मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेला धारावी परिसर कात टाकत असून, सोमवार, दि. २७ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमातून धारावीत कुपोषणमुक्तीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.‘कुपोषणावर करू मात, ताजे सकस अन्न खाऊ आहारात’, ‘स्वस्थ माता स्वस्थ बालक’ अशा घोषणेने धारावीचा परिसर दुमदुमून गेला. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा २०२३’ चा शुभारंभ येथील श्री गणेश विद्यामंदिरात करण्यात आला.
या वेळी दै. ’मुंबई तरूण भारत’चे संपादक किरण शेलार, समाजसेवक राजेश खंदारे, मणी बालन, महिला बाल विकास अंगणवाडी पर्यवेक्षक शर्मिला चौगुले, इंदू शिंदे, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या व्यवस्थापक गौरी परब, चीफ बिझनेस ऑफिसर उमेश रॉय-चौधरी, वितरण व्यवस्थापक जितेंद्र सोनावणे, उपसंपादिका योगिता साळवी, ज्योती साठे यांच्यासह धारावी परीसरातील ६०० महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यात गरोदर महिला आणि स्तनदा मातांची उपस्थिती लक्षणीय होती.
‘पोषण पंधरवडा २०२३’चे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र पोषण पंधरवडा २०२३’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘रंगमंच ग्रुप’ या कलापथकाने कुपोषण समस्या आणि उपाय यावर पथनाट्य सादर केले. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतून ओघवत्या स्वरूपातले हे पथनाट्य उपस्थितांना भावले. लकी नानल, अस्मिता मोरे घरत, किरण निवाळकर, गौतम सोनावणे, अमित धादवड या युवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून कुपोषणाबद्दल जनजागृती केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. दीपाली देशमुख यांनी विविध वयोगटातील महिलांच्या आरोग्य समस्या, कुपोषण आणि उपाय, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांनी गरोदरपणात घ्यावयाची काळजी, व्यवस्थापकीय प्रसूतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. वयात येणे, पुढे विवाह, माता होणे आणि त्यानंतर एका वयानंतर पाळी बंद होणे, या सगळ्या स्तरांवर महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यातील बदल, समस्या आणि त्यावर उपाय याबाबत डॉ. दीपाली यांनी मार्गदर्शन केले.
महिलांनी ‘अॅनेमिया’ किंवा इतर कोणत्याही आजारावर महागडी औषधे घेण्याआधी ते आजार होऊ नये, यासाठी सकस आहार घ्यावा. सकस आहारामध्ये स्वयंपाक घरातले दैनंदिन वापराचे पदार्थही आरोग्यसमृद्धीसाठी उपयोगी आहेत, हे त्यांनी सांगितले. सकस पोषक आहाराद्वारे महिलांना होणार्या विविध आजारांना कसे थोपवू शकतो, हे डॉ. दीपाली यांनी विस्ताराने मांडले. या वेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरे दिली.
खुल्या चर्चेला उदंड प्रतिसाद
महिला आणि बालकांमधील कुपोषण समस्या आणि उपाय यावर खुली चर्चा झाली. यात स्थानिक अंगणवाडी सेविका वनमाला गायकवाड, सविता कटके, मीना मोहिते, अमृता चौगुले, माधुरी गायकवाड, जयश्री कदम, यमुना शिंदे या सहभागी झाल्या होत्या. धारावी परिसरातील विविध वस्त्यांमध्ये महिला बाल विकासच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव त्यांनी मांडले. धारावी परिसरातील कुपोषणाचे प्रमाण आणि कारण याबद्दल त्यांनी अनुभव कथन केले. तसेच परिसरात आढळलेल्या कुपोषित बालक आणि त्यांच्या मातांचे आरोग्य सुधारावे, यासाठी काय प्रयत्न केले, याची यशोगाथाही त्यांनी सांगितली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पेस सेलिंग एक्झिक्युटिव्ह राजीव रेवणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी शशिकांत चव्हाण, इंदू शिंदे, शर्मिला चौधरी, ममता पाटील तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली.
पोषण आहाराच्या साहित्याचे प्रदर्शन
‘पोषण पंधरवडा २०२३’च्या पहिल्या टप्प्यात कुपोषण म्हणजे काय? कुपोषणावर मात कशी करावी? भरड धान्य म्हणजे काय? भरड धान्याचा उपयोग करून कुपोषण कसे टाळता येईल, याविषयी जागृती करणारे फलक, स्टॅण्डिज् आणि साहित्य जागोजागी प्रदर्शित करण्यात आले होते.दुसर्या टप्प्यात २८ मार्च रोजी, महापालिकेची शाळा क्र. २ येथे मुलींसाठी गटचर्चेचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ता ज्योती साठे आणि सहकारी या गटचर्चेच्याप्रवर्तक असतील.