ब्रिटनमध्येही ‘रलिव गलिव चलिव’

    22-Apr-2023   
Total Views |
Attacks on Hindus in UK


ब्रिटनमध्येही हिंदूंना लक्ष्य करण्याचे, त्यांच्यावर हल्ले करण्याचे आणि त्यांना मुस्लीम बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी ‘पॅटर्न’ तोच आहे, जो नव्वदच्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये वापरण्यात आला. तो म्हणजे ‘रलिव गलिव चलिव.’

भारतात नव्वदच्या दशकात जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हिंदूंचा नरसंहार घडविण्यात आला होता. अर्थात, तत्कालीन सत्ताधारी आणि त्यांच्या पायाशी असलेल्या ‘इकोसिस्टीम’ने हा नरसंहार अतिशय चलाखीने कसा विस्मरणात जाईल, याची सोय केली होती. मात्र, तरीदेखील नरसंहारातून वाचलेले आणि आपले घरदार सोडून आलेले हिंदू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आदी हिंदुत्ववाद्यांनी या मुद्द्याचा समाजाला विसर पडू दिला नव्हता. त्यामुळेच दबक्या आवाजात का होईना, पण या नरसंहाराची चर्चा समाजात होत होती. त्यानंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामध्ये मुस्लिमांनी हिंदूंचा घडविलेला नरसंहार अगदी सविस्तर मांडण्यात आला आणि संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली. आतापर्यंत केवळ ऐकून माहिती असलेला नरसंहार मोठ्या पडद्यावर पाहण्यास मिळाल्यामुळे ‘डरी हुई कौम’ अशी ओळख करून देणार्‍या कौमचा विकृत चेहरा जगासमोर आला. याच चित्रपटामध्ये ‘रलिव गलिव चलिव’ या हिंसक घोषणेची ओळखही जगाला झाली. ‘रलिव गलिव चलिव’ म्हणजे ‘मुस्लीम व्हा, ते व्हायचे नसल्यास मरा किंवा पळून जा.’ या घोषणा देऊन जम्मू-काश्मीरमध्ये राहणार्‍या हिंदूंना शब्दश: उद्ध्वस्त करण्याचे काम करण्यात आले. दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या ज्यू नरसंहाराशी स्पर्धा करणारा हा इस्लामी नरसंहार आधुनिक युगात मानवतेवर एक काळा डाग आहे.

तरीदेखील मुस्लीम कट्टरतावाद्यांची कड घेणार्‍यांची जगात कमतरता नाही. उत्तर प्रदेशात अतिक अहमद नामक माफियाची हत्या झाल्यानंतर आतिक अहमद यास ‘शहीद’ दाखविण्यामध्ये पाश्चिमात्य, प्रामुख्याने ब्रिटनमधील प्रसारमाध्यमे तर अगदी आघाडीवर होती. या पाश्चात्य मंडळींना इस्लामी कट्टरतावादाची चुंबने घेण्याची भारी हौस. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी ‘बीबीसी’ या सरकारी पैशावर चालणार्‍या माध्यमसमूहाने गुजरात दंगलीमध्ये हिंदूंना दोषी ठरविण्याच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार केला होता. त्यापूर्वीदेखील भारतामध्ये मुस्लीम कट्टरतावाद वगैरै काही अस्तित्वात नसून तो बहुसंख्याक हिंदूंचा मुस्लिमावर अत्याचार करण्यासाठीचा अपप्रचार आहे, असे मत ब्रिटनसह पाश्चात्त्य जगाचे राहिलेले आहे. हिंदूंना न्यूनगंड देण्याचा छंदही या मंडळींना आहे. त्यामुळेच भारतात २०१४ साली हिंदू राष्ट्रवादी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून तेथे अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात, ही मांडणी वेळोवेळी करण्यात येत असते. मात्र, ही मांडणी करताना आपल्याच देशात नेमकी काय स्थिती आहे; याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. अर्थात, जगात केवळ आपलाच देश, आपल्याच देशातील लोकशाही आणि आपल्याच देशातील समाज हा सर्वोच्च असल्याच्या गंडातून हे सर्व येते. त्याचप्रमाणे जगातल्या अन्य देशांना शहाणपणा शिकविण्याचीही सवय या देशांना आहे. सध्या, भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यन जयशंकर हा शहाणपणा जाहीरपणे उतरविण्याचे काम अतिशय खुबीने करत आहेत. असो.तर विषय आहे की, ब्रिटनमध्येही हिंदूंना लक्ष्य करण्याचे, त्यांच्यावर हल्ले करण्याचे आणि त्यांना मुस्लीम बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी ‘पॅटर्न’ तोच आहे, जो नव्वदच्या दशकात जम्मू- काश्मीरमध्ये वापरण्यात आला. तो म्हणजे ‘रलिव गलिव चलिव.’


