मुंबई : मुंबईतील डी.एच.गोखले आणि शामला गोखले न्यासाच्या निधीतून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठित असा ‘अंत्योदय पुरस्कार’ यंदा ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून एका प्रकट समारंभात हा पुरस्कार सदाशिव चव्हाण यांना प्रदान करण्यात येईल.
जुन्या पिढीतील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी.एच. तथा बाळासाहेब गोखले यांच्या इच्छेनुसार डी.एच. आणि शामला गोखले न्यासाची स्थापना झाली. २००० पासून या पुरस्कार योजनेचा प्रारंभ झाला. यावर्षी पुरस्काराचे मानकरी असलेले ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चे अध्यक्ष सदाशिव चव्हाण हे बेघर मुलामुलींसाठी आदर्श गुरुकुल व्यवस्था निर्माण करण्याचा वसा घेऊन काम करतात. मुंबई आणि इतर भागात बेघर मुलांचा प्रश्न मोठा असून त्या बेघर मुलांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे जेथे त्यांना आपुलकी, जिव्हाळा आणि संस्कार मिळतील, असा मानस ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चा आहे.
सध्या फाऊंडेशनमार्फत टिटवाळा येथे १०० मुलांचे तसेच ठाणे येथे १०० मुलींचे गुरूकुल चालवण्यात येते.२००० पासून दिला जाणारा हा पुरस्कार आतापर्यंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, डॉ. श.शं. कुलकर्णी, डॉ. अविनाश आचार्य, सुनंदा पटवर्धन, डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. बाबा नंदनपवार, मेळघाटात कार्य करणारे सुनील व निरुपमा देशपांडे, ‘स्नेहालय’चे डॉ. गिरीश कुलकर्णी, रामोशी व बेडर समाजासाठी कारक करणारे डॉ. भीमराव गस्ती, भिवा (दादा) गावकर, नारायणराव देशपांडे, प्रदीप वडनेरकर, ‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्त मुलांसाठी कार्य करणारे सुरेश पाटील, वर्षा परचुरे आणि अमोल साईनवार यांना देण्यात आला आहे.