कचरा व्यवस्थापनाची जर्मन पद्धत

    01-May-2023   
Total Views |
german

१७६०च्या दशकापासून जगभरात औद्योगिक क्रांती सुरू झाली, ती आजही अव्याहत सुरूच आहे. या औद्योगिक क्रांतीमुळे विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाले. यातून प्रगती झालीच. परंतु, या वस्तूंच्या जीवनचक्राच्या शेवटच्या पायरीचा कोणीच विचार केला नाही आणि यातून निर्माण झाला तो कचरा! आज अनेक देश कचर्‍याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

 २०५० पर्यंत आपण निर्माण करत असलेल्या शहरी घनकचर्‍याचे प्रमाण ७० टक्के ते ३.४ अब्ज मेट्रिक टनपर्यंत वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. विविध कचर्‍यामध्ये घरगुती आणि सेंद्रिय कचर्‍यापासून कागद, काच, पॅकेजिंग आणि इलेक्ट्रिकल उपकरणांपर्यंत अनेक प्रकारच्या कचर्‍याचा समावेश होतो. एवढ्या व्यापक आणि विविध प्रकारच्या कचर्‍याचे व्यवस्थापन करणे, हे जगभरातील शहरांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. या घनकचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करणे ही जगभरातील देशांची जबाबदारी आहे. यासाठी महत्त्वाचे असलेले धोरण म्हणजे ‘शून्य कचरा व्यवस्थापन.’

‘शून्य कचरा व्यवस्थापन’ म्हणजे सर्वच स्तरांवर कचरा कमी करणे. मूलतः ‘शून्य कचरा’ ही एक संसाधन व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे उत्पादनांचे संपूर्ण जीवनचक्रापासून विविध संसाधनांचे संवर्धन होते. तयार वस्तू पुनर्चक्रीत (रिसायकल) करून निर्माण झालेला कचरा कमी करण्यात मदत होते. ‘शून्य कचरा व्यवस्थापना’तील मूल्यांचे अंगीकरण केल्याने अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यासदेखील चालना मिळते.

‘शून्य कचरा व्यवस्थापना’मुळे नावीन्य वाढते. या प्रणालीचे उद्दिष्ट कचरा रोखणे, संसाधनांचे संरक्षण करणे आहे. आपण वापरात असलेल्या उत्पादनांची दुरूस्ती करून पुनर्वापर करू शकतो. याची सुरुवात युरोप खंडात झाली. युरोपियन युनियनने २०१२ मध्ये ‘वेस्ट फ्रेमवर्क’ निर्देश मंजूर केले होते. ‘वेस्ट फ्रेमवर्क’ हा युनियनच्या सर्व सदस्य राज्यांसाठी मूलभूत कचरा व्यवस्थापन संकल्पनांचा संच आहे. जर्मनीने २०१२ साली ‘सर्क्युलर इकोनॉमी’ कायदा आणला. यामुळे पुनर्वापराची टक्केवारी ६५ टक्क्यांपर्यंत वाढली. यानंतर युरोपियन युनियनने यासंबंधीच्या निर्देशांमध्ये सुधारणा केली आणि २०३५ पर्यंत हे लक्ष्य ६५ टक्क्यांपर्यंत वाढवले.

जर्मनीमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍याचा मोठा भाग पुन्हा वापरला जातो आणि कंपोस्ट केला जातो. ज्यामुळे संसाधनांची बचत होते आणि निसर्गाचे संरक्षणही होते. जर्मनी कचरा विलगीकरणात कायमच अग्रेसर राहिला आहे. यामुळे कचरा रिसायकल करणार्‍यांना तथा ज्वलनशील पदार्थ उत्पादकांना या कचर्‍याचा फायदा होतो. यात अनेकजण असल्यामुळे या व्यवसायात स्पर्धाही होते. परंतु, कचरा निर्माण करणे, टाळणे, हा कचर्‍याचे ढीग वाढू नये, यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे. जर्मनीमध्ये कचर्‍याचे व्यवस्थापन घरापासून सुरू होते. बहुसंख्य जर्मन रहिवाशांची जीवनशैली ही ‘शून्य कचर्‍या’कडे झुकलेली दिसते.

देशाच्या ‘रिसायकलिंग योजने’नुसार ही मंडळी त्यांच्या घरातील कचरा वेगळा करतात. अन्नातून कचरा, प्लास्टिक कचरा आणि इतर प्रकारच्या कचर्‍यासाठी सहा स्वतंत्र कचराकुंड्या आहेत. यामध्ये पिवळा डबा प्लास्टिकसाठी, पांढरा डबा स्वच्छ काचेसाठी, हिरवा डबा हिरव्या काचेसाठी, तपकिरी डबा तपकिरी काचेसाठी, निळा डबा कागदाच्या कचर्‍यासाठी आणि शेवटचा डबा सेंद्रिय आणि अन्न कचर्‍यासाठी आहे. या भेदांमुळे देशातील रिसायकल करणार्‍या प्रकल्पांना योग्य पुनर्वापर प्रक्रिया करणे सोपे होते. विविध प्रकारचा कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जातो. याव्यतिरिक्त, जर्मनीने ‘एनर्जीवेंडे’ हा कमी कार्बन आणि अक्षय ऊर्जा संक्रमणाचा ‘रोडमॅप’ लागू केला आहे.

सध्या जर्मनीमध्ये काही कचरा-ते-ऊर्जेचा पुनर्वापर करणारे प्रकल्प सुरू आहेत. याचा अर्थ असा की, जर्मनी आपल्या कचर्‍याचा पुनर्वापर घरगुती आणि व्यावसायिक उद्योगांसाठी ऊर्जानिर्मितीसाठी करते. जर्मनीतील ‘रिसायकल अ‍ॅण्ड रियुझ’ पद्धतींमुळे डम्पिंग ग्राऊंडमध्ये पाठवल्या जाणार्‍या कचर्‍याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. जर्मनीमध्ये सुमारे १५ हजार कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. जर्मनीचा कचरा व्यवस्थापनाचा दर जगात सर्वाधिक आहे. परंतु, ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ हे फक्त सरकारचे काम नसून, ते एक समाजकार्य आहे. याकरिता प्रत्येकाने आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.