उन्हाळा आणि पाणीटंचाईच्या झळा...

    12-Apr-2023   
Total Views |
water-shortage-mumbai-pune-thane

एप्रिल महिना सुरु झाला की राज्यातील विविध भागांत पाणीकपात, पाणीटंचाई हे शब्द आपसुकच दैनंदिन आयुष्यासोबत बातम्यांची जागा व्यापून टाकतात. मग त्याला ग्रामीण भाग असेल अथवा मुंबई, ठाणे, पुण्यासारखी महानगरेही अपवाद नाहीत. यंदाही एप्रिल महिन्याच्या प्रारंभी अशी पाणीबाणीची बिकट परिस्थिती मुंबईत उद्भवली. त्यामागची कारणे आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...

ल्या पावसाळ्यात ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाऊस पडूनही यंदाच्या वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला आहे. पाणी साठवणार्‍या सातही तलावांत सध्या ३७ टक्के पाणीसाठा मार्च शेवटपर्यंत शिल्लक होता. सध्या पाणीकपातीची शक्यता नसली तरी यावर्षीच्या जून-जुलैमध्ये किती पाऊस पडतो, यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन ठरवावे लागणार आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मात्र पाणीकपातीची वेळ मुंबईवर येऊ शकते. त्यातच उन्हाचा तापही हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याची गरजही साहजिकच जास्त भासते. त्यातच एखाद्या मुख्य ठिकाणी जलवाहिनीमध्ये दुरूस्ती वा बदल करायचे प्रस्तावित असले, तर त्या परिसरात पाणीकपातीचे नियोजन होऊ शकते. नुकतीच भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पोहोचविणार्‍या जलबोगद्याला हानी झाली. त्यामुळे त्याच्या दुरूस्तीकरिता पाणीकपात करावी लागणार आहे.

मुंबईला दरदिवशी ३ हजार, ८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सातही तलावातील पाणीसाठा १४ लाख, ४७ हजार, ३६३ दशलक्ष लीटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना त्या वर्षी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तलावातील उपलब्ध पाणीसाठा दि. ३१ जुलैपर्यंत पुरेल, या दृष्टीने पालिकेच्या जलखात्यातर्फे नियोजन केले जाते. सर्व तलाव १ ऑक्टोबरला पूर्ण क्षमतेने भरले असते, तर पाणीपुरवठा सुरळीत राहतो.

पाणीगळती व चोरीवर पालिकेचे नियंत्रण हवे

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने समुद्राचे ४०० दशलक्ष खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लीटर व दुसर्‍या टप्प्यात आणखी २०० दशलक्ष लीटर खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे.

सध्याच्या माहितीप्रमाणे मुंबईतील दररोजच्या पाणीपुरवठ्यात ३० टक्क्यांहून अधिक गळती व पाण्याची चोरी होत असून, यातील प्रथमच्या टप्प्यात १० ते १२ टक्के पाणी वाचविले तरी ४०० दशलक्ष पाणी उपलब्धी मिळू शकेल. त्यानंतर परत पुढच्या टप्प्यात १० ते १२ टक्के पाणी गळती व चोरी वाचवायची असे एकूण ८०० दशलक्ष लीटर जादा पाणी वितरणाकरिता उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची गरज पडणार नाही, असे मत अभ्यास अहवालात तज्ज्ञांनी यापूर्वीच नोंदविले आहे. खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारा आहे. प्रशासनाने यावर सखोल अभ्यास अहवाल तयार केला. या अहवालावर सार्वजनिक चर्चा व्हावी व खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलावा, असे मत पालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता नंदकुमार साळवी यांनी दिले आहे.

मुंबई महानगरपालिका सध्या दररोज ३ हजार, ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करते. मुंबईतील लोकसंख्येच्या हिशोबाने सध्या गरज ४ हजार, ४०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याची आहे, असे पालिकेचे म्हणणे. म्हणजेच रोज ६०० दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे रोजच्या पाणीपुरवठ्यातील गळती व चोरी रोखली, तर पाणीटंचाईवर मात करता येईल.

पालिकेने नुकतीच सात मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. एक प्रक्रिया केंद्र कुलाब्याजवळ ३५ दशलक्ष क्षमतेचे दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यातून दहा दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होऊ शकेल. पुढील पाच ते सात वर्षांत ही प्रस्तावित सात प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित होतील. यात २ हजार, ४६४ दशलक्ष लीटर मलजल पाण्यावर प्रक्रिया होईल. त्यातून १ हजार, २३३ दशलक्ष प्रक्रिया केलेले पाणी घरगुती पाणी सोडून इतर कामासाठी उपलब्ध होईल म्हणजेच ३० टक्के अधिक पुनर्वतित पाणी उपलब्ध होईल.

दररोज लाखो लीटर पिण्याचे पाणी गटार व नाल्यात!

