बिहारमधील सासाराम आणि नालंदातील अनेक गावं दंगलीच्या आगीत होरपळत असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम नवमीनंतर सुरू झालेल्या या दंगलीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कथित सुशासनावर प्रश्न निर्माण झाले. घरांवर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि मरणाच्या भीतीने सासाराम आणि नालंदातील शेकडो जण आपल्या घरांना टाळे लावून गाव सोडून गेली आहेत. शाळा, महाविद्यालये, इंटरनेट सेवा बंद असून अनेक ठिकाणी ‘कर्फ्यू’ लावण्यात आला. सासाराममधील सैफुलगंज, कादीरगंज आणि शहजलाल पीर येथील दंगलीने भयभीत शेकडो कुटुंबांनी घराला टाळे लावून पलायन केले आहे. जळलेली घरे दंगलीची साक्ष देत असून एकतर लोक रडत आहे किंवा घर सोडून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्याजवळ शिल्लक नाही. प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन नितीश यांनी वरवरची मलमपट्टी सुरू केली असली तरी पेटती शहरे कधी शांत होणार, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. नालंदात ८० तर सासाराममध्ये ३२ जणांना अटक करण्यात आली असून, ‘कर्फ्यू’सहित इंटरनेट सेवा बंद आहे. दंगलीने भयभीत लोकांना आता तेथील पोलीस प्रशासनाचीही भीती वाटत आहे. कारण, निष्पापांचीदेखील धरपकड पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान, बिहार दंगलीच्या मार्गावर आहे. जिथे जंगलराज प्रणेते लालूप्रसाद यादव यांचा पक्ष सत्तेत असेल तिथे शांतता नांदेल तरी कशी. भाजप सरकार आले, तर दंगेखोरांना उलटे लटकवू, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शाह यांनी दंगेखोरांना इशारा दिला आहे. दंगलग्रस्त परिसरात एकतर पोलीस किंवा टाळे लावलेली घरे अशा दोनच गोष्टी दिसत आहेत. हिंसाचार आणि दंगलीने बंगाल धुमसत असताना आता बिहारदेखील बंगालच्या वाटेवर चालला आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैरानामधील हिंदूंच्या पलायनाप्रमाणेच आता बिहारमध्ये परिस्थिती दिसून येते. कैरानातील ३०० हून अधिक हिंदू कुटुंबांनी धर्मांधांच्या गुंडागर्दी, हिंसेमुळे घरे विकायला काढून पलायन केले होते. दहशतीने हिंदूंना घर सोडण्याची नामुश्की ओढवली होती. स्वतःच्या हक्काच्या घरावर घर विकण्याची सूचना लिहावी लागली होती, ती केवळ मारले जाऊ या भीतीनेच! आज दुर्देवाने त्याचीच पुनरावृत्ती सासाराम आणि नालंदात होऊ पाहते आहे.
मुघल इतिहासाला कात्री
योगी आदित्यनाथ सरकारने इतिहास विषयाच्या पुस्तकांमध्ये मोठा बदल केला आहे. ज्यामुळे यापुढे आता उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मुघलांचा इतिहास शिकविला जाणार नाही. हा बदल इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि ‘सीबीएसई’ बोर्डाने शैक्षणिक सत्र २०२३-२४च्या अभ्यासक्रमात मोठा बदल करत मुघलांशी संबंधित धडे अभ्यासक्रमातून हटविले आहेत. इयत्ता बारावीच्या पुस्तकातील ‘भारतीय इतिहास के विषय द्वितीय’मधून शासक, मुघल दरबार भाग हटविण्यात आले आहे. यात ‘अकबरनामा’ (अकबराच्या शासनकाळातील इतिहास), ‘बादशाहानामा’ (मुघल सम्राट शाहजहानचा इतिहास), ‘पांडुलिपीयो की रचना’, ‘मुघल शासक और उनका साम्राज्य’ या विषयांचा समावेश होता. सोबत शाही, नोकरशाही, शाही परिवार, मुघल अभिजात वर्ग आणि औपचारिक धर्माविषयीदेखील शिकविण्यात येत होते. याचबरोबर इयत्ता अकरावीच्या पुस्तकामध्ये ‘इस्लाम का उदय’, ‘संस्कृतीयो मे टकराव’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘समय की शुरूआत’ हे धडे काढण्यात आले. इयत्ता बारावीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्धाशी संबंधित भाग हटविण्यात आला आहे. ‘स्वतंत्र भारत मे राजनिती’ या पुस्तकातून ‘एक दल के प्रभुत्व का दौर’, ‘जनआंदोलनो का उदय’ हे धडेही काढण्यात आले आहे. इयत्ता दहावीच्या पुस्तकातील ‘जनसंघर्ष आणि आंदोलन’, ‘लोकतंत्र आणि विविधता’ आणि ‘लोकतंत्र की चुनौतिया’ आदी धडे हटविण्यात आले आहे. दरम्यान, योगी सरकारने असा निर्णय काही पहिल्यांदा घेतलेला नाही. यााधीही २०२० साली आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ असे ठेवण्यात आले होते. त्यावेळी योगींच्या या निर्णयाचे केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर महाराष्ट्रातूनही जोरदार स्वागत झाले होते. उत्तर प्रदेशात गुलामगिरीची मानसिकता दर्शविणार्या प्रतीक चिन्हांना कोणतेही स्थान नसल्याचे त्यावेळी योगींनी विरोधकांना ठणकावले होते. दंगली, हिंसाचार, माफियाराज, गुंडागर्दी या सगळ्यांवर योगींनी चांगलाच वचक बसवलेला आहे. त्यात आता मुघलांचा इतिहासही पुसला जाणार आहे. त्यामुळे हिंदुत्वाची खरी परिभाषा योगी दाखवून देत आहे, हे नक्की.