पंजाबी भाषेत ‘खालसा’ या शब्दाचा अर्थ ‘पवित्र’ असा होतो. म्हणून ‘खलिस्तान’ म्हणजे पवित्र भूमी! पंजाबात शिखांचा (शिष्यांचा) स्वतंत्र देश अस्तित्वात यावा, यासाठीची चळवळ तशी खूप जुनी नाही. पण, शिखांच्या या मागणीला १९७० आणि १९८० या दशकात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. १९८६ नंतर पंजाब पोलिसांनी या खलिस्तानी दहशतवाद्यांविरूद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. त्यामुळे या चळवळीला आणि त्याच्या संबंधित दहशतवादाला आळा बसला. सध्या ही चळवळ ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, अॅास्ट्रेलिया इत्यादी देशात राहाणार्या शीख समुदायातील काहींपुरती प्रामुख्याने मर्यादित असली तरी सध्या तिच्या अतिऊग्र पाठिराख्यांनी भारतात आणि भारताबाहेर उच्छाद मांडला आहे. त्यानिमित्ताने...
तसे पाहिले, तर गुरुदेव नानकांनी सन १५००च्या सुमारास स्थापन केलेला शीख धर्म आधुनिक आणि उदारमतवादी आहे. यातले काहीच अतिरेकी होत आहेत. जनगणने-नुसार भारतात सुमारे दोन कोटी शीख राहतात. ढोबळमानाने ब्रिटनमध्ये शीख संख्येने पाच लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत ०.८८ टक्के आहेत, तर हिंदू संख्येने दहा लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत १.७७ टक्के आहेत. अमेरिकेमध्ये शीख संख्येने पाच लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत ०.२ टक्के आहेत, तर हिंदू संख्येने ३३ लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्के आहेत. कॅनडामध्ये मात्र शीख संख्येने आठ लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत २.१ टक्के आहेत, तर हिंदू संख्येने ८.२५ लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत शिखांपेक्षा थोडेसेच अधिक म्हणजे २.३ टक्के आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये शीख संख्येने दोन लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत ०.८८ टक्के आहेत, तर हिंदू संख्येने सात लक्ष आणि लोकसंख्येच्या तुलनेत २.३ टक्के आहेत.
या देशांमधील बहुसंख्य शीख भारतविरोधी नाहीत, ही एक जमेची बाजू. गुन्हेगारी प्रवृत्तीचे, दहशतवादी मनोवृत्तीचे आणि फुटीरतावादी काही मोजकेशीख सोडले, तर बहुसंख्य शीख भारतनिष्ठ. पण, उद्रेकाला थोडेसे लोकही पुरतात. दुसरा मुख्य मुद्दा हाही आहे की, खलिस्तानी आंदोलकांना थोपवण्यासाठी या चार देशांमध्ये साधा पोलीस बंदोबस्तही भारतीय दूतावासासमोर वेळेवर केला जात नाही. वास्तविक आपल्या देशातीलइतर देशांच्या दूतावासाचे संरक्षण ही त्या त्या देशांची जबाबदारी असते. भारत आणि पाकिस्तानातील शीखबहुल भाग आणि अन्य काही प्रदेश यांचे मिळून शिखांचे ‘खलिस्तान’ नावाचे स्वतंत्र राष्ट्र असावे, अशी काही शीखांची मागणी असून तिला पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ (इंटर स्टेट इंटेलिजन्स) या गुप्तहेर संघटनेची केवळ फूसच नाही, तर साहाय्यही आहे, हे आता अजिबात लपून राहिलेले नाही. खलिस्तानबाबत सहानुभूती असणारे लोक मुख्यत: कॅनडा, अमेरिका, अॅास्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तसेच इतर देशांतही आढळून आले आहेत.भारतातही काही शिखांचा खलिस्तानला पाठिंबा आहे. ब्रिटनमध्ये भारतीय दूतावासावरचा भारतीय राष्ट्रध्वज काढून त्याच्या जागी खलिस्तान्यांनी खलिस्तानी झेंडा लावला.
