मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध स्तरातील समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. अनेक पथदर्शक प्रकल्प त्यांच्या अथक, अविरत परिश्रमातून उभे राहिले आहेत. अशांपैकी काही स्वयंसेवकांच्या कार्याची दखल शासकीय पातळीवर देखील घेण्यात आली व त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील अशा पद्म पुरस्कार प्राप्त पाच ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये श्री. गिरीश प्रभुणे, श्री. प्रभाकर मांडे, श्री. रमेश पतंगे, श्री. भिकूजी (दादा) इदाते व श्री. गजानन माने यांचा समावेश आहे.
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या श्री. सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या हस्ते या सर्वांना गौरवण्यात येईल. टिळकनगर विद्या मंदिराच्या प्रांगणात सोमवार दि. १० एप्रिल २०२३ या दिवशी सायंकाळी सात वाजता हा गौरव सोहळा संपन्न होईल. तरी सर्व नागरिकांनी आवर्जून या सोहळ्यास उपस्थित राहावे," असे आवाहन आयोजक अभ्युदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. श्रीपाद जोशी यांनी केले आहे.