माफिया अतिक अहमदच्या हत्येचा बहारीनला पुळका!

    24-Apr-2023   
Total Views |
 
Atiq Ahmed
 
 
अतिकसारख्या माफियांना गोळ्या घालून मारल्याबद्दल बाहेरच्या देशाने गळा काढून रडण्याचे काहीच कारण नव्हते. भारतातील मुस्लीम सुरक्षित आहेत. त्यांची काळजी घेण्यास देशाचे सरकार समर्थ आहे. बाहेरच्या कोणी उगाच आमच्या देशात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये, असे बहारीनला ठणकावून सांगण्याची गरज आहे.
 
भारतात कोणा मुस्लिमाची हत्या झाली की त्याचा लगोलग पुळका येणारे काही मुस्लीम देश आहेत. संबंधित इसमाची हत्या का झाली, हत्या झालेल्या इसमाची किती जबरदस्त दहशत होती, अशा कशाचाही विचार न करता, असे देश भारतात मुस्लिमांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगून लगेच गळे काढायला तयार असतात. माफिया अतिक अहमद आणि त्याच्या भावाची प्रयागराजमध्ये अलीकडेच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लगेच अरब जगतातील बहारीन या देशाने अतिकची हत्या हिंदू दहशतवाद्यांनी केली असल्याचा निष्कर्ष काढला. भारत हा अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करणारे जे देश आहेत, त्या देशांच्या पंक्तीत बहारीनचा अंतर्भाव करावा लागेल.
 
माफिया अतिक अहमद आणि त्याच्या भावाची पोलिसांदेखत जी हत्या झाली, त्याचा बहारीनच्या संसदेने निषेध केला. खरे म्हणजे, काही माहिती जाणून न घेता बहारीनच्या संसदेने असा आगाऊपणा करण्याचे काहीच कारण नव्हते. भारतात हिंदू दहशतवाद वाढत चालल्याबद्दलही संसदेने चिंता व्यक्त केली. बहारीन आणि अरबजगतामध्ये भारतीय समाजास आदराने वागविले जाते. हिंदू समाजाचे येथे संरक्षण केले जाते, असेही बहारीनच्या संसदेने म्हटले आहे. असे असले तरी कोणतीही माहिती किंवा संदर्भ जाणून न घेता, भारतातील मुस्लीम समाजावर अन्याय होत असल्याची पोपटपंची करीत राहणे हे अस्वीकारार्हच आहे. त्या देशाच्या शासनकर्त्यांच्या हे लक्षात यायला हवे. बहारीनच्या संसदेचे सदस्य एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भारत सरकारच दहशतवादी आहे, असे म्हटले. भारतात मुस्लिमांचा जो रक्तपात होत आहे, तो थांबविण्यासाठी निर्णय घ्यायला हवा, असेही त्या सदस्यांनी म्हटले आहे. भारतातील मुस्लिमाना संरक्षण मिळायला हवे, असे संपूर्ण अरबजगताने भारतास सांगावे, अशी मागणीही या सदस्यांनी केली आहे.
 
भारतातील घटनांशी अरबजगताचा काहीही संबंध नसताना भारताच्या अंतर्गत घटनांमध्ये नाक खुपसण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याचा धिक्कार करायला हवा. अशा देशांना पाकिस्तान, बांगलादेश अशा देशांमध्ये तेथील हिंदूंच्यावर जे अत्याचार होतात, ते कधी दिसले नाहीत का? त्याबद्दल कधी चकार शब्द त्या देशांनी काढला आहे का? कधीच नाही! अतिक अहमद गुंड होता. त्याची प्रचंड दहशत होती. कित्येक कोटींची माया त्याने जमा केली होती. त्याचे पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी आणि ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध होते, त्याच्याविरुद्ध असंख्य गुन्हे होते, ही माहिती बहारीनच्या संसदेने जाणून घेण्याचा प्रयत्न नाही का केला? सरकारने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. पण, अतिकच्या कुकृत्यांमुळे संतप्त झालेल्यांनी त्याची हत्या केली. न्यायप्रक्रिया पूर्ण करून त्यास शासन व्हायला हवे होते, हे खरे आहे. पण, अशा माफियांना गोळ्या घालून मारल्याबद्दल बाहेरच्या देशाने गळा काढून रडण्याचे काहीच कारण नव्हते. भारतातील मुस्लीम सुरक्षित आहेत. त्यांची काळजी घेण्यास देशाचे सरकार समर्थ आहे. बाहेरच्या कोणी उगाच आमच्या देशात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये, असे बहारीनला ठणकावून सांगण्याची गरज आहे.
 