Hindu Lives Matter

ब्रिटनमधल्या लिसेस्टरमध्ये काही दिवसांपूर्वी हिंदूंवर हल्ले करण्याचे प्रकार घडले होते. ज्याप्रमाणे भारतात हिंदूंवर, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर, शोभायात्रांवर हल्ले होतात; अगदी तसाच प्रकार लिसेस्टरमध्येही घडला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे या दंगलींसाठी हिंदू समाजासाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघास जबाबदार ठरविण्याचा अपप्रचार झाला. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांवरही हिंदू समाजाविरोधात नियोजनबद्ध अशी मोहीम चालविण्यात आली. त्याविषयी तेथील ‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ या ‘थिंक टँक’ने ‘हिंदू-मुस्लीम सिव्हील अनरेस्ट इन लिसिस्टर : हिंदुत्व अ‍ॅण्ड द क्रिएशन ऑफ अ फॉल्स नरेटिव्ह’ या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.या अहवालातील सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, मुस्लिमांनी शालेय विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना आणि त्यांच्या पालकांना दहशतीत ठेवून त्यांना मुस्लीम करून घेण्याचा विकृत प्रकार! ब्रिटनमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास देणे, त्यांना बुली करण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. त्याचा आधार घेऊन हिंदू विद्यार्थ्यांना त्यास देण्याचा प्रकार मुस्लीम करत असल्याचे समोर आले आहे. मुस्लीम विद्यार्थी त्यांच्या हिंदू वर्गमित्रांना गुंडगिरीपासून सुटका हवी असेल, तर त्यांच्यावर मुस्लीम होण्याचा दबाव टाकत आहेत. त्यासाठी संबंधित ‘थिंक टँक’ने देशभरातील एक हजारांहून अधिक शाळांचे सर्वेक्षण केले आहे. तसेच ९८८ हिंदू पालकांशी संवाद साधला असता, त्यांच्यापैकी ५१ टक्के जणांनी त्यांच्या मुलांना द्वेषाचा सामना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. एका हिंदू विद्यार्थिनीवर तिच्या वर्गमित्रांनीच गोमांस फेकल्याची धक्कादायक घटनाही एका पालकांनी सांगितली. विशेष म्हणजे, मुस्लीम विद्यार्थी आणि त्यांचे पालक हिंदूंविरोधासाठी तेथील स्थानिक म्हणजेच ब्रिटनच्या मूळ रहिवाशांनाही भडकवित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हिंदूंच्या शाकाहाराची थट्टा करणे आणि त्यांच्या देवतांना तुच्छ लेखणे यांसारख्या हिंदूंबद्दल अपमानास्पद संदर्भांची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, हिंदू विद्यार्थ्यांना भारतातील राजकारण आणि सामाजिक समस्यांसाठी जबाबदार धरले जात आहे. ‘तुम्ही काफीर आहात, त्यामुळे तुम्ही जगण्याचा लायक नाहीत. मात्र, तुम्हाला स्वर्गप्राप्ती हवी असेल तर इस्लाम स्वीकारणे हाच तुमच्याकडे एकमेव मार्ग आहे,’ असे आपल्या मुलांना त्यांच्या मुस्लीम मित्रांच्या पालकांनी सांगितल्याचा अनुभव हिंदू पालकांनी नोंदविला आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहण्याचीही जबरदस्ती केली जात आहे. त्याचप्रमाणे भारतातील कथित भेदभावास हिंदू धर्म आणि हिंदू देवदेवता, हिंदूंचे धार्मिक शिक्षण कारणीभूत असल्याचाही अपप्रचार करून हिंदूंना सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचेही प्रसंग घडत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ख्रिश्चन धर्मीयदेखील आघाडीवर असल्याचे दिसते. धक्कादायक बाब म्हणजे, अशाचप्रकारचा प्रकार लिसिस्टरमध्ये झालेल्या दंगलीपूर्वीपासून केला जात आहे. त्यामुळे लिसिस्टरमधील दंगल ही एका पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय घेण्यासही वाव आहे.

हिंदूंचे सण हिंसाचारास कारणीभूत असल्याचा कांगावा लिसिस्टरमधील मुस्लिमांनी केल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. आपापल्या घरांमध्ये सण साजरे करताना वाजविल्या जाणार्‍या संगीतामुळे त्रास होत असल्याचा दावा मुस्लिमांनी केला. त्याचप्रमाणे हिंदू समाजाकडून काढण्यात येणार्‍या शोभायात्रांमुळेही हिंसाचार वाढल्याचा जावईशोध त्यांनी लावला. त्याचप्रमाणे लिसिस्टरमधील तणाव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार हिंदू राष्ट्रवाद्यांनी घडविला, असा आरोप काही मुस्लीम सोशल मिडिया सेलिब्रिटींनी अतिशय आक्रमकपणे केला होता. त्याविषयी लिसिस्टरचे हंगामी चीफ कॉन्स्टेबल रॉबर्ट निक्सन यांची माहिती अतिशय महत्त्वाची ठरते. लिसिस्टरमध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलीमध्ये सर्वांत मोठे आव्हान होते ते अफवांचे आणि अशा अफवा पसरविण्यास सोशल मीडियाने मोठी भूमिका बजाविल्याचे निक्सन यांनी सांगितले आहे.एकूणच या अहवालामध्ये लिसिस्टरमधील हिंसाचारास मुस्लिमांनी हिंदूविरोधात पसरविलेला द्वेष कारणीभूत असल्याचे अहवालामध्ये सिद्ध झाले आहे. मात्र, यामध्ये आपला सहभाग लपविण्यासाठी मुस्लिमांनी जाणीवपूर्वक रा. स्व. संघाच्या विचारसरणीस जबाबदार धरले. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, भारत आणि हिंदूविरोधी जागतिक मोहीम कशाप्रकारे काम करते, हेदेखील यामुळे सिद्ध झाले आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.