डिजिटल भारताची ‘अ‍ॅपल’ला भुरळ...

    19-Apr-2023   
Total Views |
apple store

तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचे ‘सीईओ’ टीम कूक केवळ ‘अ‍ॅपल’चे दालन खुले करण्यासाठी भारताच्या आर्थिक राजधानीत दाखल होतात, हा वरकरणी वाटतो तितका सोप्पा विषय नक्कीच नाही. भारतीय बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्त्य देशांना खुणावत असल्याची ही शुभचिन्हेे आहेत. त्याचेच केलेले हे आकलन...

१९७४ मध्ये स्टीव्ह जॉब्स पहिल्यांदा भारतात आले. सात महिन्यांच्या त्यांच्या भारतभ्रमणाच्या काळात भारतीय संस्कृतीचा त्यांच्या आयुष्यात खोलवर प्रभाव पडला. अध्यात्माच्या शोधात आलेल्या स्टीव्ह जॉब्स यांना जगण्याची दिशा याच भारतभूमीने दिली. भारतातून पुन्हा मायदेशी परतल्यानंतर दोनच वर्षांत जॉब्स यांनी ‘अ‍ॅपल’ कंपनीची स्थापना केली. ’अ‍ॅपल’ कंपनीचे ब्रीदवाक्य ’थिंक डिफ्रन्ट.’ या संकल्पनेची मुळी नाळच भारताशी जोडली गेली होती. स्टीव्ह जॉब्स जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या पश्चात एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही तोडीस तोड, असे भव्यदिव्य साम्राज्य मागे राहिले. आजघडीला अशा या ‘अ‍ॅपल’ कंपनीचा विस्तार तब्बल ८० देशांमध्ये आहे. दोन दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या या बलाढ्य कंपनीत आजघडीला तब्बल १ लाख, ६४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

आज हा सगळा इतिहास डोळ्यासमोरून तरळून जाण्याचे कारण म्हणजे, भारतातील पहिल्यावहिल्या आणि भव्य अशा ‘अ‍ॅपल स्टोअर’चे नुकतेच मुंबईत अनावरण संपन्न झाले. स्वतः कंपनीचे सीईओ टीम कूक त्यासाठी मुंबईत तळ ठोकून होते. दिल्ली दौर्‍यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली.त्यांच्या स्वागताला हजारो भारतीय ‘अ‍ॅपल्स’ फॅन्स, ‘टेक’ ब्लॉगर्स आणि ‘डिजिटल क्रिएटर्स’ उपस्थित होते. ‘अ‍ॅपल’च्या स्टोअरची चर्चा तर जोरदार झालीच. पण, यानिमित्ताने भारतीयांना एक पूर्णपणे विश्वासार्ह सेवा देणारे पहिलेवहिले दालन पाहता आले. ‘भव्यता’ हा तर ‘अ‍ॅपल स्टोअर्स’चा अविभाज्य हिस्सा. डोळे दीपवून टाकतील, अशीच पर्यावरणपूरक टोलेजंग इमारत, दिमतीला १०० प्रशिक्षित आणि तब्बल २० भाषा बोलू शकतील, असे कर्मचारी!
टीम कूक यांनी यावेळी अनुभवला तो अगदी ओसंडून वाहणारा उत्साह. सृजनशीलता आणि आपल्या कामाबद्दल तितकीच उत्साही मंडळी पाहून कूकही तितकेच भारावले. एका ‘अ‍ॅपल’च्या चाहत्याने तर त्यांच्यासाठी ३३ वर्षे जुने ‘अ‍ॅपल’चे एक उत्पादन भेट दिले. कूक यांची तेव्हाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. खरंतर भारतात ‘अ‍ॅपल’ उत्पादनाची विक्री ही गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ’अ‍ॅपल’चे पहिलेवहिले ’स्टोअर’ भारतात सुरू होण्यासाठी तब्बल दोन तपं उलटावी लागली. मग याचे नेमके कारण तरी काय? तर कुठलीही कंपनी एखाद्या देशात गुंतवणूक आणि शक्ती तेव्हाच लावते, जेव्हा त्या देशातून आपल्याला तितकासा परतावा मिळेल, अशी त्यांना हमी असते. मग भारत असो वा अमेरिका, कुठल्याही देशात उद्योग-व्यवसायाचे हे सामायिक धोरण. ‘अ‍ॅपल’ला ज्या ज्या देशांमध्ये आपला ग्राहकवर्ग दिसला, त्या बाजारपेठा कंपनीने काबीज केल्याच; पण दालने मात्र अगदी मोजक्या देशांमध्ये खुली केली.