 

Atiq Ahmed 
 
 
कॅनडामध्ये वैशाखी नगर कीर्तनाच्या नावाखाली भारतविरोधी प्रचार!
 
इंग्लंड, ऑस्ट्रेलियाप्रमाणे कॅनडामध्ये खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देणारे आणि त्यासाठी सर्व ती मदत पुरविणार्‍या व्यक्ती आणि संघटना आहेत. खलिस्तानच्या निर्मितीची स्वप्ने असे फुटीरतावादी पाहत आहेत. विदेशातील हिंदू समाजास कशाप्रकारे दुखविता येईल, असा प्रयत्न हे फुटीरतावादी करीत आहेत. खलिस्तानवादी अमृतपालला डोक्यावर घेणार्‍यांमध्ये अशा फुटीरतावाद्यांचा समावेश आहे हे काही सांगायला नको! कॅनडामध्ये तर असे फुटीरतावादी बरेच सक्रिय आहेत. गेल्या 22 एप्रिल रोजी कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया राज्यातील सरी या शहरात वैशाखीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीचेनिमित्त साधून खलिस्तावाद्यांनी आपला विचार रेटण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या वैशाखीनिमित्तच्या मिरवणुकीत खलिस्तानचे झेंडे, जर्नेलसिंग भिंद्रनवाले याची छायाचित्रे असलेले फलक झळकत होते. त्याचप्रमाणे अमरिकसिंग, सुरिंदरसिंग अशा खलिस्तान समर्थकांची पोस्टर्सही या मिरवणुकीत होती. या मिरवणुकीत सात लाख लोक सहभागी होतील, असा दावा या मिरवणुकीचे आयोजक मोनिंदरसिंग यांनी 17 एप्रिल रोजी केला होता. पण, या मिरवणुकीच्या ज्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या, त्यावरून काही हजार लोकच या मिरवणुकीत सहभागी झाले होते. कॅनडासारख्या देशात हजारो खलिस्तानी समर्थक वैशाखीचेि नमित्त साधून खलिस्तानचा प्रचार करण्यासाठी एकत्र येतात, ही अत्यंत गंभीर बाब मानायला हवी.
 
पण, या मिरवणुकीमध्ये खलिस्तानचा जो प्रचार सुरू होता, त्याबद्दल काहींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या लोकांना वैशाखी नगर कीर्तनाच्या नावाखाली आपला राजकीय कार्यक्रम राबवायचा होता. या लोकांना आपल्या ‘गुरूं’बद्दल काही आदरभाव नव्हता. ‘निशानसाहिब’च्या ऐवजी त्यांनी खलिस्तानचे झेंडे फडकविला होते. ज्या देशात ते राहतात, त्या देशाचा विनाश करण्यास हे लोक निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
 
“या लोकांनी भारताबाहेर खलिस्तानी झेंडे फडकविले. त्यांनी आमचा विचार केला नाही. आम्हाला खलिस्तान नको आहे,” असे एका शीख व्यक्तीने म्हटले आहे. या मिरवणुकीत पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल ओशिन ब्रार सहभागी झाली होती. मिरवणुकीत सहभागी झालेले शेकडो लोक खलिस्तानचे झेंडे फडकवीत होते.
 
