युरोप दुष्काळ छायेखाली?

    06-Apr-2023   
Total Views |
How Europe's droughts are affecting tourism
 
युरोपातील मोठा भाग सलग दुसर्‍या वर्षीही भीषण दुष्काळाचा सामना करत असून त्याचा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. इटली आणि स्पेनसारख्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने या देशांनाही दुष्काळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. रॅबिट आयलंड हे इटलीच्या प्रसिद्ध गार्डा सरोवराच्या मध्यभागी असलेले एक लहान बेट असून पूर्वी या बेटावर जाण्यासाठी बोट घ्यावी लागत होती. पण, आता तलावातील पाणी इतके कमी झाले आहे की, वाळू आणि दगडांवरून चालत या बेटावर जाण्याचा मार्ग तयार झाला आहे. हा अनुभव पर्यटकांसाठी भले रंजक असेल, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने हे गंभीर संकटाचे लक्षण आहे. तलाव सामान्यतः भूजल आणि जवळच्या प्रवाहांनी भरतो. तलावातील पाण्याची खालावलेली पातळी दुष्काळाचे वास्तव दाखवून देत आहे. गार्डा तलावात सध्या सरासरीपेक्षा निम्मे पाणी असून असे मागील ३० वर्षांत प्रथमच घडले आहे.

विशेष म्हणजे, १३३ मीटर इतकी खोली असलेला हा गार्डा तलाव इटलीमधील पिण्याच्या पाण्याचे सर्वांत महत्त्वाचा जलाशय म्हणून ओळखला जातो. परंतु, पाण्याच्या पातळीत होणारी घट सामान्य असल्याचे पर्यटन मंडळाचे म्हणणे आहे. इटालियन हवामानशास्त्रज्ञ मातिया जुसोनी म्हणतात, “उत्तर इटलीमध्ये दोन वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. हिवाळ्यात थंडीसोबत पावसाचे प्रमाणही घटले आहे. आल्प्समध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि हिमवर्षाव झाल्याने उत्तर इटलीत दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. इटलीतील सर्वात लांब नदी पो हिला पाऊस आणि पर्वतांमध्ये बर्फवृष्टीमुळे पाणी मिळते. इटलीतील शेतीचा मोठा भाग सिंचनासाठी या नदीवर अवलंबून आहे.” आल्प्सच्या उत्तरेकडील स्वित्झर्लंड आणि जर्मनीमधील पर्यटन व्यावसायिक दुष्काळाचा सामना करत असून, या वर्षीही काही ठिकाणी पर्यटकांना क्रूझ फेरीऐवजी बसने प्रवास करावा लागेल. तलावाची पाणीपातळी खालावल्याने मोठा अपघात होऊ नये, म्हणून काळजी घेतली जात आहे.

हिवाळ्यात कमी बर्फवृष्टीमुळे युरोपमधील अनेक रिसॉर्ट्सवरही संक्रांत आली असून अनेक ठिकाणी अर्धा स्की स्लोप कृत्रिम बर्फाने झाकून टाकावा लागला. पूर्व फ्रान्सच्या जुरा प्रदेशात, दोन हजार मीटरपेक्षा कमी उंचीच्या पर्वतांवर अनेक स्की रिसॉर्ट्स आहेत. गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत आता ६९ टक्के कमी पर्यटक तेथे पोहोचत आहेत. स्पेनच्या कॅटालोनिया प्रांतही अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. फॅब्रा हवामान केंद्रातील हवामानशास्त्रज्ञ अल्फोन्सो पुएर्टास यांच्या मते, बार्सिलोनातील परिस्थिती गंभीर असून १९१४ नंतर हा भाग सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस सरासरीच्या (६२१ मिमी प्रति वर्ष) निम्माही पडलेला नाही. बार्सिलोनासारख्या महानगराला पिण्याचे पाणी पुरविणार्‍या अनेक जलाशयांची पातळी खालावत चालली आहे. पाणीबचतीसाठी अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.
 
कॅटालोनियाच्या प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच पाणी वाचवण्यासाठी नियम लागू केले आहेत. बार्सिलोनाच्या प्रसिद्ध फाँटा मॅजिका फाऊंटनमधील म्युझिक लाईट शो, कारंजे रद्द करण्यात आले आहे. स्पेनमधील मयोर्कामध्येही दुष्काळाचे सावट जाणवत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र युरोपातील अनेक भागांना दुष्काळाची झळ बसू शकते. फ्रान्समध्ये एक महिन्यांपासून पाऊस पडलेला नाही. १९५९ नंतर प्रथमच पावसाने हिवाळ्यात हुलकावणी दिली आहे. फ्रान्सची सर्वांत मोठी नदी लुआर मार्चमध्येच कोरडी पडली आहे.एप्रिल महिन्यात पाणीबचतीची राष्ट्रीय योजना आणली जाणार असून सध्या काही भागांत स्विमिंग पूल भरण्यासह गाड्या धुण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर इटली दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून गेल्यावर्षीचा दुष्काळ मागील ७० वर्षांतील सर्वात मोठा दुष्काळ होता. यंदाही दुष्काळ कायम राहिला, तर युरोपातील पर्यटनासह अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो. युरोपातील अनेक देशांतील भाग दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. निसर्गसंपन्न या देशांनाही आता आफ्रिका आणि आशिया खंडाला परिचित असणार्‍या दुष्काळाची झळ बसत आहे. जागतिक तापमानवाढ हा महत्त्वाचा मुद्दा असला तरीही पर्यटनाच्या आड होणारा निसर्गाचा र्‍हास हादेखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.