यावेळी ब्रिटिश पोलीस दल पूर्णपणे उदासीनराहिले. या दूतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती. आजूबाजूला इतके ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे होते की, ही बाब पोलीस दलाला दिसली नाही, यावर विश्वास ठेवता येत नाही. ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेल्या खलिस्तानवाद्यांची मतपेढी दुखावली जाऊ नये किंवा अशाच काही कारणास्तव या बेकायदेशीर कृत्याकडे ब्रिटिश सरकारने दुर्लक्ष केले, असे मानण्यास जागा आहे. याबाबत भारत सरकारने भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांना बोलवून खडसावले आहे. पण, याचा ब्रिटिश सरकारवर फारसा परिणाम होत नाही, हे पाहून भारतातील ब्रिटिश दूतावासासमोरचे संरक्षक कठडे भारताने काढून टाकले. ही मात्रा मात्र लागू पडली. ऑस्ट्रेलियातही दूतावासाच्या भिंतीवर खलिस्तानी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांचे खलिस्तान्यांबाबतीत असेच बोटचेपे धोरण आहे, असा यापूर्वीचाआपला अनुभव आहे. ‘जी २०’च्या संमेलनाच्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे भारतात आले असताना तसेच संसदेचे अधिवेशन भारतात सुरू असताना खलिस्तानी अशी अपमानकारक कारवाई करतात आणि संबंधित देश खंबीरपणे संरक्षक भूमिका घेत नाहीत, याची गंभीर दखल भारताने घेतली आहे, याचा योग्य धडा हे देश घेतील, अशी अपेक्षा बाळगूया.
भारतात खलिस्तानची चळवळ केव्हा आणि कशी सुरू झाली?
सर्वप्रथम १९३० मध्ये काही शीखांनी स्वतंत्र शीख देेशाची मागणी केली होती. मात्र, खलिस्तानची फुटीरतावादी चळवळ १९८०च्या सुमारास स्वतंत्र भारतात विशेष प्रमाणात दिसू लागली. त्यावेळी खलिस्तानमध्ये भारत आणि पाकिस्तानातील पंजाब हा भूभाग, याशिवाय चंदीगडसकट उत्तर आणि पश्चिम भारतातील काही भूभाग समाविष्ट असावा, अशी त्यांची भूमिका होती. या कल्पनेला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचा केवळ पाठिंबाच नव्हता, तर त्यांनी तिला खतपाणीही घातलेहोते. म्हणूनच पाकिस्तानचा खलिस्तानला पाठिंबा आहे, असा सार्थ दावा खलिस्तान चळवळीचे संस्थापक सदस्य जगजितसिंग चौहान यांनी त्या काळात केला होता. पण, पोलिसांची कठोर कारवाई, अंतर्गत कलह आणि मुख्यत: खुद्द शीखांचाच भ्रमनिरास, यामुळे १९९०च्या सुमारास ही चळवळ भारतात जवळजवळ संपुष्टात आली.
पाकिस्तान आणि खलिस्तान
फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये २० लक्ष शीख वास्तव्यास होते, तर आज मात्र केवळ ५० हजारच उरले आहेत. इतर एकतर मारले तरी गेले किंवा परागंदा होऊन भारतात किंवा इतरत्र स्थलांतरित तरी झाले असतील किंवा त्यांचे धर्मांतर तरी करण्यात आले असणार! असे असूनही आजचे खलिस्तानवादी ‘आयएसआय’शी जवळीक साधून भारतविरोधी कारवायांत सहभागी होतात, याला काय म्हणावे? खरेतर त्यांचा संघर्ष पाकिस्तानशी असायला हवा होता. त्यांच्या खलिस्तानच्या स्वप्नात पाकिस्तानमध्ये गेलेला पंजाबच प्रमुखपणे असायला नको होता का? पण, त्याचा विसर खलिस्तान्यांना पडला आहे, याला काय म्हणावे? पण, त्याचबरोबर भारतातील आणि बाहेरच्याही बहुसंख्य शिखांना हे मान्य नाही, हे एक सुचिन्हच म्हटले पाहिजे.
