‘मन की बात’हा कार्यक्रम म्हणजे, या खेळाडूंनी देशासाठी क्रीडाविषयक आघाडीवर केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा मंच ठरला आहे आणि आता दि. ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर होत असताना, गेल्या तीन वर्षांत, या कार्यक्रमाच्या सर्व भागांनी देशातील खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करण्याचे कसे कार्य केले आहे, याचा आढावा भारतातील क्रीडाविश्वासाठी सध्या अत्यंत उत्साहवर्धक म्हणावा लागेल.
भारताकडे नेहमीच क्रीडाविषयक प्रतिभेचा विश्वसनीय आणि मोठा साठा होता. खरी गरज होती, ती विद्यमान धोरणांमध्ये बदल घडवण्याची आणि खेळाडूंच्या गरजा आणि आकांक्षा यांना साजेशी ठरणारी नवी धोरणे लागू करण्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने यासाठी अभियान तत्त्वावर कार्य हाती घेतले. देशातील अगदी तळातल्या स्तरावरील प्रतिभांचा शोध घेणे, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारणे,उत्तम खेळाडूंना पाठबळ देणे यावर लक्ष केंद्रित करून तसेच महिला, दिव्यांगजन आणि देशाच्या अगदी दुर्गम भागातील कानाकोपर्यात राहणार्या युवावर्गातील खेळाडूंना समान संधी देणारी परिसंस्था निर्माण करून केंद्र सरकार देशाच्या क्रीडाविषयक चित्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. वेगवेगळ्या वयोगटातील विविध क्रीडापटूंच्या यशोगाथा, तसेच अनेकानेक खेळाडूंची हिंमत, संघर्ष आणि निश्चय यांचे दर्शन घडविणार्या कथा यांनी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात तसेच देशवासीयांच्या हृदयात महत्त्वाचे स्थान मिळविले आहे.
’खेलो इंडिया’ हा उपक्रम भारतात अत्यंत परिवर्तनकारी ठरला. खरेतर ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धा आता भारताच्या ’मिनी-ऑलिम्पिक’ स्पर्धांसारख्या झाल्या आहेत. या स्पर्धांमधून राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळविण्याच्या जीगिषेने केवळ तरुण खेळाडूंनाच प्रेरणा दिली आहे, असे नव्हे, तर राज्यांनादेखील वैयक्तिकरित्या त्यांच्या क्षेत्रात सशक्त क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. देशभरात समग्रपणे क्रीडा संस्कृती विकसित करण्याबरोबरच, प्रत्येक खेळाडूबद्दल आणि त्यांच्या प्रगतीबद्दल जाणून घेण्यात पंतप्रधानांनी वैयक्तिक पातळीवर ज्या प्रकारे रस घेतला आहे, तसा यापूर्वी देशात कधी कुणी घेतलेला नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी भारतीय पथक रवाना होताना त्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि हे पथक स्पर्धेहून परतल्यानंतर त्यांनी तेथे मिळविलेले यश तसेच, त्यांचे प्रामाणिक प्रयत्न याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी, पथकातील खेळाडूंशी संवाद साधण्याचा प्रघात पंतप्रधानांनी न चुकता पाळला आहे.
पंतप्रधान रेडिओद्वारे प्रसारित होणार्या ‘मन की बात’ या त्यांच्या मासिक कार्यक्रमातदेखील खेळांबद्दल चर्चा करतात. यापूर्वीच्या काळात आपल्या देशातील खेळाडूंच्या कामगिरीविषयीची कोणतीही माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रे हे एकच माध्यम उपलब्ध होते. आता मात्र आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांना रवाना होण्याआधीदेखील आपण त्यांचे तेथे जाणे साजरे करतो. ‘राष्ट्रकुल’ अथवा ‘ऑलिम्पिक’सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जात असलेले भारतीय खेळाडूंचे पथक असो किंवा ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये भाग घेत असलेले युवा खेळाडू असोत,‘मन की बात’हा कार्यक्रम म्हणजे या खेळाडूंनी देशासाठी क्रीडाविषयक आघाडीवर केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा मंच ठरला आहे आणि आता ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर होत असताना, गेल्या तीन वर्षांत, या कार्यक्रमाच्या सर्व भागांनी देशातील खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य केले आहे, याबद्दल मला खात्री आहे.
मी जेव्हा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत माझे पहिले पदक जिंकले होते, तेव्हा माझ्या सहकारी खेळाडूनेदेखील पदक जिंकले होते. तिला तिच्या देशाच्या प्रमुखांनी अभिनंदनासाठी फोन केला आणि तेथे उपस्थित सर्वांनी हे दृश्य स्टेडियममधील मोठ्या पडद्यांवर पाहिले. त्यावेळी माझ्या मनात असे आले की, मला अशी देशाच्या प्रमुखांशी बोलण्याची संधी कधी मिळेल. त्या बाबतीत, आजचे युवा खेळाडू खरोखरीच अत्यंत भाग्यवान आहेत, असे म्हटले पाहिजे. कारण, देशाचे पंतप्रधान ‘मन की बात’सारख्या महत्त्वाच्या मंचावरून त्यांच्याबद्दल चर्चा करतात, देशवासीयांना माहिती देतात. पंतप्रधानांना या खेळाडूंच्या वैयक्तिक आवडीनिवडीदेखील तपशीलवार माहीत असतात. जेव्हा हे खेळाडू देशात परततात, तेव्हा त्यांचे भव्य स्वागत केले जाते, त्यांचा सत्कार केला जातो. संपूर्ण भारत देश विशेषतः देशातील युवा पिढी हा सोहळा बघत असते.
