लक्ष ‘प्रचंड’ दौर्‍याकडे...

    25-Apr-2023   
Total Views |
 
 Pushpa Kamal Dahal
 
 
भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड हे येत्या मे महिन्यात भारत दौर्‍यावर येणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच दौरा असेल. तत्पूर्वी त्यांनी भारताविषयी अभ्यास करून गृहपाठ पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. खास याकरिता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ‘ग्राऊंड वर्क’ सुरू केले आहे. प्रचंड यांचा भारत दौरा अनेकदा पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी गुरुवार, दि. 20 एप्रिलपर्यंत भारत दौर्‍यावर येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर शुक्रवार, दि. 28 एप्रिलला ते भारतात येणार असल्याचे ठरले. मात्र, अखेर येत्या मे महिन्यात त्यांच्या भारत दौर्‍यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते. इथे हेही लक्षात घ्यायला हवे की, 2007-09 या कालखंडात प्रचंड यांच्या नेपाळचे पंतप्रधान होण्यामागे भारताचे महत्त्वाचे योगदान होते.
 
गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2022 मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान प्रचंड हे भारतात आले होते. तेव्हा यादरम्यान त्यांनी भाजप आणि भारत यांच्याशी त्यांचा पक्ष आणि देश यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली होती. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही उपस्थित होते. ’आपला पक्ष (कम्युनिस्ट पार्टी) आणि भाजपची विचारधारा भिन्न असली तरी समाजातील गरीब वर्गाचे उत्थान करणे, हे समान उद्दिष्ट असल्याचे प्रचंड यांनी तेव्हा म्हटले होते. भारतासोबतच्या नेपाळच्या व्यापारी तुटीवर चिंता व्यक्त करत सर्व प्रलंबित प्रश्न परस्पर विश्वास आणि मैत्रीच्या भावनेने सोडवण्याची गरज असल्याचेही प्रचंड यांनी म्हटले होते. त्यांनी जलविद्युत आणि पर्यटन हे नेपाळच्या अर्थव्यवस्थेचे दोन महत्त्वाचे स्तंभ म्हणून गेल्या दौर्‍यात अधोरेखित केले होते, तर भारत सरकार आणि भारतीय खासगी क्षेत्र या दोन क्षेत्रांना आपल्या देशाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. विशेष म्हणजे, त्यांनी नेपाळकडून वीज विकत घेतल्याबद्दल आणि भूकंप तसेच ‘कोविड-19’ साथीच्या काळात आपल्या देशाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे विशेष कौतुकही केले होते. त्यामुळे यंदाच्या त्यांच्या भारत दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रचंड यांच्या भारत दौर्‍याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी द्विपक्षीय संबंधांना चालना देणे, व्यापार, ऊर्जा, कृषी, संस्कृती आणि हवाई सेवा या विषयांवर ते भारतासोबत प्रामुख्याने चर्चा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत काम सुरू केले असून, त्यासंबंधित बैठकांचेही आयोजन करण्यात आल्याचे एका वृत्तातून मिळाळेल्या माहितीवरून सांगण्यात येत आहे. भारताचे नेपाळशी अनेक शतकांपासून भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. अशा दौर्‍यांतून हे संबंध आणखी दृढ करणे दोन्ही देशांच्या दृष्टीने एकप्रकारे महत्त्वाचे आहे. कारण, के. पी. शर्मा ओली पंतप्रधान असताना नेपाळने भारताशी सीमावाद उकरुन काढला होता. शिवाय भगवान श्रीराम आणि रामजन्मभूमीविषयीही वादग्रस्त विधाने केली होती. असे असले तरीही सीमा सुरक्षेच्या दृष्टीनेही नेपाळ हा भारतासाठी महत्त्वाचा घटक आहे. साधारण 1,751 किमी लांबीच्या नेपाळ-भारताच्या सीमेलगत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम ही पाच राज्ये आहेत. तसेच, नेपाळच्या एकूण 75 जिल्ह्यांपैकी 23 जिल्हे भारताच्या सीमेलगत आहेत. बिहारमध्ये नेपाळसह 12 जिल्हे, आठ युपीसह, दोन पश्चिम बंगालसह (बिहारसह एक), चार उत्तराखंड (पश्चिम बंगालसह दोन, सिक्कीमसह एक आणि युपीसह एक) जिल्हे आहेत. अशा परिस्थितीत सीमा सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध आणखी मैत्रीपूर्ण होणे गरजेचे आहे.
 
प्रचंड यांच्या भारत दौर्‍यापूर्वी लेखक विजय चौथाईवाले यांनी केलेला नेपाळ दौरा चांगलाच चर्चेत आहे. विजय चौथाईवाले हे भाजपच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुखही आहेत. नेपाळच्या भेटीदरम्यान, चौथाईवाले यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आणि नंतर ते भारतात परतले. इतकेच नव्हे, तर ते मानसखंड परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणूनही उपस्थित होते. या सर्व घडामोडींनंतर प्रचंड यांनी पुन्हा एकदा भारत दौरा करायचे ठरवले असल्याने या दौर्‍याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक