सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच भारताची वाटचाल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    13-Apr-2023
Total Views |
national-rashtriya-rozgar-mela-pm-narendra-modi-virtually-distribute-appointment-letters-to-71000

नवी दिल्ली
: भारताने २०१४ नंतर सकारात्मक दृष्टीकोन स्विकारला आहे. त्यामुळे भारतात याआधी अशक्य वाटणाऱ्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी 21 व्या शतकातील तिसऱ्या दशकात शक्य झाल्या आहेत तरुणांना अशी क्षेत्रे गवसत आहेत जी दहा वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती, असे प्रतपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले.विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना त्यांनी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले नवनियुक्त भारत सरकारच्या अंतर्गत विविध पदांवर काम करणार आहेत.

विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी तरुणांच्या कलागुणांना आणि उर्जेला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. एनडीए शासित राज्यांमध्ये गुजरात ते आसाम आणि उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र या राज्यांमध्ये सरकारी भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंदी आणि महामारीच्या जागतिक आव्हानांमध्ये जग भारताकडे आशेने पाहत आहे.

नवीन शक्यतांची द्वारे खुली करणाऱ्या धोरणे आणि रणनीतींसह आजच्या नवीन भारताची वाटचाल सुरू आहे. भारताने 2014 नंतर पूर्वीच्या प्रतिक्रियात्मक भूमिकेच्या विरोधात एक सक्रिय दृष्टीकोन स्वीकारला. याचा परिणाम म्हणून भारतात याआधी अशक्य वाटणाऱ्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी 21 व्या शतकातील तिसऱ्या दशकात शक्य झाल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशात 2014 पूर्वी आणि नंतर देशात झालेल्या विकासकामांचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय रेल्वेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 2014 पूर्वीच्या सात दशकांमध्ये केवळ 20,000 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले तर गेल्या 9 वर्षांमध्ये 40,000 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले. 2014 पूर्वी दर महिन्याला 600 मीटर्स लांबीच्या मेट्रो रेल्वे मार्गांच्या उभारणीचे काम होत असे, आता मात्र दर महिन्याला 6 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या उभारणी काम होत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

2014 च्या आधीच्या काळात देशात पाईप गॅसच्या सुविधेचे जाळे केवळ 70 जिल्ह्यांपुरते मर्यादित होते, तर आजघडीला 630 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 2014 पूर्वी ग्रामीण भागात 4 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले होते तर 2014 नंतर त्याचा विस्तार 7 लाख किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.