भाषाबंधनापलीकडचे शिवचरित्र...

    09-Mar-2023   
Total Views |
Shivcharitra beyond language barriers

आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीने जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वच जाणतोच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, महाराजांच्या कथा केवळ मराठीतच प्रसिद्ध आहेत, असे नाही, तर अन्य भारतीय भाषा, तसेच इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन या आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही त्या उपलब्ध आहेत. तेव्हा, आज अशाच इतर भाषांमधील शिवरायांवरील साहित्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया....


शाळेतल्या एखाद्या लहान मुलाला विचारलं की, “तुझं आवडतं पुस्तक कोणतं?” किंवा “तू कोणतं पुस्तक वाचलं आहेस?” तर तो सहज म्हणतो, ‘छावा’, ‘स्वामी’, ‘श्रीमानयोगी’ ही पुस्तकं वाचली आहेत. काहींनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक वाचलेले तरी असते वा बघितलेले असते. ‘जाणता राजा’ न बघितलेला मराठी मनुष्य दुर्मीळच! अगदी काहीच नाही तर शालेय पाठ्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असतोच असतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांवरील साहित्य हे केवळ मराठीपुरतेच मर्यादित आहे का? तर नाही. भारतभूमीवरील थोर हिंदवी राजे असणार्‍या शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर भारतीय भाषा, तसेच इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन भाषांमध्ये साहित्य उपलब्ध आहे. अगदी या भाषांमध्ये त्यांच्यावर संशोधनदेखील झाले आहे. परदेशात आढळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखांचा संग्रह असणारे ग्रंथदेखील उपलब्ध आहे.
 
संस्कृत ही तर भारतीय भाषांची जननी आणि अत्यंत प्राचीन भाषा. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव करण्यामध्ये ती मागे राहणं शक्यच नाही. संस्कृतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांवर महाकाव्य श्री. भा. वर्णेकर यांनी रचले. ‘शिवराज्योदयम्’ या महाकाव्यामध्ये भरतमुनींचे महाकाव्याचे सर्व नियम पाळून शिवाजी महाराजांना मुख्य नायक बनवून त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या रचनेभोवती काव्य गुंफले आहे. कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसालचे राजे यांच्यावर काव्यरचना केली आहे. त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करणारा ‘शिवराजभूषण’ हा ग्रंथ होय. यामध्ये त्याने शिवराज्याभिषेकाचे आणि तोपर्यंतच्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन त्यामध्ये करण्यात आले आहे. तसेच नवोदित कवी संस्कृतमध्ये शिवाजी महाराजांचे गुणगान करणार्‍या काव्यांच्या रचना करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवरती ’छावा’, ’श्रीमान योगी’ ही मराठीतील उत्तम पुस्तके आहेतच. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक तर मराठी साहित्यातील मानाचे पुस्तक म्हणावे लागेल. तसेच शिवाजी महाराजांच्या विविध गुणकौशल्यांवर आधारित मराठीमध्ये ग्रंथलेखन करण्यात आले. त्यात ’जगातील सर्वोत्तम राजा’ हे काशिनाथ मढवी यांच्या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. राजे म्हणून ते सर्वोत्कृष्ट कसे होते, याचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी ’छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर... ’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. कल्पनातीत असणारे हिंदुत्वाचे वास्तव त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर ’Chhatrapati Shivaji : Saviour of Hindu India' उपलब्ध आहे. साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले ’छत्रपती शिवाजी महाराज : व्यवस्थापनगुरू आणि व्यूहरचनाकार’ हे डॉ. गिरीश जखोडिया यांचे पुस्तक महाराजांच्या युद्ध आणि राजनयिक धोरणांवरती प्रकाश टाकते. डेनिस किन्लॅण्ड या ब्रिटिश लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी भावानुवाद ’छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र : महान क्रांतीचा प्रणेता’ हेदेखील उपलब्ध आहे.

 परदेशस्थ लेखकाचा शिवाजी महाराजांविषयीचा दृष्टिकोन यामध्ये दिसतो. डेनिस किन्लॅण्ड यांनी शिवाजी महाराजांवर जवळजवळ चार पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकात त्यांच्या जीवनचरित्रावर भर देण्यापेक्षा त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, दूरदृष्टिकोन यावरती विवेचन केलेले आहे. वादातीत असणारे ’शिवाजी कोण होता?’ हे गोविंद पानसरेंचे पुस्तकही मराठीमध्ये खूप गाजले. एकूणच काय तर आपल्या मराठीमध्ये आपल्याला शिवरायांवरती विपुल साहित्य उपलब्ध असून शिवरायांना नाट्यरूपही देण्यात आहे.इंग्रजीमध्ये ’श्रीमान योगी’ पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद विक्रम पंडित यांनी केला. ’शिवाजी: दि ग्रेट मराठा’ हा अनुवाद शिवाजी महाराजांचा कालानुक्रमे जीवनपट जाणण्यास महत्त्वाचा ठरतो. बहुतांशी लोकांनी हे पुस्तक वाचलेले असते.यदुनाथ सरकार यांचे ‘शिवाजी अ‍ॅण्ड हिज लाईफ’ हे केवळ शिवाजी महाराजांची माहिती देत नाही, तर महाराष्ट्र, त्याचे भौगोलिक स्थान, तत्कालीन समाज, सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि या पार्श्वभूमीवर शिवरायांचा जन्म व कार्य याचे वर्णन या ग्रंथात येते.


