ज्ञानवापी संकुलात वजू करण्यासाठी अन्यत्र व्यवस्था

    21-Apr-2023
Total Views |
Gyanvapi Mosque Case

नवी दिल्ली
: पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईद-उल-फित्रच्या आधी शुक्रवारी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलात येथे वजू करण्यास परवानगी दिली आहे.
 
वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलामध्ये ईदच्या दिवशी वजू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी ज्या ठिकाणी वजूची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे ईदनिमित्त मशिदीला जिल्हा प्रशासनाकडून पुरेसे पाणी दिले जाईल. हे आश्वासन नोंदवून खंडपीठाने अर्ज निकाली काढला आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, भारताच्या सॉलिसीटर जनरल यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे वजूचे कार्य सुनिश्चित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी किंवा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. वजू करण्यासाठी पुरेसे पाणी असलेले टब आणि पाण्याची व्यवस्था हे अधिकारी सुनिश्चित करतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, कथित मशिदीमध्येच वजू करण्याची परवानगी देण्याची विनंती अंजूमन इंतेजामिया मशिद समितीतर्फे करण्यात आली होती. मात्र, वजू करण्याची जागा ही शिवलिंगाप्रमाणे रचना असलेल्या ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे प्रवेश करण्याचा मार्ग हा वादग्रस्त क्षेत्रातून जात असल्याने तेथे वजूची सोय करणे शक्य नसल्याचे सॉलिसीटर जनरल मेहता यांनी यावेळी सांगितले.