मुंबईकरांसाठी खुशखबर! आता प्रवास होणार गतीमान!

प्रत्येक चार मिनिटाला एक मोनो धावणार!

    30-Mar-2023
Total Views |
 
Mumbai Monorail
 
 
मुंबई : मोनोरेल हा मुंबईकरांसाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प सुरु करण्यासाठी मुंबईची निवड करण्यात आली होती. मुंबई देशातील पहिली मोनोरेल आणि जपानच्या ओसाका मेन मोनोरेल लाईन नंतर जगातल्या दुसऱ्या नंबरची लांब मोनोरेल आहे. पण, गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे कमी फेऱ्या आणि परिणामी प्रवाशांची नाराजी यामुळे मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) १० मोनोगाड्या बांधणीचा मार्ग आता खुला झाला आहे. मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे.
 
मोनोरेलच्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत असताना, एमएमआरडीएने आता अतिरिक्त १० रेक खरेदी करण्याची योजना आखली आहे. यासाठी सुमारे ५९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हैदराबाद येथील मेधा सर्वो ड्राइव्हस् लिमिटेड नावाच्या भारतीय कंपनीकडे १० नवीन रेकची ऑर्डर देण्यात आली आहे.
 
मोनोरेलसाठी सध्या प्रवाशांना साधारणपणे २५ ते ३० मिनिटे वाट पाहावी लागते. गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवण्यास प्रचंड मर्यादा आहेत. आता स्वदेशी बनावटीच्या दहा गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होईल, असे एमएमआरडीएतील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 
"संबंधित कंपनीने मोनोरेल गाड्या बांधून त्याच ठिकाणी त्यांची चाचणी करावी, अशी महत्त्वाची अट या कंत्राटात आहे. यामुळे मुंबईत दाखल झाल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची गरज भासणार नाही. त्या थेट प्रवासी सेवेत दाखल करता येतील. गाडी बांधणी आणि चाचणी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने साधारणपणे वर्षभरात पहिली देशी बनावटीची मोनोगाडी मुंबईत दाखल होईल. त्यानंतर टप्याटप्याने उर्वरित सर्व गाड्या ताफ्यात येतील." असे एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.