भुट्टो आणि झिया-उल-हक यांची दिवास्वप्ने
भारतावर सतत हल्ले करून त्याला रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहेत. १९७१ पूर्वी पाकिस्तानमध्ये जनरल याह्या खान यांचे लष्करी शासनातलेसहकारी या नात्याने झुल्फिकार अली भुट्टो यांनी प्रथम पूर्वेकडे भारतीय सैन्याचा पराभव करायचा आणि भारताचा संपूर्ण पूर्व भाग व्यापून होताच, त्याला पाकिस्तानच्या दुसर्या भागाशी जोडण्यासाठी एक रुंद रस्ता (कॉरिडोर) उरलेल्या भारतातूनकोरून काढण्याची योजना मांडली होती. तसेच, काश्मीर ‘मुक्त’ करायचे आणि शीखबहुल पंजाबाचे रुपांतर खलिस्तानमध्ये करायची योजना मांडली होती. पुढे जनरल झिया-उल हक यांनी मुस्लीम आणि शीख यातील परंपरागत वैरावर मैत्रीचा तोडगा काढायचा असे ठरविले. शीखांच्या श्रद्धास्थानांना पूर्वीची स्थिती प्राप्त करून द्यायची आणि श्रद्धाळूंना यात्रा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले.
स्वप्न विरले कसे?
इंग्लंड आणि अमेरिकेतून शीख श्रद्धाळूंनी या श्रद्धास्थानांना भेट देण्यास सुरुवात केली. ही मंडळी खलिस्तानची मागणी करण्याच्या बाबतीत आघाडीवर होती. त्यांच्या मुक्कामात पाकिस्तानातील शीखांसमोर खलिस्तानचा प्रचार केला जाऊ लागला. जनरल अब्दुल रहमान यांनी ‘आयएसआय’मध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला. भारतातील शीखांच्या ‘स्वातंत्र्यलढ्याला’(?) साहाय्य करणे, हा यामागचा मुख्य हेतू होता. अब्दुल रहमान प्रौढीने सांगत असत की, शिखांना पूर्ण प्रांत पेटवता आला आहे. कुणाला ठार करायचे, कुठे बॅाम्ब पेरायचे, कोणती कार्यालये उडवायची, हे त्यांना चांगले कळले आहे. धगधगणारा अस्थिर पंजाब ही जणू पाकिस्तानी सैन्याची बिनखर्चाची डिव्हिजनच आहे, अशी दर्पोक्ती जनरल हमीद गुल यांची होती. खुद्द झिया-उल हक मात्र असे काहीही नाही, असे वरवर आणि वारंवार जगभर सांगायचे. भारताने पंजाब आणि पाकिस्तानच्या सीमा भरभक्कम कुंपण घालून बंद केल्यानंतर आणि भारतीय शिखांनी फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे, भारतातीलखलिस्तानी चळवळ हळूहळू विरली.
अमेरिकेतील खलिस्तानी
जून १९८४ मध्ये ‘न्यूयॅार्क टाईम्स’मध्ये एक बातमी प्रकाशित झाली. अमेरिकेची गुप्तहेर संस्था ‘सीआयए’ पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, अशा आशयाची ती बातमी होती. याच सुमारास भारतीय वृत्तपत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले होते, ते असे की, ‘सीआयए’ ही संस्था जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या अनुयायांना शस्त्रास्त्रांची मदत आणि साहाय्य पाकिस्तानकरवी करणार होती, अशीच माहिती भारताच्या ‘रिसर्च अॅलालिसिस विंग’लाही(रॅा) मिळाली होती.
कॅनडामधील खलिस्तानप्रेम
सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर लगेच कॅनडामध्ये अतिरेकी शिखांनी उचल खाल्ली होती. कॅनडाच्या संसदेचे मवाळ सदस्य उज्जल दोसांग यांनी अतिरेक्यांविरूद्ध विचार व्यक्त करताच त्यांना धमक्या देण्यात आल्या.कॅनेडियन शीख असलेले तारासिंग हे ‘इंडो-कॅनेडियन टाईम्स’चे प्रकाशक होते. एकेकाळी ते खलिस्तान समर्थक होते. पण, त्यांनी ‘एअर इंडिया’ची फेरी क्र. १८२च्या बाबतीतल्या घातपातावर कडक टीका केली होती. हा कट रचला जात असतानाचा संवाद आपल्या कानावर पडला असून तशी साक्ष आपण देणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. तरसेम सिंग पुरेवाल हे ब्रिटनमधील पंजाबी साप्ताहिक ‘देस परदेस’चे संपादक होते. यांचीही हत्या करण्यात आली. शीख जहालवादाबाबतची त्यांची शोधपत्रकारिता या हत्येला कारणीभूत असल्याचे मानले गेले.
