श्रीरामदूत हनुमान

    05-Apr-2023
Total Views |
Shriramdut Hanuman


हनुमानाला सोपविलेली कामगिरी सीतेचा शोध लावणे, एवढीच होती. तरीदेखील नेमलेल्या जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी तारतम्याने स्वतःकडे घेणे आणि ती पार पाडण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणे, यात हनुमानाची दूतकार्याविषयी प्रगल्भता दिसून येते. आज हनुमान जयंतीनिमित्त श्रीरामदूत हनुमानाचे स्मरण...

पवनपुत्र हनुमान भारतीयांच्या विविध उपास्यदैवतांपैकी एक. श्रीरामभक्त हनुमान दास्यभक्तीचे प्रतीक आहे. ‘मरुत्’ हा वायूचा समानार्थी शब्द. यास्तव ‘मारुति’ असे आणि ‘अंजनीसुत’ म्हणून ‘आंजनेय’ असे नामाभिधान त्याला प्राप्त झाले आहे. नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाला फळ समजून ते प्राप्त करण्यासाठी त्याने उडी मारली असता क्रुद्ध झालेल्या इंद्राने त्याच्याकडे वज्र फेकले. परिणामी, त्याची डावी हनू मोडली. त्यामुळे त्याला ‘हनुमान’ असे नाव प्राप्त झाले. युद्धकाण्डातील वृत्तांतानुसार, शुक हनुमान या नावाच्या व्युत्पत्तीविषयी रावणाला सांगतो की, सूर्यबिंबाकडे झेप घेताना तो उदयाचलावरील शिळेवर पडला आणि त्याची एक हनुवटी मोडली, तरी ती दृढ झाली म्हणून त्याला ‘हनुमान’ म्हणतात.


अनाधृष्यतमं देवमपि देवर्षिराक्षसैः।अनासाद्यैव पतितो भास्करोदयने गिरौ॥
पतितस्य कपेरस्य हनुरेका शिलातले।
किंचिद् भिन्ना दृढहनुर्हनूमानेष तेन वै॥ (वाल्मिकी रामायण युद्धकाण्ड २८.१४-१५)


महापराक्रमी असल्यामुळे ‘महावीर’ हे त्याचे नाव सर्वपरिचित आहे. स्वतः राम हनुमानाचे वर्णन करताना शौर्य, दक्षता, बल, धैर्य, बुद्धिमत्ता या गुणांनी युक्त असलेला, राजनीतिसंबंधी कार्य शेवटास नेण्याचे कौशल्य असलेला, पराक्रम आणि प्रभावाचा आश्रय असलेला हे शब्द योजतात.
शौर्यं दाक्ष्यं बलं धैर्यं प्राज्ञता नयसाधनम्।
विक्रमश्च प्रभावश्च हनूमति कृतालयाः ॥
(उत्तरकाण्ड ३५.३)

 
हनुमानाने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि व्याकरणाचे सखोल अध्ययन केले होते. (उत्तरकाण्ड ३६ .४५-४८)जांबवान असे प्रतिपादन करतो की, हनुमान केवळ वीरच नाही, तर सर्व शास्त्रे जाणणारा विद्वानही आहे. (वीर वानरलोकस्य सर्वशास्त्रविदां वर। किष्किंधाकाण्ड ६६.२) एवढेच नाही, तर तो पराक्रमात वानरराज सुग्रीवासमान, तर तेज आणि बळात राम-लक्ष्मणासारखा आहे.
हनूमन् हरिराजस्य सुग्रीवस्य समो ह्यसि।
रामलक्ष्मणयोश्चापि तेजसा च बलेन च॥ (किष्किंधाकाण्ड ६६.३)
 
तो हनुमानाला असे म्हणतो की, “हे वानरश्रेष्ठा, तू बळ, बुद्धी आणि तेज तसेच पराक्रम याबाबतीत सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. त्यामुळे तू सीताशोधासाठी सज्ज हो.”जांबवानाच्या शब्दांमुळे हनुमानाला सीताशोधाच्या बाबतीत आलेली खिन्नता नष्ट होते आणि प्रयत्नांती तो अशोकवाटिकेत पोहोचतो.कौटिल्याने दूताच्या गुणांचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, राजाने बुद्धिमान, वाक्पटू, विद्वान्, दुसर्‍याचे मन जाणणारा, धैर्यशाली व यथायोग्य बोलणारा दूत निवडावा.(कौटिलीय अर्थशास्त्र १.१२.१६)कामन्दकीय नीतिसारात असे म्हटले आहे की, दूत इतरांचे रहस्य जाणणारा, उत्तम स्मरणशक्ती असलेला, सौम्य, तत्काळ कृती करणारा, पीडा आणि क्लेश सहन करणारा, दक्ष तसेच सर्वज्ञ असावा.
 