Shivcharitra beyond language barriers

 
डेनिस किन्लॅण्ड यांचे ‘शिवाजी : दी ग्रॅण्ड रिबल’ हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या युद्धांचा इतिहास सांगणारे आहे. मुघलांसोबत लढतानाच काही स्वकीयांशीच द्यावा लागलेल्या लढ्याचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे. न्यायमूर्ती रानडे यांचे ‘राईज् ऑफ मराठा पॉवर’ हे संशोधनात्मक पुस्तक आहे. यामध्ये मराठा साम्राज्याच्या उदयापासूनचा इतिहास वर्णित केला आहे. तसेच मेधा देशमुख भास्करन यांचे ‘चॅलेजिंग डेस्टिनी’ हे शिवचरित्र सांगणारे पुस्तक आहे. २०१७ मध्ये 'Raymond crossword Book Awards' साठी या पुस्तकाचे नामांकन झालेले आहे. याचे मराठी भाषांतर इंद्रायणी चव्हाण यांनी ‘झुंज नियतीशी’ हे केलेले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज : सिक्रेट ऑफ हिज् लाईफ! हिज् सक्सेस’ हे शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देते. या पुस्तकाचे भाषांतरही उपलब्ध आहे. ‘कौटिल्य अर्थशास्त्र’ आणि आर्य चाणक्य हे सर्वांना व्यवस्थापनातील मेरूमणी म्हणून माहीत आहेत. परंतु, ‘शिवाजी महाराज अ‍ॅण्ड एमबीए’ हे ‘राजमाता पब्लिकेशन’ने प्रकाशित केलेले आणि प्रा. नामदेवराव जाधव यांनी लिहिलेले पुस्तक शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना ज्या ‘मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज्’, ‘ह्युमन रिसोर्सेस’, ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’ अशा वेगवेगळ्या ‘मॅनेजमेंट स्किल्स’ वापरली त्याचा अभ्यास आणि विवेचन केलेले आहे.

याच लेखकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज : फादर ऑफ मॉडर्न इकोनॉमी’ हेही पुस्तक प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या दैनंदिनीवरही संशोधन केलेले आहे. पत्रकार वैभव पुरंदरे यांचेही ‘शिवाजी : इंडियाज् ग्रेट वॉरिअर किंग’ हे संशोधनात्मक पुस्तक आहे. कारण, केवळ शिवाजी महाराजांचे आयुष्य, इतिहास यांची माहिती देणे हा या पुस्तकाचा उद्देश नाही. विवादास्पद ठरू शकणार्‍या इतिहासाचाही आधार घेऊन, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि त्यातील ‘चालींचा’ त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी केलेले कार्य याचे विश्लेषण त्यांनी या ग्रंथात केलेले आहे.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘पोर्तुगीज आणि मराठे संबंध’ या पुस्तकाचे ‘पोर्तुगीज-मराठा रिलेशन’ हे टी. व्ही. तरवटे यांनी अनुवादित केलेले पुस्तक आपल्या परकीय संबंधांवर प्रकाश टाकणारे आहे.लहान मुलांसाठीही कथारूप शिवराय उपलब्ध आहेत. ‘स्टोरीज् ऑफ छत्रपती शिवाजी महाराज’ हे पुस्तक श्रीकांत गोवंडे यांनी लिहिलेले आहे आणि शीतल करंदीकर यांनी ते अनुवादित केलेले आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.हिंदीतील पुस्तकांचा परामर्श घेतला तरी अनेक पुस्तकं आपल्याला आढळतील. यातील विशेषत्वाने उल्लेख करता येईल असे पुस्तक म्हणजे ‘शेरेसह्याद्रि.’ कविवर राम बचन भारती यांनी रचलेले शिवरायांचा गौरव करणारे हे हिंदीतील महाकाव्य आहे. श्रीनिवास कुटुंबले यांचे ‘छत्रपति शिवाजी : विधाता हिंदवी स्वराज्य का’ हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या कार्याचे वर्णन करताना तत्कालीन स्वर्णिम कालखंडाचेही विवेचन केलेले आहे. या पुस्तकाचा उद्देश सांगताना शिवाजी महाराजांच्या ‘स्ट्रॅटेजीज्’ आज लागू करून राष्ट्राची प्रगती कशी होऊ शकते हे वर्णित केलेले आहे.

