अयोध्येतील संत महंतांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदेंच्या हाती धनुष्यबाण सुपूर्द

मुख्यमंत्र्यांकडून अयोध्येतील साधुसंतांचा यथोचित सन्मान

    09-Apr-2023
Total Views |
ram-temple-from-chief-minister-eknath-shinde

अयोध्या
: अयोध्येतील संत महातांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहाती प्रभू श्रीरामाचे आयुध असलेला धनुष्यबाण विधिवत सुपूर्त करून धर्माचे राज्य निर्माण करण्याचा आशीर्वाद देण्यात आला. लक्ष्मण किला येथे पार पडलेल्या दर्शन आणि महंत संकल्प महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अयोध्येतील महंतांचा यथोचित सन्मान करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शुभआशिर्वादही घेतले.

यावेळी बोलताना आयोध्यमध्ये येऊन मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून हा माझा आयुष्यातील अत्यंत सौभाग्याचा दिवस असल्याचे मत यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच राम मंदिराचे काम पाहून मनात 'राम मंदिर बन ही गया जन्मभूमी के स्थान पर, भगवा अब तो लहेरा के रहेगा पुरे हिंदुस्थान पर' असे भाव मनात निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येत आल्यावर सकाळी रामललाचे दर्शन झाले दुपारी महंतांचे दर्शन झाले त्यामुळे अयोध्येत येण्याचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. लखनऊला आलो तसे हजारो रामभक्त माझ्या स्वागतासाठी उपस्थित होते. यापूर्वी देखील अयोध्येला येऊन गेलो मात्र यावेळी इथे येऊन एक वेगळेच समाधान मिळाले असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. मी अयोध्येला मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर रामभक्त म्हणून आलो आहे.

प्रभू श्रीरामाच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात सत्तांतर घडले आणि लोकाच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेले सरकार आम्ही स्थापन केल्यानेच आम्हाला शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे अधिकृत पक्षचिन्ह मिळाल्याचे मत व्यक्त केले. अयोध्या हा आमच्यासाठी आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे. अयोध्या आणि राम मंदिराशी आमचे नाते फार जुने आहे. जेव्हा लोकं हिंदू म्हणायला घाबरत होते तेव्हा बाळासाहेबानी 'गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा दिला.

रामजन्मभूमी आंदोलन झाल्यानंतरही अनेक वर्षे सगळ्यांना वाटायचे इथे किती मंदिर होईल की नाही ? पण आज आम्ही आरती केल्यानंतर नवीन मंदिराचा कामाची पाहणी केली तेव्हा या मंदिराच्या कामाचा वेग पाहता आम्ही थक्क झालो. पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे पुढील वर्षी रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान होईल. याबद्दल मोदींचे आभार करावे तेवढे कमीच आहेत. त्यासोबतच ज्या वेगाने मंदिर परिसरात रस्ते रुंदीकरण करण्याची कामे सुरू आहेत ते पाहता योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे कौतुक करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात जे अराजक माजले होते ते पाहता हे सरकार उलथवून टाकणे काळाची गरज होती. ज्यांनी कायम राम मंदिराला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून आज बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बसले आहेत त्यामुळेच ते सरकार बदलावे लागले असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. हिंदुत्व हे अन्य धर्मियांच्या विरोधात असल्याची टीका केली जायची पण त्यामागे आपलं दुकान सुरू रहावं अशी काहीची ईच्छा होती, मात्र २०१४ साली आशा विचारांना मागे टाकत देशात हिंदुत्ववादी सरकार मोदींच्या हस्ते निर्माण झाले आणि तीन वर्षापूर्वी कायदेशीर लढा पूर्ण करून पंतप्रधान मोदींनी राम मंदिरांचे काम पूर्ण केले.

महाराष्ट्रात सर्व जाती समुदायाचे लोक एकत्र रोहतात. पण ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात स्थानिक लोकांना आधी प्राधान्य देण्यात येते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी लोकांना आधी प्राधान्य देण्यात येते. मात्र असे असले तरीही वर्षानुवर्षे जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना या राज्याने स्वीकारले आहे. तुम्ही आम्हाला उत्तर प्रदेशात जे प्रेम दिलेत तेच पुढे घेऊन आम्ही महाराष्ट्रात काम करू असे सांगून उपस्थितीताना आशवस्त केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आणि रामजन्मभूमी लढ्यातील अग्रणी महंत गोपालदासजी महाराज यांचा यावेळी सन्मान केला तसेच रामाच्या नितीने राज्य करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी महंतांच्या हस्ते त्यांना हिंदुत्वाचे प्रतीक असलेले कुंकू लावण्यात आले. त्यानंतर धनुष्यबाण, राम पंचायतन आणि गदेचे विधिवत पूजन करून हे तिन्ही मला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. धनुष्यबाण हे फक्त शिवसेनेचे पक्षचिन्ह नसून आमच्या अस्मितेचे प्रतिकही आहे त्यामुळे धनुष्यबाण हातात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्याला मनोभावे वंदनही केले.

यावेळी रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आणि रामजन्मभूमी लढ्यातील अग्रणी महंत गोपालदासजी महाराज लक्ष्मण किलाचे मठाधिपती मैथिली रमण दास, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आंनदराव अडसूळ,कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री स्वतंत्रदेव सिंह, आणि शिवसेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.