ठाणे जिल्ह्यातून मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाणी जलबोगद्याद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात सोडले जाते. पाणी वाहून नेणार्‍या जलबोगद्याला एका व्यावसायिकाकडून नोव्हेंबर महिन्यात बोअरवेल खोदताना भगदाड पडले आहे. त्यामुळे दररोज अंदाजे पाच ते सहा दशलक्ष लीटर पाणी गळून ते सक्शन पंपाद्वारे गटारात वा नाल्यात सोडले जाते. जलबोगद्याला भगदाड पाडले गेल्याने त्याची दुरूस्ती अटळ असल्यामुळे, शहरात पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. त्यातच बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणाचा मुंबईकरांना सध्या फटका बसत आहे. पण, पालिकेने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या कृतीकडे दुर्लक्ष केले. पाण्याची नासाडी होत होती. पण, संबंधित अधिकार्‍यांवर पालिकेने कारवाई का नाही केली?

ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीजवळ बोअरवेल खणताना मुंबई पालिकेच्या जलबोगद्याला भगदाड पडले. हे काम एका बांधकाम व्यावसायिकाकडून होत होते. पालिकेला बोगद्याची दुरूस्ती करणे भाग आहे. त्यामुळे पालिकेने ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्यात बाधा येणार, त्या ठिकाणी एक महिन्यांसाठी कपात करण्याचे नियोजन केले आहे. गळतीच्या दुरूस्तीसाठी हा बोगदा बंद करावा लागला व या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणे आवश्यक ठरले आहे. जलबोगद्याला भगदाड पडल्याने पाण्याची पाच महिने नासाडी व दंड असे एकूण ७५ कोटी रुपये वसूल करण्यासाठी मुंबई पालिकेने ‘एमआयडीसी’ला पत्र लिहिले आहे. या घटनेवर भाजपसकट विरोधी पक्षाने सडकून टीका केली आहे व संबंधित अधिकार्‍यांवर अजून कारवाई का केली नाही, याची विचारणादेखील केली आहे.

मुंबई पालिकेने जलबोगद्याच्या दुरूस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम ३१ मार्चला सुरू केले. त्यामुळे मुंबईतील संबंधित क्षेत्रांमध्ये सुमारे १५ टक्के पाणीपुरवठ्यात कपात करावी लागत आहे. जलबोगद्यातील काम दुरूस्तीकरिता सुके ठेवण्यासाठी त्यात येणारे सुमारे २०० दशलक्ष पाणी पंपाने बाहेर खेचून गटारात सोडावे लागत आहे. बापरे! केवढी ही नासाडी!

जलबोगद्याच्या दुरुस्तीकरिता दि. ३१ मार्चपासून एक महिनाभर मुंबईत १५ टक्के जलपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगरे व ठाणे क्षेत्र यांच्या पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के पाणीपुरवठा भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा ५ हजार, ५०० व्यासाच्या १५ किमी लांब जलबोगद्यातून होतो. परंतु, कुपनलिकेच्या खोदकामावेळी या जलबोगद्याची हानी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलगळती होत आहे. या जलबोगद्याच्या दुरूस्तीकरिता तो सुका ठेवण्यासाठी त्यातील पाणी सक्शन पंपने बाहेर काढणे सुरू ठेवले आहे. मुंबई पालिकेने त्याकरिता १५ टक्के जलकपात केली आहे.

ठाणे क्षेत्रासाठी ८५ दशलक्ष पाणी पुरविण्यात येते. हा पुरवठा नौपाडा, कोपरी, लुईसवाडी, टेकडी बंगला, हाजुरी किसननगर, रघुनाथनगर आणि बाळकुम या भागात पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथे १५ टक्के जलकपात लागू होईल. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, चारकोप, कांदिवली, घाटकोपर आणि मुलुंड या भागांनासुद्धा १५ टक्के जलकपात लागू होईल. या भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर वा पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जोगेश्वरी व इतर नागरिकांनी पालिकेला, २० हजार लीटर टँकरचा भाव रु. चार हजार आहे व अशा टँकरचा खर्च पालिका आम्हाला भरून देईल काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विहार भागवणार वाढती तहान!

मुंबईची वाढती जलपुरवठ्याची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिका विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यात विहार तलावातून ओसंडून वाया जाणारे पाणी साठवून त्याचा पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्यात येणार आहे. यासाठी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये यंत्रणा उभारली जाणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी रु. १२ कोटींची तरतूददेखील करण्यात आली आहे.

विहार तलावाची पूर्ण भरून जलसाठ्याची व वाहण्याची क्षमता २७ हजार, ६०० दशलक्ष लीटर इतकी आहे. पावसाळ्यात हा तलाव भरल्यानंतर दररोज लाखो लीटर पाणी वाहून जाते. ते वाचविण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. वाया जाणार्‍या हजारो लीटर पाण्याचा सदुपयोग केला जाणार आहे. विहार तलावाजवळ पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे पाणी जलवाहिन्यातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाईल. या ठिकाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. सल्लागाराच्या नियुक्तीनंतर किती पाण्यावर प्रक्रिया केली जाणर ते ठरविले जाईल.

जलबोगद्याच्या दुरूस्तीमुळे शिवाय काही ठिकाणी वाहिनी फुटल्यामुळे मुंबईत अनेक जास्त भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मलबार हिल जलाशयात पुरेसे पाणी येत नसल्यामुळे कुलाबा, फोर्ट, ग्रँट रोड, परिसराला गेल्या काही दिवसांपासून कमी पाणीपुरवठा होत आहे. वरळी, प्रभादेवी परिसरातही कमी पाणी येते. पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थिती यांच्या मर्यादा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.