कर्नाटकची ‘लिटमस टेस्ट’

    13-Apr-2023   
Total Views |
karnataka-assembly-election
 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी बैठका घेत आहेत. त्यासाठी तेजस्वी यादव, नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची नुकतीच भेटही झाली. मात्र, विरोधी ऐक्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व मान्य करायचे की नाही, यासाठी कर्नाटक विधानसभेची निवडणूक अन्य विरोधी पक्षांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वच पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. काँग्रेस, जेडीएस आणि आम आदमी पार्टीनंतर आता सत्ताधारी भाजपनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने ५२ नवीन उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने ३२ ओबीसी, ३० एससी, १६ एसटी उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय नऊ डॉक्टर, ३१ पदव्युत्तर, पाच वकील, तीन शिक्षक, एक माजी आयएएस, एक माजी आयपीएस, तीन निवृत्त अधिकारी आणि आठ महिलांनाही तिकिटे देण्यात आली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शिगगावमधून तिकीट देण्यात आले आहे. याआधीही ते या जागेवरून विजयी होऊन विधानसभेत पोहोचले आहेत, तर कागवाडमधून बाळासाहेब पाटील निवडणूक लढवणार आहेत. गोविंदाद करजोल मुदुलमधून, श्रीरामुलू बेल्लारीतून, मुर्गेश निरानी बिलगीमधून रिंगणात आहेत. सीटी रवी यांना चिकमंगळूरमधून तिकीट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हे त्यांच्या वडिलांची पारंपरिक जागा शिकारीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने मंत्री आर. अशोक यांना दोन जागांवर उमेदवारी दिली आहे. ते कनकापुरा आणि पद्मनाभनगर मतदारसंघातून राज्य काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर मंत्री व्ही. सोमन्नाही दोन जागांवर नशीब आजमावणार आहेत. वरुणा मतदारसंघातून त्यांची लढत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी होणार आहे. पक्षाने त्यांना चामराजनगरमधून तिकीटही दिले आहे. आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर चिक्कबल्लापूर मतदारसंघातून तर मंत्री डॉ. अश्वथनारायण सीएन मल्लेश्वरममधून नशीब आजमावत आहेत.कर्नाटकच्या राजकारणामध्ये लिंगायत आणि वोक्कलिंग समाज प्रबळ मानला जातो. विशेषतः लिंगायत समाजाची लोकसंख्या राज्यात १७ टक्क्यांपर्यंत आहे. लिंगायत आणि वोक्कलिंग समाजातील मतदार आरली वजन कोणत्या पक्षाच्या पारड्यात टाकतात, यावरून येथील निवडणुकीचे यशापयश अवलंबून असते. २०११च्या जनगणनेनुसार, कर्नाटकची एकूण लोकसंख्या ६.११ कोटी आहे. त्यापैकी सर्वाधिक ५.१३ कोटी म्हणजेच ८४ टक्के हिंदू आहेत. यानंतर मुस्लीम आहेत. ज्यांची लोकसंख्या ७९ लाख म्हणजे १२.९१ टक्के आहे. राज्यात ख्रिश्चनांची संख्या ११ लाख म्हणजे सुमारे १.८७ टक्के आणि जैनांची लोकसंख्या चार लाख म्हणजे ०.७२ टक्के आहे.

लिंगायत हा कर्नाटकातील सर्वांत मोठा समाज. त्यांची लोकसंख्या सुमारे १७ टक्के आहे. यानंतर, दुसरा सर्वांत मोठा समुदाय वोक्कलिंगा आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे १४ टक्के आहे. राज्यात कुरुबा जातीची लोकसंख्या आठ टक्के, एससी १७ टक्के, एसटी सात टक्के आहे. लिंगायत समाजाची गणना कर्नाटकातील पुढारलेल्या जातींमध्ये केली जाते. लिंगायत आणि वीरशैव हे कर्नाटकातील दोन प्रमुख समुदाय. या दोन्ही समुदायांचा जन्म १२व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीमुळे झाला. कर्नाटकातील लिंगायत समाजाचा इतिहास बाराव्या शतकापासून सुरू होतो. कर्नाटक राज्याच्या स्थापनेपासून येथे लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. १९५६ पासून राज्यात आठ मुख्यमंत्री लिंगायत समाजातील होते. कर्नाटक व्यतिरिक्त महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांमध्ये या समुदायाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील लिंगायत समाजाचेच आहेत. लिंगायत समाजाचे लोक स्वत:चा वेगळा धर्म करण्याची मागणी करत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तर त्यांचे सरकार स्थापन झाल्यास लिंगायतांना वेगळ्या धर्माचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