तसेच ‘श्रीमान योगी’ हे पुस्तकही हिंदीमध्ये उपलब्ध आहे. बंगालीमध्ये रेणू सरण यांनी ‘छत्रपती शिवाजी जीवनी’ हे पुस्तक लिहिले आहे. २४ पानांमध्ये त्यांनी शिवरायांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ग्यानपीठ पब्लिकेशन, कोलकाता’ यांनी प्रकाशित केलेले ‘आमी छत्रपती शिवाजी बोल्छी’ हे बिजित कुमार साहा यांचे हे पुस्तक नाटक-संवाद रुपात शिवाजी महाराजांचा इतिहास उभा करणारे आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचे बंगाली भाषांतर ‘के चिलेन शिवाजी’ झालेले आहे. ‘एनबीए प्रकाशना’ने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. ‘शिवाजी’ हे यदुनाथ सरकार यांचे बंगालीमधील पुस्तक ई-बुक स्वरुपात देखील उपलब्ध आहे. मराठा समाजाची स्थापना कशी झाली, याचा परामर्श त्यांनी बंगालीत घेतलेला दिसतो.उर्दू भाषेतही शिवाजी महाराजांवरील साहित्याचे लेखन झालेले आहे. सय्यद हम्मीद यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज और मुसलमान’ हे पुस्तक २०१८ साली लिहिले. शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव बाळगून मुस्लीम आणि सर्व धर्मीयांना दिलेले श्रेष्ठ स्थान या विषयी हे पुस्तक भाष्य करते. ‘शिवाजी कौन था’ हे सैद गाझी यांचे पुस्तक २०२० झाली प्रसिद्ध झाले. ४० पानांच्या पुस्तकात त्यांनी शिवचरित्र थोडक्यात मांडलेले आहे.

‘शिवाजी महराज के वफादार मुस्लीम सिपेसलार’ हे ‘अ‍ॅड. गाझिउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर’ने प्रकाशित केलेले अनुवादित पुस्तक आहे.‘फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी’ हे अहवालात्मक पुस्तक सुरेंद्रनाथ सेन यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात परदेशातील उपलब्ध शिवाजी महाराजांवरील साहित्यावर त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहिला आहे. हे पुस्तक केम्ब्रिज विद्यापीठातही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पुस्तकाचे रोहित पवार यांनी मराठी भाषांतर ‘परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज’ केलेले आहे. अमोल. एन. बनकर यांनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळां’तर्गत संशोधन करून ‘टू इम्पॉर्टंट फ्रेंच रेकॉर्ड्सरिलेटेड टू राजा शिव छत्रपती’ हा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केला आहे. त्यासाठी त्यांनी परदेशी भाषांमध्ये उपलब्ध असणारे साहित्य अभ्यासले. फ्रेंच प्रवाशांनी त्या काळी लिहिलेल्या भारतीय इतिहासाच्या वर्णनात्मक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. भारतात आणि परदेशात अनेक शोधनिबंध आणि प्रबंधांचे विषय शिवाजी महाराज ठरलेले आहेत.
 
प्रसिद्ध लेखक आणि संशोधक जी. बी. मेहेंदळे यांनी उत्तम संशोधन करून ‘शिवचरित्र’ (शिवाजी : हिज् लाईफ अ‍ॅण्ड टाईम) ई-बुक आणि ऑडिओ बुकमध्ये उपलब्ध करून दिले. या ई-बुकचे माध्यम इंग्रजी असले, तरी ते फ्रेंच, जर्मन आणि पोर्तुगीज भाषांमध्ये अनुवादित व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. छ. शिवाजी महाराजांचे केवळ चरित्रच नव्हे, तर प्रशासकीय कौशल्य, युद्धनीती, लष्करी कलागुण आणि ‘पॅट्रिओनिक क्वालिटीज्’ सर्व जगाला कळाव्यात, अशा भावना त्यांनी व्यक्त केले.शिवाजी महराजांवरती सध्या मराठीत अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्यात ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराय’, ‘फर्जंद’ यांचा समावेश होतो. शिवाजी महाराजांवर आता जवळजवळ ६०० हून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. कादंबरी, महाकाव्य, नाटक, अनुवादित साहित्य, कविता, ललित साहित्य, आरती, पोवाडे, चित्रपट, पोवाडे, काव्यसंग्रह, संशोधनात्मक ग्रंथ, संकलित साहित्य, ग्राफिक्स, माहितीपट, मालिका, शब्दकोश अशा अंगांनी जर विचार केला, तर जवळजवळ २,५९० संदर्भ आपल्याला उपलब्ध होतात. प्रत्येकालाच शिवाजी महाराज विविध अंगांनी, दृष्टीने दिसलेले आहेत. सर्वांनाच या थोडक्या लेखात समाविष्ट करणे शक्य नाही. परंतु, आपल्या राजांची थोरवी कोणतंही भाषिक वा माध्यमबंधन न बाळगता साहित्यातूनही सातासमुद्रापार पोहोचली आहे. जसे रामायण आणि महाभारताविषयी म्हटले जाते की, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तेजाळत आहेत, तोपर्यंत हे साहित्य अमर राहणार तसेच शिवचरित्रही आचंद्रसूर्य विश्वकल्याणास कारण ठरेल, हे निश्चितच!



चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम्।
वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम्॥




 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.