिनचे हे योगदान बघून ’के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालया’ने सचिनचा ‘स्टुडंट ऑफ द इअर’ पुरस्कारने गौरव केला. “एकवेळ इतिहासाचे ज्ञान नसले तरी चालेल, पण त्याची जाण मात्र असायलाच हवी. इतिहासाचा व्यर्थ अभिमान ऐतिहासिकवारशाचा घात असतो, तर इतिहासाचा सार्थ अभिमान हा ऐतिहासिक वारशाचा ध्यास असतो. ज्या भूतकाळाकडे पाहिले की, भविष्यकाळ घडवण्याची वर्तमानदृष्टी प्राप्त होते, असा सुवर्ण इतिहास आपल्या पूर्वजांनी घडवला.आज हाच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे,” असे सचिन सांगतो. ”
आज सचिन नाशिकच्या ’के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालया’त विद्युत अभियांत्रिकी विभागात साहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. त्याची पत्नी ’महापारेषण’ची अभियंता रिना पाटील हिचीही त्याला भक्कम साथ मिळत आहे. रिनामुळेच कामाला ’डबल इंजिन’ लागले, असे सचिन नमूद करतो. वनवासी पाडे, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण, करिअर मार्गदर्शनासाठी ’स्वप्नपूर्ती’चे काम राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे सचिनचे स्वप्न आहे. त्याच्या या ’स्वप्नपूर्ती’साठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा...!
निल कुलकर्णी