मोमोज प्रेम आणि म्हशींचे बळी ; काय आहे सहसंबंध ?

    25-Apr-2023   
Total Views |

wild buffaloes



मानवी आयुष्यात सध्या तयार जेवण, ‘टू मिनिट्स फूड’ची भलतीच फॅशन आहे. या फॅशनबरोबरच वेळेची कमतरता असल्यामुळे हे ‘रेडी टू इट फूड’ लोकप्रिय ठरलेले दिसते. मात्र, बेकरी प्रॉडक्ट्सचा मारा, ‘रेडी टू इट फूड’ या आणि अशा इतर तत्सम पर्यायांचा आपल्या आहारात समावेश केल्यामुळे शरीरावर अनेक गंभीर परिणामही होतात. वेगवेगळ्या आरोग्य समस्यांमध्ये शरीरात स्थुलपणा येणे, साखरेचे प्रमाण वाढणे, तसेच स्त्रियांमध्येही काही आरोग्य समस्या आढळून आल्या आहेत. मेदयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळेही पोटाचे विकार उद्भवल्याची कित्येक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारच्या जंक फूडमध्ये मोमोज अर्थात ‘डंप्लिग्ंज’ या पदार्थाबद्दल एक वेगळे आकर्षण परदेशात आणि हल्ली भारतातही दिसून येते.

मोमोज म्हणजे मोदकासारख्या आकाराचा एक पदार्थ. मैद्याच्या आवरणात मसालेदार किसलेले मांस आणि विविध सॉसेसची यामध्ये भर असते. मोमोज किंवा डंप्लिग्ंज यांचा उगम नेपाळ आणि तिबेटमधून झाला. नेपाळ आणि तिबेट या देशांमधून उगम पावलेला हा पदार्थ अलीकडच्या काळात भारतातही तितकाच लोकप्रिय झाला. मोमोजमध्ये शक्यतो चिकन किंवा बकर्‍याचे मांस वापरले जाते. मात्र, काही देशांत यासाठी चक्क म्हशींचे मांस वापरण्यात येते, असेही आढळून आले आहे. म्हशींचे मांस असलेल्या या मोमोजला चांगला भाव आणि मागणी आहे. नेपाळमध्ये सर्वाधिक मागणी असलेले मोमो हे म्हशीच्या मांसापासून तयार केले जातात, म्हणूनच या देशाच्या शहरी भागात या मांसाला जास्त मागणी आहे.

या मोमोजमध्ये वापरले जाणारे मांस हे जंगलातील म्हशींचे असून, त्यासाठी केलेल्या त्यांच्या बेसुमार शिकारीमुळे आता नेपाळमध्ये जंगलातील म्हशींची संख्या कमी झाली आहे. कोशी टप्पु वन्यजीव अभयारण्यातील वन्य म्हशींसाठी उरलेल्या काही राखीव क्षेत्रांमध्ये सीमावर्ती भागातील नागरिक आपल्या पाळीव म्हशींना त्या क्षेत्रात सोडतात. पाळीव आणि जंगली म्हशींचे प्रजनन होऊन त्यांची संख्या वाढवण्यासाठी हा उपाय केला जात असला तरी, पाळीव आणि धोक्यात असलेल्या जंगली म्हशींचे संकरित प्रजनन करणे हे बेकायदेशीर आहे. कारण, त्यामुळे जंगली म्हशींच्या संख्येला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु, मांसाला जास्त मागणी असल्यामुळे आणि संकरित मादी जास्त दूध देते, या विश्वासामुळे नेपाळमध्ये अशाप्रकारे बेमालुमपणे असले प्रयोग केले जातात. राखीव क्षेत्रातील परिसरातील पाळीव म्हशींचे सर्वेक्षण केलेला एक अहवाल त्या म्हशींमध्ये जंगली म्हशींसारखे वैशिष्ट्ये आढळून आल्याचे सांगतो.

‘आययुसीएन’ म्हणजेच ‘इंटरनॅशल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर’ या संस्थेच्या मते, जंगलातील म्हशी ज्यांना नेपाळच्या स्थानिक भाषेत ‘अरना’ असे संबोधले जाते, त्या पूर्वी बांगलादेश, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशांमध्येही अस्तित्वात होत्या. मात्र, आता नेपाळ, भारत, भूतान, कंबोडिया, म्यानमार आणि थायलंड एवढ्या देशांपुरतेच त्यांचे अस्तित्व मर्यादित राहिले आहे. या म्हशींची संख्या गेल्या 30 वर्षांत 50 टक्क्यांनी कमी झाली आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे पाळीव आणि जंगली म्हशींचे संकर हेच मानले जाते.

वन्य आणि पाळीव प्राण्यांमधील अशा प्रकारच्या संकरामुळे फुट आणि माऊथ रोग यांसारख्या रोगांचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे आधीच धोक्यात असलेल्या या प्रजातीबाबतीत आणखी धोका पत्करता येऊ शकत नाही. नेपाळच्या पशुधन उद्योगात म्हशींचा मोठा वाटा असला तरी कमी प्रजनन क्षमता आणि उत्पादकता हे त्यातले प्रमुख अडथळे आहेत. म्हैस ही प्रमुख दुग्ध उत्पादनाचा आणि पशुधनाचा स्रोत असली तरी स्थानिक शेतकर्‍यांना म्हशींच्या प्रजननासाठी स्वतंत्र सुविधा (रेतन) उपलब्ध करून देणे अधिक सोयीस्कर होईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. जेणेकरून त्यांना त्यांच्या पाळीव म्हशी जंगली म्हशींसाठीच्या राखीव क्षेत्रात सोडण्याची गरज भासणार नाही. परिणामी, या पाळीव आणि जंगली म्हशींच्या संकराला आळा बसेल आणि धोक्यात आलेल्या या जंगली म्हशींच्या प्रजातीचे संरक्षणही होईल. मात्र, ते काहीही असले तरी अशाप्रकारे केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एका संपूर्ण वन्यजीवांच्या प्रजातीचा बळी देणे, हे सर्वार्थाने स्वार्थीपणाचेच लक्षण म्हणावे लागेल. नेपाळ सरकारने याकडे वेळीच लक्ष देऊन ही कत्तल रोखावी, हीच किमान अपेक्षा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.