योगिता साळवी यांचे आवाहन; ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायद्याची मागणी
25-Mar-2023
Total Views |
मुंबई : “ ‘लव्ह जिहाद’ हे हिंदू समाजासमोर एक मोठे आव्हान आहे. संस्कृती, समाज यावर घाला आहे. महिलांमध्ये शक्ती आहे, आपल्यातील शक्ती जाणून स्वतःचे, कुटुंबाचे समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये चांगले योगदान देऊ शकता. स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाज संस्कृतीच्या विरोधात असलेल्या ‘लव्ह जिहाद’चा धोका ओळखा. यापुढे आणखी श्रद्धा वालकर नको,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी शुक्रवारी केले. ‘अस्मिता’ संस्था आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून अस्मिता भवन, जोगेश्वरी येथे ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘अस्मिता’ संस्थेच्या सौंदर्य प्रशिक्षण वर्गाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभरात ३४६ महिलांनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेत प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनामध्ये दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद समजून घेताना’ हा विषय योगिता साळवी यांनी मांडला.
आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती, समितीचे कार्य, ‘लव्ह जिहाद’, ‘लव्ह जिहाद’च्या घटना याची मुद्देसूद माहिती योगिता साळवी यांनी दिली. यावेळी उपस्थितशेकडो महिलांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा झालाच पाहिजे, ही मागणी केली.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘अस्मिता’संस्थेचे ‘स्किल डेव्हलपमेंट’ विभागामधील ब्युटी आणि फॅशन डिझायनिंग विभागाचे प्रमुख अरविंद शिंदे तसेच, ‘अस्मिता’ संस्थेचे अध्यक्ष शेखर पारखी, ‘अस्मिता’संस्थेच्या कार्याध्यक्ष मेधा बर्वे यावेळी उपस्थितहोते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद शिंदे, मनाली टेमकर, दीपाली शिंदे, मोहिनी पटेल, पूर्वा आढाव, स्नेहल घव्हाळी, दिव्या धुरी, श्रिया शिंदे यांनी खूप मेहनत घेतली.