नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा खाली खेचण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तान समर्थकांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीस प्रारंभ केला आहे.पंजाब पोलिसांनी खलिस्तानी अमृतपाल सिंग याच्याविरोधात धरपकड मोहिम सुरू केल्यानंतर परदेशातील खलिस्तानवाद्यांनी त्या त्या देशांमध्ये भारतविरोधी कारवायांना प्रारंभ केला होता. लंडनमध्येही तेथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तानवाद्यांनी दंगल माजवून भारतीय तिरंगा खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता.
उच्चायुक्तालयाबाहेर दंगल करणार्यांविरोधात २४ मार्च रोजी भादंवि, युएपीए आणि पीडीपीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण गृह मंत्रालयाच्या दहशतवादविरोधी आणि कट्टरताविरोधी (सीटीसीआर) विभागाकडून एनआयएकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर आता एनआयएने याप्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
दरम्यान, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर घडलेल्या या घटनेबाबत ब्रिटनमधील भारतीय नागरिकांमध्येही संताप दिसून आला होता. या घटनेनंतर भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या संख्येने भारतीय जमा झाले होते आणि तिरंगा फडकावून त्यांनी खलिस्तानवाद्यांनी आव्हान दिले होते. त्याचप्रमाणे भारत सरकारनेही ब्रिटन सरकारला या घटनेविषयी अतिशय कठोर शब्दात सुनावले होते.