महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती. दि. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन आमच्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची शक्ती देणारा दिवस आहे. एप्रिल म्हटले की, पहिली आठवण येते ती दि. 14 एप्रिलची, भीमजयंतीची. डॉ. आंबेडकर जयंतीची वर्षभर आंबेडकरी जनता वाट बघते आणि भीमजयंती दिवाळीसारखी साजरी करते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते.
यंदा दि. 14 एप्रिलला झारखंडच्या धनबादपासून जवळ असणार्या दामोदर व्हॅलीतील मैथल डॅम येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या भागांत ‘दामोदर व्हॅली’मुळे मोठी हरितक्रांती झाली आहे. दामोदर नदीला येणार्या महापुरामुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये खूप नुकसान व्हायचे. त्यामुळे दामोदर नदीवर सात धरणे उभारून तयार झालेला दामोदर व्हॅली प्रकल्प ऐतिहासिक ठरला आहे.
1943 मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉय मंत्रिमंडळात कामगारमंत्री असताना त्यांनी खूप कष्ट घेऊन ‘दामोदर व्हॅली’ उभारली. ‘दामोदर व्हॅली’बरोबर भाक्रा नानगल, सोन रिव्हर प्रोजेक्ट, हिराकुड धरण यांची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. धरणे बांधणे, जलसिंचन, ऊर्जा, विद्युतनिर्मिती याबाबत देशाला पहिल्यांदा सजग करण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
एप्रिलचा संपूर्ण महिना आंबेडकर जयंती साजरी होते. एप्रिलच्या सुरुवातीला दि. 1 एप्रिलला रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस साजरा होतो. रिझर्व्ह बँकेची स्थापना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ’द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधानुसार झाली. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करीत रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिन साजरा होतो.
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाला स्पृश्यास्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले. गावकुसाबाहेर असणार्या या बहिष्कृत समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. निरक्त क्रांतिपर्वाचे उद्गाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.
संविधानाचे शिल्पकार म्हणून भारताचे भाग्यविधाते, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्व देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. बहिष्कृत अस्पृश्य समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण डॉ. आंबेडकर यांनी दिली.
संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आधुनिक भारताचेही शिल्पकार ठरतात. डॉ. आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संसदीय लोकशाहीसाठी भारतीय संविधान जगात ‘आदर्श संविधान’ म्हणून नावाजले गेले आहे. सामाजिक समता, आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, बंधुता, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य या मूल्यांमुळे भारतीय संविधान मजबूत आहे आणि संविधानामुळे भारतीय संसदीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मजबूत उभी आहे. डॉ. आंबेडकरांनी जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्यापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असल्याचा उपदेश केला आहे. त्यातून त्यांनी आपणांस राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती शिकविली आहे. त्यामुळे, आम्ही राष्ट्राभिमानी आहोत.
डॉ. आंबेडकरांनी सांगितल्यानुसार, जातीजातीतील धर्माधर्मातील संघर्ष मिटला पाहिजे. त्याप्रमाणे, देशात यश मिळत आहे. जातीधर्मातील संघर्ष मिटत चालला आहे. मात्र, अजूनही काही प्रमाणात दलित तसेच वनवासींवर अत्याचार होतात. धार्मिक जातीय संघर्ष होतात, वाद होतात. जातिधर्माचे होणारे वाद संपूर्णतः संपले पाहिजेत. जातिभेद, धर्मभेद हे सर्व भेदभाव मिटवून समतावादी भारत साकारला पाहिजे. आपण जातिधर्माचे गर्व बाळगण्यापेक्षा भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे. आपण प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच असलो पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमाची भावना मनामनात जागी करणे, हेच खरे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी अभिवादन ठरेल!
रामदास आठवले
(लेखक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत.)
(शब्दांकन : हेमंत रणपिसे)