मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित विचार मांडले होते. त्यांचे संत रोहिदास महाराजांसंदर्भातील विचार, त्यांच्या शिकवणीची कालातीत सकारात्मकता डॉ. मोहनजी भागवत यांनी विशद केली होती. ‘संत शिरोमणी रोहिदास जीवन, विचार, कार्य’ या पुस्तकाचे ‘वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट’ने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन केले.“संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश आणि समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत. समाजातील भेदाभेद मिटवून तसेच लिंगभेद, वर्णभेद मिटवून समाज म्हणून एकत्र येऊन काम करणे, हीच संत रोहिदास यांची शिकवण आहे,” असे प्रतिपादन डॉ. नयन दाभोळकर यांनी या वेळी केले.
रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे सभागृहात रविवार, दि. 2 एप्रिल रोजी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रमुख अतिथी होते डॉ. नयन दाभोळकर, (मुख्य व्यवस्थापक आयआयटी, मुंबई), शैलेंद्र देवळणकर, (संचालक उच्च तंत्रशिक्षण) तसेच ‘वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक धनंजय वायंगणकर, वसंत वायंगणकर, रवी पेवेकर, विश्वस्त रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई उपस्थित होते.शैलेंद्र देवळणकर यांनी संत शिरोमणी रोहिदास यांचे संतविचार राज्यघटनेतसुद्धा कार्यरत आहेत, त्याची उत्तम मांडणी केली. मानवी हक्क आणि लोकशाही याचे प्रणेते पश्चिमी राष्ट्र नसून भारतीय संत. त्यातही संत रोहिदास यांचे विचारच लोकशाही आणि मानवी हक्काचे प्रणेते असल्याचे नमूद कले.
समारंभाला उपस्थित दोन्ही मान्यवर अतिथींनी डॉ. मोहनजी भागवत यांनी संत रोहिदास महाराजांबद्दल व्यक्त केलेले विचार आणि त्यावरील पुस्तकासंदर्भात मनोगत व्यक्त केले. “रोहिदास महाराजांनी मांडलेली मानवता आपल्या लोकशाहीमध्ये तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या कार्यशैलीत दिसून येते,” असे मत मान्यवर वक्त्यांनी मांडले.धनंजय वायंगणकर यांनी ट्रस्टच्या कामाची माहिती दिली. रवी पेवकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सा. ‘विवेक’चे रवी गोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुस्तकनिर्मितीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले. तसेच समाजातील मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.वसंत वायंगणकर, सतीश सोनावणे, धयाळकर, राजाराम सावर्डेकर, गोविंद देवरुखकर, सुभाष चव्हाण यांचा सत्कार मान्यवर अतिथींच्या हस्ते करण्यात आला.