मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त शहर उपनगरात विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथे पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण तर जीटीबीनगर येथे विशेष कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई भाजपा वसंतस्मृती कार्यालयात ध्वजारोहण झाले. भाजपा मुंबईच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने ध्वजारोहण तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
यानिमित्ताने सायन सर्कल येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. आ. प्रसाद लाड यांनी याकरिता परिश्रम घेतले. कांदिवली पूर्व विधानसभेत आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते तर अंधेरी (पश्चिम) येथे आ. अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. कुर्ला येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शीव येथे आ. कॅप्टन तमिल सेलव्हन यांच्या प्रयत्नाने रेडिओ कंट्रोल विमानांचा एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले. खार येथे भिंतीवर पक्षाचे चित्र रंगवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. बोरिवलीत आ. सुनील राणे यांच्या प्रयत्नाने ई - श्रम कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत आहे. पक्षाचा हा प्रवास एक अथक आणि अखंड प्रवास आहे, हा प्रवास प्रयत्नांच्या पराकाष्टेचा आहे. हा प्रवास समर्पणाच्या आणि संकल्पाच्या शिखराचा आहे असेही भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले. यावेळी मुंबई भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.