तर्केङ्गितज्ञ: स्मृतिमान्मृदुर्लघुपरिक्रमः ।
क्लेशायाससहो दक्षश्चरः स्यात्प्रतिपत्तिमान् ॥ (कामन्दकीय नीतिसार १२.२५)


या लक्षणांच्या कसोटीला हनुमान पुरेपूर उतरतो.राक्षसी सीतेला धमकावताना पाहून तो स्वतःशीच म्हणतो की, “मी स्वामीने नेमलेला दूत म्हणून गुप्तरूपाने शत्रूच्या शक्तीची माहिती मिळवत होतो. लंकेचे निरीक्षण करताना मला राक्षसांच्या तारतम्याचा आणि रावणाच्या प्रभावाचा अंदाज आला.” (सुंदरकाण्ड ३०.४-५)शोकामध्ये निमग्न झालेल्या सीतेला पाहून हनुमान अशी अटकळ बांधतो की, सीता पूर्वी कधीही दुःखाला सामोरी गेली नव्हती आणि आता ती शोकसागरात बुडलेली असल्याने दुःखाला अंत नाही, असे समजून प्राणत्याग करू शकते. हनुमान असा विचार करतो की, श्रीरामाला सीतेविषयी संदेश देऊन त्याचे सांत्वन करणे जसे उचित आहे, तसेच श्रीरामाचा संदेश सीतेला देऊन तिचे सांत्वन करणे उचित ठरेल. (सुंदरकाण्ड ३०.१०)हनुमानाला सोपविलेली कामगिरी सीतेचा शोध लावणे, एवढीच होती. तरीदेखील नेमलेल्या जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी तारतम्याने स्वतःकडेघेणे आणि ती पार पाडण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणे, यात हनुमानाची दूतकार्याविषयी प्रगल्भता दिसून येते.

दूताला अनेक भाषा अवगत असणे अपेक्षित आहे. हनुमान अनेक भाषांमध्ये निपुण होता. परंतु, केवळ भाषांमधील नैपुण्य संवाद साधण्यासाठी पुरेसे नाही तर समोरच्या व्यक्तीला साजेशी, सहजगत्या उमजेल अशी आणि हृदयस्पर्शी भाषा निवडण्याचे तारतम्य असणे आवश्यक असते. हनुमान संस्कृत भाषेत सीतेशी संवाद करण्याच्या विचारात होता. (वाचं चोदाहरिष्यामि मानुषीमिह संस्कृताम्॥ (सुंदरकाण्ड ३०.१७) पण त्याने पुन्हा असाही विचार केला की, ब्राह्मणाप्रमाणे संस्कृत भाषेत बोललो, तर मी बहुरूपी रावण आहे, असे वाटून सीता भयभीत होईल. (यदि वाचं प्रदास्यामि द्विजातिरिव संस्कृताम्। रावणं मन्यमाना मां सीता भीता भविष्यति॥ (सुंदरकाण्ड ३०.१८) सीता अयोध्येतून आलेली आहे. त्यामुळे अयोध्येच्या आसपासचे सर्वसाधारण लोक ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेचा प्रयोग सीतेशी संभाषण करताना केला पाहिजे.
 
अवश्यमेव वक्तव्यं मानुषं वाक्यमर्थवत्।
मया सान्त्वयितुं शक्या नान्यथेयमनिन्दिता॥ (सुंदरकाण्ड ३०.१९)
 
 
हा सारासार विचार बघता मत्स्यपुराणात दिलेली दूताची लक्षणे हनुमानाला तंतोतंत लागू पडतात, असे लक्षात येते. मत्स्यपुराणात म्हटले आहे की, राजाचा दूत जसे घडले तसे बोलणारा, निरनिराळ्या देशांच्या भाषा जाणणारा, कष्ट सहन करण्याची शक्ती असलेला, उत्तम वक्ता आणि देशाचा इतिहास व भूगोल जाणणारा असावा.

यथोक्तवादी दूतः स्याद्देशभाषाविशारदः।
शक्तुः क्लेशसहो वाग्मी देशकालविभागवित्॥ (मत्स्यपुराण २१५.१२)
 
हनुमान विचार करतो की, सीतेशी बोलताना बघून राक्षसी आणि राक्षस एकत्र येऊन मला पकडतील. त्यामुळे मी तर बंदिवान होईनच, शिवाय सीतेचाही मनोरथ पूर्ण होणार नाही. मी स्वतः राक्षसांशी युद्ध करण्यास समर्थ आहे. परंतु, युद्धामध्ये कोणत्या पक्षाचा विजय होईल. याविषयी निश्चितता नसते आणि मला संदिग्ध कार्य प्रिय नाही. (सुंदरकाण्ड ३०.३४) यासंदर्भात हनुमान असेही म्हणतो की, अविवेकी दूताच्या हातात सोपविलेली कार्ये सफल होण्याच्या बेतात असतांनाही देश आणि काळाचा विचार न केल्यामुळे नष्ट होतात. भूताश्चार्था विरुध्यन्त देशकालविरोधिताः।विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा॥ (सुंदरकाण्ड ३०.३७) अर्थ आणि अनर्थ याविषयी स्वामीची बुद्धी निश्चित असते. पण अविवेकी दूतामुळे अनर्थ घडतो. स्वतःला बुद्धिमान समजणारे दूत कार्याचा नाश करतात.