त्याचवेळी कर्नाटकचे १७ पैकी सात मुख्यमंत्री वोक्कालिंग समुदायातून आले आहेत. के. चेंगलराय रेड्डी, केंगल हनुमंथय्या आणि राज्याचे पहिले तीन मुख्यमंत्री, कदिडल मंजप्पा हे वोक्कलिंगा समुदायातील होते. वोक्कलिंग समुदायातील एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधानपद भूषवणारे कर्नाटकातील पहिले व्यक्ती ठरले. जुन्या म्हैसूर प्रदेशात, रामनगरा, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, कोडागु, कोलार, तुमाकुरू आणि हसन जिल्हे असे आहेत, जिथे समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. या प्रदेशात ५८ विधानसभा मतदारसंघ आहेत, जे २२४ सदस्यांच्या सभागृहातील एकूण जागांच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहेत. सध्याच्या विधानसभेत या प्रदेशात जनता दल (एस) चे २४, काँग्रेसचे १८ आणि भाजपचे १५ आमदार आहेत. याशिवाय, बंगळुरु शहरी जिल्ह्यातील २८ मतदारसंघ, बंगळुरु ग्रामीण जिल्हा (चार मतदारसंघ) आणि चिक्कबल्लापुरा (आठ मतदारसंघ) मध्ये वोक्कलिंगांचा प्रभाव आहे. बंगळुरु शहरी जिल्ह्यातील २८ पैकी सर्व २७ विधानसभा मतदारसंघांवर वोक्कलिंगांचे वर्चस्व आहे. वोक्कालिंग समाजात ‘जेडीएस’ची सर्वाधिक पकड आहे. मात्र, काँग्रेसही चुरशीची लढत देते. मात्र, यावेळी वोक्कलिंगी मतांसाठी भाजपनेही पूर्ण ताकद लावली आहे. नुकतेच वोक्कलिंगांचे आरक्षण चार टक्क्यांवरून सहा टक्के करण्यात आले आहे. वोक्कलिंग समुदायातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आदिचुंचनगिरी मठाचे पुजारी स्वामी निर्मलानंदनाथ यांनी त्याची स्तुती केली.

एवढेच नव्हे, तर बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बंगळुरुचे संस्थापक आणि विजयनगर राजवंशाचे १६व्या शतकातील प्रमुख नाडा प्रभू केम्पे गौडा यांचा १०८ फूट उंच पुतळा उभारण्याचे कामही भाजपने केले.राज्यातील मतदानाच्या पॅटर्नचा विचार केल्यास, दलित मतदार येथे सर्वच पक्षांना मतदान करतात. मात्र, राज्यातील दलित समुदायाची पहिली पसंती ही काँग्रेसलाच असते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही कर्नाटकातील दलित समुदायातून असल्याने पक्षालाही याचा फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, मुस्लिमांची मते काँग्रेस आणि ‘जेडीएस’मध्ये विभागली जातात. त्याचवेळी लिंगायत समाज अनेक वर्षांपासून भाजपला मतदान करत आहे. वोक्कलिंग मतांचा वाटा सामान्यतः काँग्रेस आणि ‘जेडीएस’ला जातो. या ‘व्होटबँके’ला छेद देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने ज्याप्रकारे आरक्षण जाहीर केले, त्यावरून पक्षाचे संपूर्ण लक्ष लिंगायतांसह वोक्कलिंग मतदारांवर असल्याचे स्पष्ट होते.कर्नाटकात विधानसभेच्या २२४ आणि लोकसभेच्या २८ जागा आहेत. सध्याच्या विधानसभेत भाजपचे १२१, काँग्रेसचे ६९ आणि जेडीएसचे ३० आमदार आहेत, तर लोकसभेच्या २८ पैकी २५ जागा भाजपकडे, प्रत्येकी एक काँग्रेस, जेडीएस आणि अपक्षांकडे आहे. यावेळी भाजप एकटाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, तर ‘जेडीएस’ने ‘बीआरएस’सोबत युती केली आहे. गेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि ‘जेडीएस’चे युतीचे सरकार स्थापन झाले. परंतु, हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. राज्यात आम आदमी पार्टी, ‘एआयएमआयएम’, बसपा हेही एकटेच निवडणूक लढवत आहेत.एकीकडे कर्नाटकची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे ‘मोदी’ आडनावप्रकरणी राहुल गांधी यांना झालेली शिक्षा आणि त्यानंतर त्यांच्या रद्द झालेल्या लोकसभा सदस्यत्वानंतरही काँग्रेस पक्षाच्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नसल्याचे दिसते.

राहुल गांधी हे पक्षातील नेत्यांसोबत संवाद साधत नसल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी पुढे आली आहेत. त्याचप्रमाणे नेत्यांवर वैयक्तिक राग ठेवून राहुल गांधी राजकारण करत असतात, असेही आरोप केले जातात. आतादेखील राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्या नावाने ट्विट केले, त्यामध्ये अदानी यांच्या आद्याक्षरांचा वापर करून काँग्रेस सोडून जाणार्‍या नेत्यांची नावे जोडून २० हजार कोटींचा हिशेब मागितला होता. त्यावर काँग्रेसचे माजी नेते आणि ‘पीपल्स डेमोक्रॅटिक’ पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी पलटवार केला आहे. त्यावेळी त्यांनी केलेला दावा भाजपने उचलून धरला आहे, तो म्हणजे परदेशात जाऊन नको त्या उद्योगपतींची भेट घेतात. केवळ राहुल गांधीच नव्हे, तर संपूर्ण गांधी कुटुंबच अशा प्रकारच्या उद्योगपतींच्या भेटी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ हाच आरोप नव्हे, तर आपले आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर तर आझाद यांनी काँग्रेस आणि त्यातही प्रामुख्याने राहुल गांधी यांच्याविषयी दररोज नवा दावा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये त्यांना केलेला सर्वात महत्त्वाचा दावा म्हणजे, सध्याच्या गांधी कुटुंबास नसलेला जनाधार. सध्या काँग्रेस नेतृत्व केवळ जनाधार असल्याचा भ्रम निर्माण करत असून त्यांचे जवळचे नेते त्यास खतपाणी घालत आहेत. हे आरोप विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. कारण, एकीकडे आझाद आरोप करत आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी बैठका घेत आहेत. त्यासाठी तेजस्वी यादव, नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची नुकतीच भेटही झाली. मात्र, विरोधी ऐक्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व मान्य करायचे की नाही, यासाठी कर्नाटक विधानसभेची निवडणूक अन्य विरोधी पक्षांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.