मुंबई : कुपोषण निर्मुलन काळाची गरज असून, त्यासाठी सर्वांनी सक्रिय होणे आवश्यक आहे. कुपोषणमुक्तीसाठी महिला सक्रिय झाल्या असून त्यांच्या योगदानातुनच हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा 2023’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत, बुधवार, दि. 12 एप्रिल रोजी सह्याद्री सभागृह, सह्याद्री शाळा, भांडूप पश्चिम येथे कुपोषण निर्मूलनासंदर्भात झालेल्या कार्यक्रमाला महिला शक्तीचा उदंड प्रतिसाद मिळाला.‘कुपोषणावर करू मात, ताजे सकस अन्न खाऊ आहारात’, ‘स्वस्थ माता स्वस्थ बालक’ अशा गगनभेदी घोषणांनी समाज कल्याण केंद्राचा परिसर दणाणून गेला होता.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले गणेश बटा, महिला बाल विकास अंगणवाडी भांडूप पश्चिम प्रकल्प अधिकारी सुहास बुधलवार, योजना ठोकळे, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष भाजप, मंजू यादव सामाजिक कार्यकर्ता प्रमुख अतिथी म्हणून लाभले. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या व्यवस्थापक गौरी परब, वितरण व्यवस्थापक जितेंद्र सोनावणे, उपसंपादिका योगिता साळवी, तसेच अंगणवाडी प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका ज्योती पाटील, सुनिता बनसोड, राजश्री तेलंगे, रोहिणी घोडके, स्वाती ठोंबरे, यांच्यासह 600 च्यावर महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला गरोदर महिला आणि स्तनदा मातांची उपस्थिती लक्षणीय होती.
‘पोषण पंधरवडा 2023’चे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र पोषण पंधरवडा 2023’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘रंगमंच ग्रुप’ या कलापथकाने कुपोषण समस्या आणि उपाय यावर पथनाट्य सादर केले. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतून ओघवत्या स्वरूपातले हे पथनाट्य उपस्थितांना भावले. संदेश अहिरे अस्मिता मोरे घरत, किरण निवाळकर, गौतम सोनावणे, करिश्मा वाघ या युवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून कुपोषणाबद्दल जनजागृती केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिपाली देशमुख यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी ‘अॅनेमिया’ किंवा इतर कोणत्याही आजारावर महागडी औषधे घेण्याआधी ते आजार होऊ नये, यासाठी सकस आहार घ्यावा. तसेच महागडे खाद्यान्न खाऊनच पोषणतत्वे मिळतात ही भ्रामक समजूत असून, दैंनदिन अन्नपदार्थांमध्येही भरपूर पोषकतत्वे असतात असे त्यांनी उदाहरणासहित सांगितले.
या वेळी झालेल्या खुल्या चर्चेला उदंड प्रतिसाद मिळाला. महिला आणि बालकांमधील कुपोषण समस्या आणि उपाय यावर खुली चर्चा झाली. यात स्थानिक अंगणवाडी सेविका रंजना बागुल, प्रतिक्षा परदेशी, प्रमिला सेविका आणि नयना सावंत सहभागी झाल्या होत्या. भांडूप परिसरातील विविध वस्त्यांमध्ये महिला बाल विकासाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव त्यांनी मांडले. भांडूप परिसरातील कुपोषणाचे प्रमाण आणि कारण याबद्दल त्यांनी अनुभव कथन केले. तसेच परिसरात आढळलेल्या कुपोषित बालक आणि त्यांच्या मातांचे आरोग्य सुधारावे, यासाठी काय प्रयत्न केले, याची यशोगाथाही त्यांनी सांगितली.
कार्यक्रमाचा समारोप प्रकल्प अधिकारी सुहास बुधलवार यांनी केला. आपल्या महत्वपुर्ण मार्गदर्शनामध्ये त्यांनी महिला बाल विकास आणि दै. मुंबई तरूण भारतच्या कुपोषणाविरोधातील या विशेष उपक्रमाचे कौतूक केले. माल न्युट्रेशनसोबतच आज शहरी भागात मॉल न्युट्रेशन वाढले आहे असे ते म्हणाले. सकस आहाराचे महत्व आणि आधुनिक जिवनशैली याबात त्यांनी मांडणी केली. अंगणवाडी प्रकल्प वस्तीपातळीवर कुपोषणाविरोधात आणि एकंदर वस्तीआरोग्यसेवेबाबत काय करते हे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. जमलेल्या 600 च्या वर महिलांना सुहास बुधलवार यांनी प्रतिज्ञा दिली. त्या प्रतिज्ञेचा सारांश असा “मी पोषण अभियानास एक देशव्यापी लोक चळवळ बनवेल. प्रत्येक घर, प्रत्येक शाळा, प्रत्येक गाव प्रत्येक शहरामध्ये योग्य पोषणाचा आवाज उठेल या लोक चळवळीमुळे माझे देश बांधव भगिनी आणि बालके निरोगी सदृढ होऊन पुर्ण क्षमता प्राप्त करतील हीच माझी प्रतिज्ञा आहे.”या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ’इव्हेंट असिस्टंट’ राजीव रेवणकर यांनी केले.
पोषणाहाराच्या साहित्याचे प्रदर्शन
‘पोषण पंधरवडा 2023’च्या पहिल्या टप्प्यात कुपोषण म्हणजे काय? कुपोषणावर मात कशी करावी? भरड धान्य म्हणजे काय? भरड धान्याचा उपयोग करून कुपोषण कसे टाळता येईल, याविषयी जागृती करणारे फलक, स्टॅण्डिज् आणि साहित्य जागोजागी प्रदर्शित करण्यात आले होते.
किशोरवयीन मुलींसाठी सकस पोषण जागृती
सह्याद्री हायस्कूल भांडूप येथे परिसरातील विद्यार्थीनींसाठी सकस पोषण आहार कुपोषणावर मात या विषयावर मार्गदर्शन आणि खुली चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ता ज्योती साठे यांनी विद्यार्थींनींशी संवाद साधला. खेळाच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थिनींना वाढत्या वयातील पोषण आहारासंदर्भात मार्गदर्शन केले.