रशिया – युक्रेन संघर्षावर भारतानेच तोडगा काढावा : अमेरिका

    22-Apr-2023
Total Views |
modi

नवी दिल्ली
: रशिया आणि युक्रेनमधील एक वर्षाहून अधिक काळ चाललेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिका भारताकडे आशेने पाहत आहे. रशियाला युक्रेनमधून माघार घेण्यास आणि युद्ध संपविण्यासाठी भारताने आपल्या संबंधांचा वापर करावा, असे आवाहन अमेरिकेतर्फे करण्यात आले आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध तुटण्याऐवजी बळकट झाले आहे, असे अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाई प्रकरणांचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू यांनी म्हटले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाबाबत भारत आणि अमेरिकेचा दृष्टिकोन सारखा नसून युद्ध लवकर संपवण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. युद्ध केवळ चर्चेनेच सोडवता येऊ शकते या भारताच्या मताशी अमेरिका सहमत आहे. रशियाचे भारतासोबतचे दीर्घकालीन संबंध असल्याचे नमूद करून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युद्ध संपवण्यास आणि युक्रेनच्या भूभागातून माघार घेण्यास भारताने राजी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डोनाल्ड लू यांनी बाली येथे जी २० शिखर परिषदेत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या आवाहनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टिप्पणीचे स्वागत केले आहे. तसेच युक्रेनला भारताच्या मानवतावादी मदतीचे स्वागत केले. भारत आणि अमेरिका यांच्यात युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सातत्याने संवाद होत आहे. हे सहकार्य कायम राहील, असाही विश्वास लू यांनी व्यक्त केला आहे.