गाड्या धुण्यासह लोकलमध्ये हेडफोन, चार्जर विकले. आजही भाड्याच्या घरातच वास्तव्य. परंतु, तरीही आरेच्या जंगलात ८०० हून अधिक झाडे लावून ती मोठी करणार्या शंकर सुतार यांच्याविषयी...
कामाठीपुर्यात जन्मलेल्या शंकर सुतार यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. आई एका खासगी कंपनीत काम करून एकट्यानेच शंकर यांचा सांभाळ करत होती. पुढे जोगेश्वरीतील नातेवाईक शकुंतला अर्जुन सुतार यांनी त्यांना आसरा दिला. मुलाला शाळेत पाठविण्यासाठी कोणतीही कागदपत्रे नसल्याने शंकर यांना अर्जुन सुतार यांचे नाव लावावे लागले, जे आजतागायत कायम आहे. आसरा मिळाला, तरीही भाडे देणे भाग होते. त्यामुळे आईने दिवसरात्र मेहनत केली. पहिली ते सातवीपर्यंत महापालिकेच्या शाळेत, तर पुढे स्वामी समर्थ हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. चित्र काढणे, मिमिक्री, निसर्गाकडे ओढ असे अनेक छंद शंकर यांना होते. वह्या-पुस्तके आणि कपडेही दुसर्यांनी वापरलेलेच. शुल्कासाठी पैसे नसल्याने घोडके सर काहीशी शुल्क माफी करत. वाचनाची, अभ्यासाची आवड होती. परंतु, तितकी साधने मात्र नव्हती.
शंकर राहत असलेल्या चाळीची सहल आरेच्या जंगलात जात, तेव्हा शंकर यांचा आरेशी जवळून संबंध आला. पुढे ते आरेच्या जंगलात अभ्यासाला जाऊ लागले. तेव्हा त्यांनी जंगलाची दुरवस्था जवळून पाहिली. २००० साली आईला क्षयरोग झाला आणि त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, दहावीत ते अनुत्तीर्ण झाले आणि पुढे ते शिकलेच नाही. आई आजारी असल्याने संपूर्ण जबाबदारी शंकर यांच्या खांद्यावर आल्याने पेपर-दूध टाकणे, कुरिअर, गाड्या धुण्यासह अनेक छोटी-मोठी कामे ते करू लागले. आई बरी झाल्यानंतर तीही घरकामे करू लागली. २००३ साली शंकर यांनी ‘एलपीजी गॅस फीटिंग’ कामाला सुरूवात केली. नंतर मेलिंग, औषध, कुरिअर, एअरसेल कंपनीत ‘प्रॉडक्शन इन्चार्ज’ म्हणूनही नोकरी केली, या दरम्यान जंगलात गेल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे, असा विचार मनात आला आणि त्यांनी आरेच्या जंगलात वृक्षलागवडीला सुरुवात केली.
रस्त्याच्या कडेची वडाची, पिंपळाची छोटी रोपे काढून ती जंगलात लावली. परंतु, ही रोपे नंतर जाळली जायची. जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी ते आहे त्या अवस्थेत जंगलात जात. पुढे त्यांनी मोठी रोपे लावण्यास सुरूवात केली. दूर अंतरावरील तबेल्यांमधूनच ते झाडांसाठी पाणी आणतात. अनेकदा बिबट्या, साप, हरिण, मुंगूस यांचे दर्शन झाले. परंतु, कधीही त्यांच्यावर हल्ला झाला नाही. कामातील प्रामाणिकपणापायी अनेक नोकर्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले. वेळ पडली तेव्हा लोकलमध्ये हेडफोन आणि चार्जरही विकले. सेल्समन, गाड्या धुण्याची कामे केली. मित्रासोबत गणपतीचे मखर, कंदील बनवले. पुढे २०१८ साली गोल्ड कंपनीत त्यांना नोकरी लागली. रविवारी श्रमदान आणि दररोज कंपनीतून निघाल्यावर ते जंगलात जातात.
विशेष म्हणजे, वाहनाचा वापर ते कधीही करत नाही. दररोज ऑफिससाठी जोगेश्वरी ते अंधेरी एक तास आणि अंधेरी ते जोगेश्वरी असे एक तासांचे अंतर ते पायी कापतात. वड, पिंपळ, अशोक, बाभूळ, जांभूळ, आंबा, सीताफळ, आवळा, कैलासपती अशी विविध प्रकारची ८०० हून अधिक झाडे त्यांनी आतापर्यंत आरेच्या जंगलात लावली आणि वाढवलीसुद्धा, पाण्याबरोबरच तबेल्यातील शेणाचा वापरही ते खत म्हणून करतात. शंकर काम करताना संरक्षणाची पूर्ण काळजी घेतात. शोषखड्डे खोदून त्यात पाणी टाकण्याचाही त्यांनी धडाका लावला. आतापर्यंत त्यांनी तीन ठिकाणी २५ लीटर क्षमतेचे शोषखड्डे तयार केले आहेत. तसेच, १८ कुंड्यांमध्ये पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे. ज्या ठिकाणी चिमण्यांचे सर्वाधिक वास्तव्य आहे, तिथे ते स्वतः नैसर्गिकरित्या बनवलेले घरटे लावतात. घरात खाल्ल्या जाणार्या फळांच्या बिया ते कुंडीत लावतात आणि नंतर त्याची रोपे ते जंगलात लावतात आणि वाढवतात.
“झाडांबद्दल मला फारशी माहिती नाही, परंतु, हे काम माझ्याकडून करवून घेतले जाते, असे मला वाटते. श्रमदान करताना कधीही थकवा जाणवत नाही. या कामातून कसलाही स्वार्थ नाही. झाडे लावल्यानंतर काही समाजकंटक आग लावतात, तेव्हा अनेक झाडे नष्ट होतात. आतापर्यंत जे झालं ते झालं. परंतु, यापुढे एकही झाड कापले जाऊ नये.” शेवटच्या श्वासापर्यंत जंगल वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शंकर सांगतात. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवरही आवाज उठवला आहे.
आरेतील युनिट क्र. १६ ते न्यूझीलंड हाऊस या परिसरात शंकर यांचे हे निसर्गसंवर्धनाचे काम चालते. शंकर यांना आई लक्ष्मी यांच्यासह कमलेश शामनतुला, सारिका यादव, हेमंत सुर्वे, प्रमोद परब, विशाल नाईक, विशाल शेटे, प्रसाद मांडवकर, नितीन कुबल, संदेश पांचाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. आजही भाड्याच्या घरात राहून रूपये शंकर सुतार हे दर महिन्याला एक हजार निसर्गसंवर्धनासाठी बाजूला काढतात. त्यांना आगामी वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!