‘वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशन ऑफ कॅनडा’ने (डब्ल्यूएसओ) शीखांच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश टाकणार्या वृत्तसंस्थेवर मानहानी, खोटेपणा आणि बदनामीचा (डिफेमेशन, स्लँडर अॅण्ड लायबेल) आरोपठेवत खटला भरला. पण, २०१५ मध्ये मात्र याबाबत पुढे काहीही न करण्याचा निर्णय घेतला. ही बाब पुरेशी बोलकी ठरली आहे. कॅनडामधील ज्यांनी ज्यांनी खलिस्तानविरोधी लिखाण केले, त्या सर्वांना जीवे मारण्याच्या धमक्या अगोदरपासूनचमिळत आहेत. २००८ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी शीख दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली होती. २०१७ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर ते खलिस्तानला सहानुभूती दाखवित असल्याचा आरोप करीत त्यांची भेट घेण्यास नकार दिला होता. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी, खलिस्तान हा मुद्दा न कॅनडात आहे न पंजाबात, असे ठणकावून सांगितले होते. तेव्हा जस्टिन ट्रुडो यांनी भूमिका जाहीर केली की, कॅनडा खलिस्तान चळवळीच्या पुनरुज्जीवनाला समर्थन देणार नाही. पण, २०२० मध्ये किसान आंदोलनाच्या निमित्ताने कॅनडा, ऑस्ट्रेलियादी देशात उमटलेल्या प्रतिक्रिया याच जातकुळीच्या आहेत.
ब्रिटनमध्ये फोफावलेले खलिस्तानी
२००८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात पंजाब पोलीस प्रमुखांनी आरोप केला होता की, अतिरेक्यांना ब्रिटनमधील शीखांकडून आर्थिक मदत मिळत असते. बूवूक्ष खालसा आपल्या अनुयायांना पाकिस्तानमधील ‘अल-कायद्या’च्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवीत असते. या वृत्ताची पुष्टी ‘बीबीसी’ने केलेली असल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व आहे.‘इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन’ (आयएसवायएफ) या संघटनेचे सदस्य खून, बॉम्ब हल्ले, आणि अपहरण यासारख्या कृत्यात सहभागी असून हा राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे. पण, अमेरिकेत ही संघटना अतिरेकी मानली जात नाही. ‘बब्बर खालसा’, ‘बब्बर खालसाइंटरनॅशनल’, ‘इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन’ यांना कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताबाहेरील शिखांचे काही गट आजही पैशाचे प्रलोभन दाखवून शिखांना खलिस्तानी गटात सामील करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. किसान आंदोलनाच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा उघडकीस आली होती, याचा विसर पडायला नको. आज ‘जी २०’च्या निमित्ताने खलिस्तानवादी, राजकीय संधीसाधू, अपरिपक्व आणि र्हस्वदृष्टीचे नेते निरनिराळी निमित्ते शोधून परदेशी पाहुण्यासमोर भारताची छबी मलीन करण्याचे हेतूने कधी नव्हेत इतके क्रियाशील झालेले दिसत आहेत.
अमृतपाल सिंगचा उदय
अमृतपाल सिंग संधू हा खलिस्तानवादी आणि स्वयंघोषित शीख धार्मिक नेता पंजाबातील ‘वारिस पंजाब दे’ नावाच्या संघटनेचा नेता. तो पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेशी घनिष्ट संबंध राखून आहे. काही महिने अगोदर याचे नावही कुणाला माहीत नव्हते.आज मात्र तो पंजाबमध्ये ‘मोस्ट वॉण्टेड’ गुन्हेगार मानला जातो. भारतीय पोलीस दल त्याचा कसून शोध घेत असून त्याविरूद्धचे पडसाद परदेशातही उमटताना दिसताहेत. तो सापडत नाही, ही बाब अनेक चिंतायुक्त शक्यतांकडे अंगुलीनिर्देश करते, याची नोंद घ्यायला हवी.पंजाबमधल्या अमृतसर जिल्ह्यातील जाल्लूपूर खेरा येथील कुटुंबातला ३० वर्ष वयाचा हा तरुण कुटुंबीयांसह दुबई येथे २०१२ पासून वाहतूक व्यवसाय करीत होता. कृषीविषयक कायद्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर अमृतपाल भारतात येऊन त्यावेळच्या आंदोलनात सहभागी झाला.