भारतातही अद्याप ‘अ‍ॅपल’ उत्पादनांच्या मागणीचा विचार केल्यास विस्ताराला संधी आणि वाव आहेच. मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी आयात करायला लागणारे सुटे भाग, कररचना यांमुळे ‘अ‍ॅपल’ उत्पादनांच्या किमती आखाती देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहेत. पण, आता भारतातच ‘अ‍ॅपल’च्या उत्पादनांची निर्मिती झाल्यास या उत्पादनांच्या किमती निश्चितच कमी होतील. मुंबईप्रमाणेच लवकरच राजधानी दिल्लीतही ‘अ‍ॅपल’चे नवे दालन खुले होणार आहे. एकूणच काय तर ‘अ‍ॅपल’ कंपनी आता सध्या जगातील सर्वात दुसरी मोठी बाजारपेठ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा देश ठरलेल्या भारतावर लक्ष केंद्रित करताना दिसते. तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात भारताची घोडदौड अगदी वेगाने सुरू आहे.

‘५जी’ तंत्रज्ञान असो वा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) सर्वच आघाड्यांवर भारतीय बाजारपेठा सुसज्ज आहेत. ‘४जी’ तंत्रज्ञानाचे जाळे देशभर विस्तारल्यानंतर आता पुढील टप्पा थेट ‘६जी’पर्यंतचा असणार आहे. भारतातील ही लक्षणीय ठरलेली डिजिटल क्रांती ‘अ‍ॅपल’सारख्या कंपन्यांनी पुरेपूर हेरली आहे. काही दिवसांपूर्वी टीम कूक यांनी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भारताचे आणि भारतीयांनी केलेल्या ‘कोविड’ काळातील कामगिरीचे कौतुक केले होते. कोरोना ओसरल्यानंतर टीम कूक गतवर्षीही मुंबई दौर्‍यावर आले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या दौर्‍याची तितकीशी चर्चा रंगली नव्हती. त्यातच ‘कोविड’ महामारीनंतरच्या धक्क्यातून भारतीय अर्थव्यवस्था तितकीशी सावरलेली नव्हती. मात्र, यंदाच्या दौर्‍यात कूक यांना भारतात भरपूर जल्लोष अनुभवता आला. अनेक युट्यूबर्स, माध्यम प्रतिनिधींच्या गराड्यात टीम कूक आनंदी दिसले. ‘अ‍ॅपल’कडे त्यावेळी भविष्यातील घोषणांशिवाय दुसरे काहीच नव्हते. पण, यंदा ‘अ‍ॅपल स्टोअर’ची भव्यता आणि तिथली सुसज्जता संपूर्ण जगाने अनुभवली.

गेल्या काही काळात ’अ‍ॅपल’ उत्पादनांची सुरू असलेली बनावट विक्री, उत्पादनांची विश्वासार्हता यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आजवर ‘अ‍ॅपल’ कंपन्यांची उत्पादने ही तिर्‍हाईत विक्रेत्यांकडून खरेदी करावी लागत. बर्‍याचदा उत्पादने एकाच छताखाली मिळतील, याची साशंकता असायची. पण, आता भारतातील नव्या दालनामुळे ‘अ‍ॅपल’ची सर्वच उत्पादने एका छताखाली उपलब्ध होतील. त्यामुळे खर्‍या अर्थाने ’अ‍ॅपल कल्चर’ भारतात अधिक खोलवर रुजण्यास मदत होईल. मुंबईतील ‘अ‍ॅपल’च्या या आलिशान दालनात प्रवेश केल्यानंतर कुठलाही ‘अ‍ॅपल’चा प्रतिनिधी विक्रीच्या अट्टाहासासाठी तुमच्यामागे ससेमीरा लावणार नाही. तुम्ही निवांत, निश्चिंत, अगदी हवा तितका वेळ या दालनात फेरफटका मारू शकता. ‘अ‍ॅपल’च्या उत्पादनांबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. उत्पादने खरेदी करण्याची गरज असल्यास प्रतिनिधींचा सल्लाही घेऊ शकता आणि विशेष म्हणजे इथे खरेदी प्रक्रियाही तितकीच सुलभ आहे. अद्याप ‘अ‍ॅपल’ उत्पादने खरेदी करू इच्छिणारा आणि ’अ‍ॅपल’चा सध्याचा ग्राहकवर्ग यांची बाजारपेठ मोठी आहे. त्यातच तरुणाईची नस अचूक ओळखणे हा ‘अ‍ॅपल’चा जुनाच हातखंडा. त्यामुळे ’अ‍ॅपल’ आणि भारताचे हे इतिहासातील एक नाते आता भविष्यात अधिकाधिक दृढ होईल, हे निश्चित.

भारतातील ‘अ‍ॅपल’ची बाजारपेठ वाढवणे हे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे. त्यासाठीच कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही अपेक्षित आहे. सध्या कंपनी ग्राफिक डिझायनर्स, कलाकारांसह भारतीयांना भावतील, अशी उत्पादने तसेच ‘भारतीयांसाठी भारतीय उत्पादन’ अशीच ओळख कंपनी बनवू इच्छित आहे. मोदी भेटीनंतर टीम कूक यांनी सरकारच्या दूरदृष्टीचे, तंत्रसुसज्ज भारताचे कौतूक तर केलेच शिवाय भारतात गुंतवणूक करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले ही बाबही महत्वाची ठरेल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.