सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात हे दुर्दैव

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    03-Apr-2023
Total Views |
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray

मुंबई
: ''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात होता, त्यावेळी शिवसेना गप्प होती. जर उद्धव ठाकरेंकडे स्वाभिमान असता तर त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे काँग्रेसींना जोडे मारण्याचे काम केले असते. मात्र खरी शिवसेना आता भाजपसोबत असल्याने राहुल गांधींना जोडे मारण्याचेही काम आम्हाला करावे लागत आहे. स्वतःला सावरकरवादी म्हणवून घेणारे सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत हे दुर्दैवी आणि शरमेची बाब आहे,'' या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी मुंबईच्या कांदिवली येथे आयोजित सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेसचे अपात्र खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर 'गौरव यात्रा' काढण्यात येत आहे. या सभेला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर,आमदार सुनील राणे,शिवसेना नेते आनंद अडसूळ यांच्यासह शिवसेना भाजपचे नेते आणि स्थानिक कांदिवलीकर राहवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.}

सावरकरांच्या त्यागाची त्या हरामखोरांना कल्पना नाही !

राहुल गांधींवर टीकास्त्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''काँग्रेसला कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांची भीती वाटत राहिलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस असोत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कधीही काँग्रेसने स्वीकारले नव्हते हा इतिहास आहे. काँग्रेसची मंडळी स्वातंत्र्य लढ्यात आपले लोक असल्याचे सांगते, मात्र ते सांगत असलेल्या नेत्यांना आणि सावरकरांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेत जमीन अस्मानाचा अंतर होते हे सर्वांना मान्य आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले सावरकरांवर बोलतात, त्यांना याची जराही लाज वाटत नाही. सावरकरांवर टीका करण्याची तुमची लायकीच नाही. सावरकरांच्या त्यागाची आणि इतरांची तुलना होऊच शकता नाही. अकरा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांच्या त्यागाची या हरामखोरांना कल्पनाच नाही,'' या शब्दांत फडणवीसांनी राहुल गांधींना खडसावले आहे.

आम्ही भगवा कदापि सोडणार नाहीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या टीकाकारांचा फडणवीसांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. ''आजकाल कुणीही उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. पण सूर्यावर थुंकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ही थुंकी आपल्याच तोंडावर पडते हा इतिहास आहे. त्यामुळे थुंकी अंगावर पडलेल्यांच्या चेहरा पाहायची आमचीही आता इच्छाच राहिलेली नाही. जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कुणी करेल आणि तुम्ही ते सहन करत असाल तर तुम्हाला त्याचे उत्तर द्यावे लागेल. तुम्ही सत्तेसाठी कुणासोबतची जा आणि आघाडी करा, आम्ही आमचे हिंदुत्व आणि आमचा प्राणप्रिय भगवा कदापि सोडणार नाहीत,'' अशी वल्गना फडणवीसांनी यावेळी केली आहे.