मुंबईत जी-२० उर्जा संक्रमण कार्य गटाची तिसरी बैठक

१५ ते १७ मे २०२३ दरम्यान मुंबईत आयोजित

    15-May-2023
Total Views |
g20

मुंबई
: भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील उर्जा संक्रमण कार्य गटाची (ETWG) तिसरी बैठक १५ ते १७ मे २०२३ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जी-२० सदस्य देश, विशेष आमंत्रित देश तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (आयईए) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थामधील १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

उर्जा संक्रमण कार्य गटाची हीतिसरी बैठक या कार्य गटाचे अध्यक्ष तसेच भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जात आहे. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला, खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना हे देखील या बैठकीत आणि त्या दरम्यान होणाऱ्या चर्चेत सहभागी होणार आहेत. तसेच बैठकीच्या पहिल्या दिवशी भारताचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे विशेष भाषण करतील.

भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली सहा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. ही प्राधान्य क्षेत्रे ऊर्जा संक्रमणाच्या विविध पैलूंवर तसेच शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा विकासासाठी जागतिक सहकार्य निर्माण करण्यावर भारताचे लक्ष प्रतिबिंबित करतात. ही सहा प्राधान्य क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत (i) तंत्रज्ञानातील तफावत दूर करून ऊर्जा संक्रमण (ii) ऊर्जा संक्रमणासाठी कमी किमतीचे वित्तपुरवठा (iii) ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी (iv) ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक कमी कार्बन संक्रमण आणि उर्जेचा जबाबदार वापर, (v) भविष्यासाठी इंधन (३F) आणि (vi) स्वच्छ ऊर्जेसाठी सार्वत्रिक उपलब्धता तसेच न्याय्य, परवडणारे आणि समावेशक ऊर्जा संक्रमण मार्ग.

उर्जा संक्रमण कार्य गटाच्या पहिल्या दोन बैठका अनुक्रमे बेंगळुरू आणि गांधीनगर या शहरात संपन्न झाल्या. न्याय्य आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमणाला पाठबळ देणार्‍या सर्वोत्तम पद्धती, धोरणे आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या दोन उर्जा संक्रमण कार्य गट बैठकांमध्ये चर्चा झाली होती आणि मुंबई येथील बैठकीत याच विषयांवर चर्चा पुढे होत राहील. ऊर्जा संक्रमणाशी संबंधित आव्हानांना प्रभावीपणे हाताळताना शाश्वत आणि न्याय्य वाढ साध्य करण्यासाठी सामूहिक आराखडा विकसित करणे हे या बैठकांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यासोबतच, बैठकीला पूरक अशा आठ महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम उपस्थितांतमध्ये होणारी चर्चा अधिक समृद्ध करतील तसेच ऊर्जा संक्रमणाच्या विविध पैलूंवर केंद्रित अंतर्दृष्टी देखील प्रदान करतील. हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत: - 'कमी किमतीच्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने बहुपक्षीय विकास बॅंकाबरोबर (MDB) कार्यशाळा', 'न्याय्य संक्रमण आराखड्यावर परिसंवाद', 'जैवइंधनावर परिसंवाद', ' जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यासंदर्भात (मतलई वारे) परिसंवाद', 'हॅड-टू-एबेट क्षेत्रे कार्बन मुक्त करण्यासाठी जागतिक धोरणे आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे', 'स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी SMRs (स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स) वर परिसंवाद', जी-२० उर्जा संक्रमण कार्य गट आणि बी-२० इंडिया एनर्जी पर्स्पेक्टिव्हच्या ऊर्जा संक्रमण मार्गांचे समन्वयन करणे', आणि 'ऊर्जा कार्यक्षमतेचा वेग वाढवणे तसेच उर्जा आणि ऊर्जा कार्यक्षम जीवन वाढवणे. असे विषय आहेत.

स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये जागतिक सहकार्याचे सातत्य आणि सामूहिक पाठपुरावा अधोरेखित करणार्‍या मागील अध्यक्ष देशांचे प्रयत्न आणि त्यांचे परिणाम यापुढेही वृद्धिंगत करण्यासाठी भारताची जी-२० अध्यक्षीय कारकीर्द वचनबद्ध आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाचे उद्दिष्ट हा मार्ग पुढे चालू ठेवणे आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये जागतिक सहकार्य अधिक मजबूत करणे हेच आहे.