विक्रमी ‘इस्रो’

    03-Apr-2023   
Total Views |
Indian Space Research Organization progress
 

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने आपल्या स्थापनेपासूनच नवनवीन विक्रम रचले आहेत. एकेकाळी अंतराळ क्षेत्रातील प्रगत देशांकडून तंत्रज्ञान नाकारल्या गेलेल्या भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून बड्या राष्ट्रांचे उपग्रह अतिशय कमी किमतीत प्रक्षेपित करण्यास प्रारंभ केला आहे. ‘चांद्रयान’ असो की ‘मंगळयान’, प्रत्येकवेळी ‘इस्रो’ने जगाला चकीत करणारी कामगिरी केली आहे. त्याचे आकलन...

भारत एक असे रॉकेट निर्माण करीत आहे, जे अवकाशात उपग्रह पाठवेल आणि परत येईल. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने रविवारी पुन्हा वापरता येण्याजोगे ‘लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लॅण्डिंग मिशन’ ‘आरएलव्ही एलईएक्स’ची यशस्वी चाचणी केली. पुन्हा वापरता येणारा प्रक्षेपण वाहन उपग्रह पाठवल्यानंतर तो पृथ्वीवर परत येईल. याद्वारे आणखी एक उपग्रह पुन्हा प्रक्षेपित केला जाऊ शकतो. आतापर्यंत उपग्रह प्रक्षेपण वाहने आकाशात गेल्यावर नष्ट होत होती. मात्र, आता ‘आरएलव्ही’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रह पाठवण्याचा खर्च कमी होईल. म्हणजेच भारत भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमा कमी खर्चात पूर्ण करू शकेल. एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ ही पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाची यशस्वी चाचणी करणारी पहिली खासगी कंपनी ठरली होती.

‘आरएलव्ही’ एकात्मिक नेव्हिगेशन प्रणाली, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीसह तयार केले आहे. हे प्रक्षेपण वाहन भविष्यात भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हे प्रक्षेपण वाहन भविष्यातील अंतराळ मोहिमांच्या खर्चात लक्षणीय घट करेल. यामुळे उपग्रह पाठवण्याच्या खर्चात लक्षणीय घट होईल. ‘इस्रो’चे ‘रियुजेबल लॉन्च व्हेईकल’ हे ‘नासा’च्या ‘स्पेस शटल’सारखे आहे. हा प्रकल्प २०३०पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हे रॉकेट दहा हजार किलोंपेक्षा जास्त वजन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम असेल.

कोणत्याही ‘रॉकेट मिशन’मध्ये प्रामुख्याने दोन मूलभूत गोष्टी असतात. त्या म्हणजे रॉकेट आणि अवकाशयान. रॉकेटचे काम अंतराळयानाला अवकाशात नेणे हे आहे. त्याचे काम केल्यानंतर, रॉकेट सहसा समुद्रात सोडले जाते. म्हणजेच ते पुन्हा वापरले जात नाही. बर्‍याच काळापासून, जगभरात अशा प्रकारे मोहिमा राबविल्या जात होत्या. मात्र, पुन्हा नवे रॉकेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळेच पुन्हा वापरत्या येणार्‍या रॉकेटवर संशोधन सुरू झाले. पुन्हा वापरता येण्याजोग्या रॉकेटमागील कल्पना म्हणजे अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी वापरण्यात येणारे अतिमहागडे रॉकेट ‘बूस्टर’ पुनर्प्राप्त करणे, जेणेकरून इंधन भरल्यानंतर ते पुन्हा वापरता येतील. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेस एक्स’ने २०११ साली यावर काम करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर २०१५ साली ‘स्पेस एक्स’ने ‘फाल्कन ९’ हे पुन्हा वापरण्याजोगे रॉकेट विकसित केले.

मात्र, ‘इस्रो’चे ‘रियुजेबल लॉन्च व्हेईकल’ ‘स्पेस एक्स’पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मोहिमेदरम्यान, ‘स्पेस एक्स’ रॉकेटच्या खालच्या भागाचे संरक्षण करते. तर ‘इस्रो’च्या तंत्रज्ञानानुसार रॉकेटच्या वरच्या भागाचे संरक्षण करणार आहे. ‘इस्रो’ दीर्घकाळापासून पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनावर काम करत आहे. हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. रविवारी म्हणजे, दि. २ एप्रिल रोजी ‘इस्रो’ने आपल्या वाहनाचा स्वायत्त ‘लॅण्डिंग’ प्रयोग केला. ‘स्वायत्त लॅण्डिंग’ म्हणजे अंतराळयान कोणत्याही मदतीशिवाय उतरू शकते. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, जगात प्रथमच ’विंग बॉडी’ हेलिकॉप्टरच्या मदतीने साडेचार किमी उंचीवर उचलून धावपट्टीवर ‘स्वायत्त लॅण्डिंग’साठी सोडण्यात येणार आहे. ‘आरएलव्ही’ने भारतीय वेळेनुसार सकाळी ७.१० वाजता भारतीय वायुसेनेच्या ‘चिनूक’ हेलिकॉप्टरमधून साडेचार किलोमीटर (समुद्र सपाटीपासून) उंचीवर उड्डाण केले. ‘सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अ‍ॅण्ड सर्टिफिकेशन’, ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ आणि ‘एरियल डिलिव्हरी रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ यांनीही चाचणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्रास विशेष प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले आहे. केंद्र सरकारने नुकतेच अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांनादेखील अंतराळ क्षेत्रामध्ये येण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण होणार असून त्याद्वारे स्वदेशी तंत्रज्ञानदेखील विकसित होण्यास वेग येणार आहे.पुन्हा वापरत्या येणार्‍या रॉकेटचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रारंभ करून ‘इस्रो’ने जागतिक अंतराळ क्षेत्रामध्ये प्राबल्य निर्माण करण्याचे आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. ‘इस्रो’ सध्या जगभरातील देशांसाठी अतिशय कमी किमतीत उपग्रह प्रक्षेपित करण्याची सोय उपलब्ध करून देते. त्यामुळे भारत अंतराळ क्षेत्रासाठी मोठी बाजारपेठदेखील ठरली आहे. पुन्हा वापरत्या येणार्‍या रॉकेटचे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यानंतर भारताच्या पुढील अंतराळ मोहिमांना निश्चितच बळ येणार आहे. भारताचे ‘चांद्रयान’ आणि ‘गगनयान मिशन’ सध्या प्रस्तावित आहे. त्यानंतर ‘सूर्य मिशन’देखील हाती घेण्याचे ‘इस्रो’ने ठरविले आहे. म्हणूनच या नव्या रॉकेटचा या पुढील मोहिमांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.