कोणताही खेळ केवळ पदके मिळवून आणि भारताचे नाव जगाच्या नकाशावर उज्ज्वल करण्यापर्यंत सीमित नसतो, यावर पंतप्रधानांनी पुन्हा पुन्हा भर दिला आहे. खेळ आपल्याला शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवतात आणि आपल्यामध्ये खिलाडूवृत्तीची जोपासना करून वैयक्तिक पातळीवर व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करतात. सामान्य लोक पूर्वी केवळ क्रिकेटच्या खेळातच रुची दाखवत असत. मात्र, आता ते दिवस मागे पडले आहेत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक क्रीडास्पर्धेतील भारताच्या सहभागाशी प्रचंड देशाभिमान जोडला जातो आहे. बॅडमिंटन असो किंवा भालाफेक, हॅण्डबॉल असो किंवा तलवारबाजी, तसेच मल्लखांब आणि कलरीपायट्टू यांसारखे देशी खेळ असोत, लोक आज जगभरात भारतीय तिरंगा फडकवणार्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी एकत्र येत आहेत.
‘ऑलिम्पिक २०२०’ क्रीडास्पर्धा होऊ घातलेल्या असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या श्रोत्यांना या स्पर्धेसाठी टोकियोला रवाना होत असलेल्या आपल्या खेळाडूंना ‘उहशशी४खपवळर’ च्या माध्यमातून पाठिंबा देण्याची विनंती केली. पुढे हा उपक्रम अभियानात परावर्तित झाला आणि आपल्या खेळाडूंना सदिच्छा देण्यासाठी त्यात शालेय विद्यार्थ्यांपासून सुप्रसिद्ध व्यक्तींपर्यंत सगळेच सहभागी झाले. आपल्या खेळाडूंनी मिळविलेले यश साजरे करण्यासाठी आपण जे विविध मार्ग शोधून काढतो आहोत, त्यांचा आढावा घेणेदेखील मनोरंजक आहे. खेळांच्या आघाडीवरील ही गती भारतासाठी अभूतपूर्व आहे आणि क्रीडा क्षेत्रात नवा जोम निर्माण केल्याबद्दल मी पंतप्रधानांची अत्यंत आभारी आहे.
या सर्व प्रयत्नांचे परिणाम सर्वांसमोर आलेले आहेत. टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये सात पदकांची तर ‘पॅरालिम्पिक्स’मध्ये तब्बल १९ पदकांची कमाई करून भारताने गेल्या चार दशकांमधील सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली आहे. तसेच बर्मिंगहॅमला झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकून भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडविले. सुप्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धे’च्या इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने १४ वेळा जगजेत्या ठरलेल्या इंडोनेशियाच्या संघाला हरवून या चषकावर भारताचे नाव कोरले. ब्राझील येथे आयोजित ‘डेफलिम्पिक्स’ स्पर्धांमध्येदेखील भारतीय खेळाडूंच्या पथकाने १६ पदकांची कमाई करून आतापर्यंतची सर्वात चमकदार कामगिरी करून दाखविली. देशातील नवी, युवा प्रतिभा जबरदस्त कामगिरी करून दाखवत आहे आणि संपूर्ण भारत देश त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे.
एक मंच म्हणून ‘मन की बात’ या कार्यक्रमाने देशाच्या नागरिकांमध्ये, विशेषतः युवा वर्गात प्रेरणा जागृत करून क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत सामूहिक उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. ‘मन की बात’ च्या विविध भागांमध्ये, पंतप्रधानांनी थेट तरुण पिढीला साद घालत खेळांना त्यांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनविण्यासाठी आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या समग्र विकासामध्ये खेळांना महत्त्वाचा घटक बनविण्यासाठी ‘सबका प्रयास’ अर्थात सर्वांनी प्रयत्न करण्याची भावना रुजविली आणि आता, समस्त जनता, सरकारे, खेळाडू आणि क्रीडा संघटना पंतप्रधानांची नव्या भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी एकत्र येऊन काम करत आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी शंभराव्या भागाची मी अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे आणि या भागामध्ये पंतप्रधान आपल्याला प्रेरित आणि प्रोत्साहित करतील, तसेच इतरांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार्या सर्वसामान्य माणसांबद्दल जी चर्चा करतील, ती ऐकण्यासाठीदेखील मी उत्सुक आहे.
अंजू बॉबी जॉर्ज
(लेखिका भारतीय ऑलिम्पिकपटू आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्ष आहेत.)