नंदनवनात रेल्वेक्रांती

    27-Mar-2023   
Total Views |
Development of Railway Service in Jammu and Kashmir


एकेकाळी सर्वच बाबतीत मागे असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये आमूलाग्र बदलांना प्रारंभ झाला आहे. ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ संपुष्टात आणल्यानंतर तेथे चौफेर विकासाला प्रारंभ झाला. त्यामध्ये रेल्वेसेवेचाही समावेश आहेच. जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील पूल आणि अंजी येथील देशातील पहिला केबल स्टाईड रेल्वेपूल हे जगातील एक आश्चर्य ठरणार आहे. त्यानिमित्त...

जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ हटविल्यानंतर तेथे खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले. राजकीय सुधारणांद्वारे केवळ तीन कुटुंबांकडे एकवटलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण झाले. परिणामी, तेथे पंचायत निवडणुकीमध्ये तीन हजार प्रतिनिधी निवडणुकीद्वारे निवडले गेले. त्यामुळे सर्वसामान्यांना शासनामध्ये भागीदारी प्राप्ती झाली. त्यासोबतच प्रशासकीय सुधारणांमुळे भ्रष्टाचार निर्मूलनाची कारवाई मजबुतीने केली जात आहे. कनाल जमीन घोटाळा असो अथवा रोशनी घोटाळा, त्यांची पाळेमुळे खणून काढण्यास प्रारंभ झाला. प्रदेशात शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पर्यटनासदेखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून लाखोंच्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये जात आहेत.

यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये दळणवळणाच्या सुविधांचादेखील वेगवान विकास गतिमान दिसतो. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत दुर्गम मानल्या गेलेल्या भागांमध्ये महामार्ग-बोगदे उभारले जात आहेत. श्रीनगर आणि लेह यांना जोडणार्‍या जोझिला बोगद्यामुळे या दोन्ही प्रदेशांमध्ये वर्षभर वाहतूक सुरु राहील. त्याचप्रमाणे श्रीनगर-अमृतसर महामार्गास दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गास जोडून श्रीनगर ते मुंबईचे अंतर २० तासांमध्ये आणण्याची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली आहे. त्यासोबतच जम्मू-काश्मीरमधील रेल्वे जाळ्याचा विकासही नेत्रदीपकच म्हणावा लागेल.

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली, तरी जम्मू-काश्मीरमधील रेल्वेचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. पण, गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वेच्या विकासाला वेग आला आहे. खोर्‍यातील रेल्वे ‘कनेक्टिव्हिटी’मध्ये चिनाब पूल हा मैलाचा दगड ठरणार आहे. १,३१५ मीटर लांबीचा, नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर बांधलेला आणि ४६७ मीटरच्या कमानीने सजलेला हा पूल ‘आयफेल टॉवर’ आणि ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या इमारतींपेक्षा देखील उंच आहे. चिनाब नदीवरील हा पूल उत्तर रेल्वे आणि ‘केआरसीएल’च्या संरक्षणाखाली बांधण्यात आला आहे. हा पूल बनवण्यासाठी सुमारे २५ हजार टन धातूचा वापर करण्यात आला. उणे २० अंश तापमान आणि ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे हा पूल सहज सहन करू शकणार आहे. त्याची रचना इतकी मजबूत आहे की, २००१च्या गुजरात भूकंपाप्रमाणे ते उच्च-तीव्रतेचे भूकंपदेखील सहन करू शकणार आहे.

रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेला हा पूल कौरी आणि बक्कल गावांनाच जोडणार नाही, तर काश्मीर ते कन्याकुमारी थेट रेल्वेसेवा सुरू करण्यातही उपयुक्त ठरेल. चिनाब पूल वाहतुकीसाठी उत्तम मार्ग तर उघडेलच, पण सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याचे साधनही बनेल. या पुलामुळे येत्या काळात ‘वंदे भारत’ रेल्वेदेखील काश्मीर खोर्‍यात धावताना दिसणार आहे.चिनाब नदीवरून पुलाप्रमाणेच अंजी भागातील देशातील पहिला ‘केबल स्टाईड’ रेल्वे पूलदेखील जम्मू-काश्मीरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. हा पूल कटरा ते रियासीला जोडेल. या पुलाची लांबी ४७३.२५ मीटर असून, नदीपात्रापासून ३३१ मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल जोरदार वादळांचा सामना करू शकतो. या पुलास ९६ केबल्सद्वारे आधार देण्यात आला आहे. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेलिंक प्रकल्पाचा एक भाग आहे, जो जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील ’रेल्वे नेटवर्क’ मजबूत करेल आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.

या पुलाच्या उभारणीमुळे काश्मीर खोरे रेल्वेसेवेशी जोडली जाणार असून, त्यामुळे या भागातील व्यवसाय आणि इतर आर्थिक घडामोडींना चालना मिळणार आहे. सध्या रियासी शहरापासून अंजी पुलाला रस्त्याने पोहोचता येते आणि जम्मूपासून त्याचे अंतर सुमारे ८० किमी आहे. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशनलिमिटेड’ उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेलिंक प्रकल्प विकसित करत आहे. अंजी रेल्वेपूल सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलामुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, ‘कनेक्टिव्हिटी’ वाढत आहे, त्यामुळे पर्यटन क्षेत्रही मजबूत झाले आहे. आजकाल काश्मीर हे लोकांचे सर्वात आवडते, पर्यटनस्थळ बनले आहे. अंजी रेल्वेपूल बांधल्याने आगामी काळात त्याची संख्या आणखी वाढेल, असा आशावाद पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाचीदेखील वेगवान प्रगती सुरू आहे. या मार्गासाठी खास ‘वंदे भारत’ रेल्वे तयार करण्यात येत आहे. या विशेष रेल्वेची निर्मिती करताना तापमान, बर्फ या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वर्षअखेरीस राज्यात ’टेलिफोन कनेक्टिव्हिटी’, पार्सल सेवा, सिमेंट आणि औषध व्यापारास गती देण्यात येणार आहे. याशिवाय सफरचंद व्यापारासाठीदेखील रेल्वेचा वापर केला जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत झाल्यास तेथील अंतर्गत दळणवळणदेखील वाढणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, दुर्गम भागांपर्यंत रेल्वेद्वारे विकास पोहोचण्यात गती मिळणार आहे. त्यामुळे फुटीरतावाद्यांना या प्रदेशात निर्माण केलेले नकारात्मक वातावरण निवळण्यास नक्कीच लाभ होईल.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.