दीप संधू हा पंजाबी अभिनेता पुढे चळवळ्या कार्यकर्ता झाला. त्याला लाल किल्याच्या आवारात दि. २६ जानेवारी, २०२१ला आंदोलन करताना अटक झाली होती. त्याला जामीन मिळाल्यानंतर त्याने ‘वारिस पंजाब दे’ या नावाची संघटना स्थापन केली. पंजाबच्या अधिकारांसाठी लढा देणे, हा संघटनेचा कथित हेतू. दीप संधूचा गेल्याच वर्षी अपघाती मृत्यू झाल्यानंतर अमृतपाल सिंगने स्वत:ला ‘वारिस पंजाब दे‘ या संघटनेचा नेता घोषित केले.दीप संधूचा भाऊ मनदीप संधू याचा असा दावा आहे की, अमृतपालची ‘वारिस पंजाब दे’ ही संघटना याच नावाच्या मूळ संघटनेपासून व्यवहार आणि तात्त्विक भूमिका या बाबतीत अगदी भिन्न आहे. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा कथित धार्मिक नेता आपल्या भावाच्या म्हणजे दीपच्या नावाच्या आडून युवकांना शस्त्र हाती घ्या, अशी चिथावणीखोरवक्तव्ये करीत आहे. दीप संधूचा मात्र वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर विश्वास होता. त्याला शस्त्राचार साफ नामंजूर होता.
‘आठ कॉलमी शीर्षका’च्या दिशेने अमृतपाल सिंगची वाटचाल
फेब्रुवारी २०२३ मध्ये अमृतपाल सिंगने अमृतसरमधल्या बाह्य परिसरातल्या एका पोलीस स्टेशनवर प्रचंड संख्येतील पाठिराख्यांसह हल्ला करून सुरुवातीला माध्यमांमध्ये नाव कमावले. तलवारी नाचवीत आणि धर्मग्रंथाची ढाल करीत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच धुडगूस घातला. पोलिसांकडून आश्वासन घेतले की, अपहरणाच्या गुन्ह्याखाली पकडलेल्या आपल्या साथीदाराची-लव्हप्रीत सिंगची- सुटका करण्यात येईल. तेव्हापासूनअमृतपाल सिंग वृत्तपत्रांच्या पहिल्या पृष्ठावरील ‘आठ कॉलमी शीर्षकां’चा धनी झाला. तो पुढे ‘खलिस्तानचे अंतिम उद्दिष्ट’ साध्य करण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शासनाविरूद्ध सशस्त्र उठावासाठी शीखांना चिथवू लागला.
पंजाब काँग्रेसचे नेते प्रतापसिंग कैराँ आणि इंदिरा गांधी यांचे केंद्रीय नेतृत्व यांतील बेबनावातून भिंद्रनवाले यांचा भस्मासुर उभा राहिला. तो सुवर्ण मंदिरातल्या सैनिकी कारवाईत मारला गेला. शीख समाजाच्या अतिपवित्र पूजास्थानी हे अपकृत्य घडले. अमृतपाल सिंगची बोली आणि देहबोली भिंद्रनवालेची आठवण करून देते. भिंद्रनवालेप्रमाणे गळ्यात काडतुसांची माळ आणि भोवती सशस्त्र रक्षक असा त्याचा थाट असतो. फरक इतकाच की, भिंद्रनवाले अंतर्बाह्य धार्मिक नेता होता. तो एका पुराणमतवादी शीख संघटनेचा-दमदमी टक्सालचा-पूर्णांशाने धार्मिक नेता होता. ‘वारिस पंजाब दे’चा स्वत:ला अवतारी नेता म्हणून पुढे येण्यापूर्वी अमृतपाल सिंग याला अशी कोणतीही धार्मिक पृष्ठभूमी नव्हती/नाही.