वैशाखीच्या नावाखाली खलिस्तानचा पाठपुरावा कॅनडासारख्या देशात राहणारे फुटीरतावादी कशाप्रकारे करीत आहेत, त्याची कल्पना या घटनेवरून यावी. कॅनडा सरकारबरोबरच तेथे राहणार्‍या देशभक्त भारतीयांनी अशा फुटीर शक्तींविरुद्ध सातत्याने आवाज उठविला, तरच अशा शक्तींच्या कारवाया बंद पडू शकतील. त्या देशातील भारतीयांनी बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. खलिस्तानवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी तेथील भारतीयांनी पुढे यायला हवे.
 
 
‘हिजाब’पेक्षा शिक्षणाला प्राधान्य!
 
कर्नाटक राज्यातील तबस्सुम शेख नावाची विद्यार्थिनी नुकत्याच घोषित झालेल्या 2023च्या ‘पीयुसी’ परीक्षेत दुसरी आली. ही विद्यार्थिनी बंगळुरुच्या नागरत्नम्मा मेड कस्तुरीरंग शेट्टी राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या तबस्सुमची दखल घेण्याचे कारण म्हणजे तिला मिळालेल्या शैक्षणिक यशाबद्दल माध्यमांनी तिच्याशी संवाद साधला असता, आपण ‘हिजाब’पेक्षा शिक्षणास प्राधान्य दिले, असे तिने सांगितले. तबस्सुमला कला शाखेत 600 पैकी 593 गुण मिळाले. इतकेच नाही, तर हिंदी, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयात तिला 100 पैकी 100 गुण मिळाले. कर्नाटक राज्यात 2022 मध्ये ‘हिजाब’वरून मोठा वाद निर्माण झाला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये ‘हिजाब’ किंवा बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, तो सरकारी निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने उचलून धरला होता. सरकारच्या या निर्णयावर कट्टर मुस्लीम युवक-युवतींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘हिजाब’ परिधान करून ‘अल्ला-हू-अकबर’ घोषणा देणार्‍या एका मुस्लीम तरुणीस माध्यमांनी चांगलीच प्रसिद्धी दिली होती. सरकारच्या निर्णयाविरुद्ध ‘हिजाब’ आणि स्कल कॅप परिधान करून मुस्लीम विद्यार्थी रस्त्यांवर उतरले होते. त्याला उत्तर म्हणून अनेक हिंदू विद्यार्थी भगवा उपरणी परिधान करून आंदोलनात सहभागी झाली होती.
 
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तबस्सुमने ‘हिजाब’ आणि बुरखा वादात शिक्षणाला प्राधान्य देण्याचे ठरविले. महाविद्यालयामध्ये ‘हिजाब’ परिधान करायचा नाही, असे मी ठरविले आणि सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित केले. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत तबस्सुम ‘हिजाब’ परिधान करून वर्गामध्ये उपस्थित राहत होती. पण, न्यायालयाच्या आदेशानंतर तबस्सुमच्या पालकांनी ‘हिजाब’ परिधान न करण्यास तिला सांगितले. सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्याचा सल्ला पालकांनी तिला दिला. कर्नाटकमध्ये ‘हिजाब’वरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना तबस्सुमच्या पालकांनीही आपल्या मुलीला ‘हिजाब’ परिधान न करण्याचा सल्ला देऊन धाडसी पाऊल उचलले होते. ‘हिजाब’पेक्षा शिक्षणाला प्राधान्य देणार्‍या तबस्सुमचे अनुकरण सर्व मुस्लीम विद्यार्थिनींनी केल्यास ‘हिजाब’वरून निर्माण होणारे अनेक वाद कायमचे निकालात निघतील. मुस्लीम समाजास अशा शिक्षणास प्राधान्य देणार्‍या तबस्सुमसारख्या विद्यार्थिनींची आवश्यकता आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.