जळगाव : पालकमंत्री बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे हिंदुत्वाच्या नावाने बेगडी प्रेम दाखवलं जात आहे. नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही. असं ही त्या म्हणाल्या.
"मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले कोरोना काळातला हलगर्जीपणा कुठे गेला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. खरंतर त्यांना आम्ही उत्तर देत नाही. पण कोरोनाची आपत्ती ही नैसर्गिक होती. तर खारघरची आपत्ती ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची निर्मित आहे. राज साहेबांना माध्यमांसमोर दोन-तीन प्रश्न विचारावे लागतील, राजसाहेब कोरोनाचा काळ चालू असताना मुख्यमंत्री सहायता निधीऐवजी पीएम केअर फंडमध्ये पैसे भरा असं आवाहन करत होते तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत, असं का म्हणाले नाही? कोरोना काळात संकट होतं. पण त्या संकट काळात मंदिर सुरु करण्याच्या नावाने राजकारण करु नका, असं राज ठाकरे का म्हणाले नाही? गुजरातमध्ये कोरोना काळात रस्त्यावर प्रेतं जाळली गेली, तेव्हा हलगर्जीपणा दिसला नाही का?" असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला.
गुलाबराव पाटलांवर वोलताना त्या म्हणाल्या, "महाप्रबोधन यात्रेत मी नाकावर टिच्चून चार सभा घेतल्या. पाचवी सभा घेऊ न देण्याचा प्रयत्न केला. पण ऑनलाईन 25 लाख लोकांनी ती सभा पाहिली. पालकमंत्र्यांना संविधानाचं पालन करुन बोलावं. अजित पवार यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली. पण याबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती." असं ही त्या म्हणाल्या.