अमृतपाल सिंगवरील आरोप
‘आर्म्स अॅक्ट’खाली अमृतपाल सिंगवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या साथीदारांकडून शस्त्रास्त्रांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ‘आयएसआय’ या पाकिस्थानी गुप्तहेर संघटनेशी असलेल्या त्याच्या संबंधाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. परकीय दहशतवादी संघटनांच्या संपर्कात तो असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनस्थित खलिस्तानी दहशतवादी नेता अवतार सिंग खांडा याचे प्रोत्साहन अमृतपाल सिंग याच्या उदयास कारणीभूत ठरले असल्याचे मानतात. एक खासगी सैन्य उभारण्यासाठी व्यसनाधीन तरुणांसाठीच्या उपचार केंद्रातून उपचार घेणार्या तरुणांना या खासगी सैन्यात उग्र आंदोलनांमध्ये सामील होण्यासाठी तयार केले जाते, असा आरोप खलिस्तानी नेत्यांवर आहे. यांच्या हाती असलेली शस्त्रे पाककडून ड्रोनच्या साहाय्याने पुरविली जात असल्याचे पुरावे मिळाले असल्याचेही वृत्त समोर आले आहे.
मुखी कोणतीही भाषा असली तरी दहशतवादी तो दहशतवादीच! एकेकाळी भारताचा खड्गहस्त म्हणून कीर्ती संपादन करणारा अख्खा पंजाब आज झोकांड्या खातो आहे. दहशतवाद्यांना किंचितही सहानुभूती दाखविणे म्हणजे विनाशाला आमंत्रण होय. फुटीरतावादी खलिस्तानी दहशतवाद्यांचे पाकिस्तानी ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेशी, ‘इस्लामिक स्टेट’म्हणून ओळख असलेल्या संघटनेचे लागेबांधे आहेत, हे लक्षात येताच त्यांचा पूर्ण बंदोबस्त हेच उद्दिष्ट असले पाहिजे. समाजाची वीण विस्कटण्याच्या हेतूने काम करणार्यांबाबत, भारतीय भूमीत शांततेला बाधा पोहोचविणार्यांबाबत सहानुभूती बाळगणारे गट फार मोठी चूक करीत आहेत. आपल्या गुप्तहेर खात्याला काहीशा उशिराने, अमृतपाल सिंग याच्या कारस्थानाचा सुगावा लागला. याच्या मुळाशी वृथा सहानुभूती बाळगणार्या काही बोटांवर मोजता येतील एवढ्या स्थानिक घटकांचा पाठिंबा होता, हे स्पष्ट आहे.
बहुसंख्य शीख समाज आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगतो आहे, ही आपली भारतीयांची फार मोठी जमेची बाजू आहे. दहशतवादी असलेल्या काही तुरुंगवासीयांना जामीन मिळतोच कसा, हा अभ्यासाचा विषय आहे. या विषयीच्या कायद्यातील कच्चे दुवे दूर केले पाहिजेत. पंजाब उच्च न्यायालयाने ८० हजार पोलीस अमृतपाल सिंगला का पकडू शकत नाहीत, असा प्रश्न विचारला आहे. तो सर्वांना म्हणजे पोलिसांबरोबर, नागरिक, राजकारणी, आणखीही कुणाकुणाला अंतर्मुख करणारा आहे. कुणास ठावूक, पण बहुसंख्य भारतीय समाज, मग तो आज भारतात राहात असो वा भारताबाहेर, देशप्रेम, देशनिष्ठा, देशभक्ती अशा शाश्वत मूल्याधिष्ठित जीवन व्यतित करू इच्छितो. तो असल्या घरभेद्यांना, कच्च्या लिंबांना, कोळिष्टकांना आणि जळमटांना स्थान देणार नाही, काळाच्या ओ घात बसलेली काजळी पुसून काढील. हेच भारताचे शक्तिस्थान आहे.
-वसंत गणेश काणे