परभणी : गोआधारित,सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, या उद्देशाने 'विवेक मल्टिव्हिजन फाऊंडेशन' (मुंबई) तर्फे परभणी जिल्ह्यातील दामपुरी येथे (रविवार, दि.९ रोजी) शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना 'विवेक मल्टिव्हिजन' च्या 'गोपाल शेणखत खत' आणि गोआधारित- सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माणिकराव गमे होते. या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष व सा.'विवेक'चे परभणी जिल्हा प्रतिनिधी सुभाष आंबट-पाटील, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी दिलीपराव देशपांडे, राजाभाऊ होळकर, मारोतराव खटिंग (पोलीस पाटील), राजेश गमे आदींनी मार्गदर्शन केले.
सुभाष आंबट-पाटील म्हणाले, "विवेक मल्टिव्हिजन फाऊंडेशन'च्या गोपाल शेणखत प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती चळवळीला चालना देण्यात येत आहे. येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा असणार आहे. गोपाल शेणखतांमध्ये नैसर्गिक घटक उपलब्ध असल्याने या खतास परभणी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत गोपाळ शेणखत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,"असे त्यांनी सांगितले.
दिलीपराव देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून गोपाल शेणखत खताचे महत्त्व विशद केले. यावेळी गोपाल शेणखत खताचा वापर करून किफायतशीर उत्पन्न मिळविलेले माधव लांडगे (भुईमूग), मारोती खटिंग (गहू) व राजाभाऊ होळकर या शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले.
या मेळाव्यास झाडगाव (ता.जि.परभणी) येथील कृष्णा प्रिया गोशाळेचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी प्रवीण देव इसादकर, मुजाजी बोबडे व शिव शंभू प्रतिष्ठानने परिश्रम घेतले.