अर्थानर्थान्तरे बुद्धिर्निश्चितापि न शोभते।
घातयन्ति हि कार्याणि दूताः पण्डितमानिनः॥ (सुंदरकाण्ड ३०.३८)

 
मधुर वाणीचा प्रयोग करून श्रीरामाचा संदेश सीतेला सांगेन, या निष्कर्षाला येऊन हनुमानाने सीतेशी संवादास प्रारंभ केला. सीतेला विश्वास वाटावा म्हणून त्याने दशरथाचे यथायोग्य वर्णन करून रामाचा वनवास आणि सीतेचे अपहरण याविषयी वृत्तांत थोडक्यात सांगितला आणि तो तिच्या शोधासाठी आलेला आहे असे निवेदन केले. सीतेने त्याला प्रणाम करून अपहरणाचा साद्यन्त वृत्तांत सांगितला. हनुमानाने रामाच्या अवस्थेचे वर्णन करून सीतेला असे निवेदन केले की, तो तिच्याकडे श्रीराम आणि सुग्रीव या दोघांचाही दूत म्हणून आला आहे. तिने त्याला तिची सेवा कशाप्रकारे करावी, हे सांगावे किंवा परत जाण्याची अनुज्ञा द्यावी. (सुंदरकाण्ड ३५.८९)तो रामाचा दूत आहे, असा सीतेला विश्वास वाटावा म्हणून रामाचे नाव कोरलेली अंगठी त्याने तिला दिली आणि तिचे दुःख आता समाप्त होईल, असे आश्वासन दिले.


वानरोऽहं महाभागे दूतो रामस्य धीमतः।
रामनामाङ्कितं चेदं पश्य देव्यङ्गुलीयकम्॥
प्रत्ययार्थं तवानीतं तेन दत्तं महात्मना।
समाश्वसिहि भद्रं ते क्षीणदुःखफला ह्यसि॥ (सुंदरकाण्ड ३६.२- ३)


हनुमानाने सीतेला पाठीवर बसवून आकाशमार्गाने रामाकडे नेण्याची तयारी दर्शविली. (सुंदरकाण्ड ३७.२६) परंतु, सीतेने यासाठी अनुमती दिली नाही. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ अनेक कारणे देताना ती असे म्हणाली की, रामाव्यतिरिक्त दुसर्‍या कोणत्याही पुरुषाला ती स्पर्श करू इच्छित नाही. (सुंदरकाण्ड ३७.६२) रावणाने तिला बळजबरीने स्पर्श केला आहे, त्याबाबतीत ती असाहाय्य होती. रामासाठी सीतेने असा संदेश दिला की, रामाने तिला नेण्यासाठी यावे. हनुमानभेटीची खूण म्हणून तिने रामाकरिता हनुमानाला तिचा दिव्य चूडामणी दिला.हनुमानाने यानंतर रावणाच्या सैन्याचे बल जाणण्याचा निश्चय केला आणि चैत्यप्रासादाची तोडफोड केली. अशोकवनाचा विध्वंस केला. परिणामी, रावणाच्या आदेशानुसार राक्षसांनी हनुमानाच्या शेपटीला आग लावली. त्यानंतर लंकादहन केल्यावर हनुमानाला सीतेच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटली आणि त्याने पुन्हा एकदा तिची भेट घेतली. परतीचा प्रवास संपल्यावर हनुमानाने श्रीरामाला सीतेविषयी वृत्तांत सांगितला.
 
‘दासमारुती’ आणि ‘वीरमारुती’ अशी हनुमानाची दोन रूपे आहेत. रामासमोर विनयाने हात जोडून उभा ही दासमारुतीची, तर युद्धाच्या पावित्र्यात असलेली प्रतिमा वीरमारुतीची असते. हनुमान चिरंजीव मानला जातो. तो नाथ संप्रदायातील ‘ध्वजनाथ’ या उपपंथाचा प्रवर्तक मानला जातो. रामदासी संप्रदायाचे हनुमान हे आराध्यदैवत आहे. तुलसीदासांनी काशीमध्ये त्याची मंदिरे उभारली. स्वामी विवेकानंद आपल्या शिष्यांना हनुमानाचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवायला सांगतात. ते म्हणतात, “महाजितेन्द्रिय, महाबुद्धिमान, दास्यभावाच्या या थोर आदर्शानुसारच तुम्ही आपली जीवने घडवायला हवी.”

 
- डॉ. कला आचार्य