वाडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि शेतकरी अवजार, कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या जयवंत हरिश्चंद्र वाडेकर उर्फ दादा वाडेकर यांची नुकतीच वयाच्या ८२व्या वर्षी प्राणज्योत मालवली. वाडेकर यांनी रा. स्व. संघाचे पालघर जिल्ह्याचे माजी संघचालक, पंचायत समिती सदस्य, पालघर जिल्हा भाजपचे प्रसिद्धी प्रमुख अशी विविध पदे भूषविली होती. तसेच एक यशस्वी उद्योजक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक म्हणूनही ते सुविख्यात होते. त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांजली अर्पण करणारे हे लेख...
मानवी जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे, असे आपण मानतो. दादा आज आपल्यात नाहीत, हे कटू सत्य स्वीकारून त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला, तर संघ ते जनसंघ, जनसंघ ते जनता पार्टी, जनता पार्टी ते आज देशभरात व राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे, तो भारतीय जनता पक्ष, असा तब्बल मी पाहिलेला व अनुभवले दादांचा ४५ वर्षांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व दीपस्तंभासारखा आहे.
१९७७ साली त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने देशभरात लादलेली आणीबाणी व त्यात विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी निरपराध कार्यकर्त्यांना झालेली अटक, यातून दादा वाडेकरही सुटले नाहीत. दुर्दैवाने दोन वर्षांत जनता पार्टीचे पतन झाले व १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. या स्थापनेनंतर सैरभैर झालेल्या माझ्यासारख्या तरुणांना दादांनी अनेक बौद्धिक देऊन भारतीय जनता पक्षाचा रस्ता दाखविला.
दादा संघाचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे वाडा येथील निवासस्थान हे केवळ संघाचे नव्हे, तर भारतीय जनता पार्टी चळवळीचे केंद्र बनले. संघाच्या व भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांचा त्यांच्याकडे राबता होता. त्यात दामु अण्णा टोपेकर, माधवराव काणे, वसंतराव भागवत, वसंतराव पटवर्धन, भगवानराव जोशी, रामभाऊ म्हाळगी, प्राध्यापक रामभाऊ कापसे यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या प्रेरणेनी व दादा वाडेकर यांच्या पुढाकाराने आम्ही भाजपच्या कार्याला वाहून घेतले.
पक्षाची धुरा सांभाळत असतानाच चिंतामण वनगा व विष्णू सवरा यांचा परिचय झाला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे व वसंतराव पटवर्धन यांनी चिंतामण वनगा यांना खासदार म्हणून व विष्णू सवरा यांना आमदारकीसाठी पुढे केले. येणार्या प्रत्येक निवडणुकीत प्रचार व प्रसार याची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती, त्यावेळी दादांचा नेहमीच संपर्क येत असे. त्यांची प्रेमळ वागणूक, मोलाच्या सूचना देण्याची पद्धत, त्यांची विचार व कार्यावर असलेली निष्ठा आम्हाला प्रेरित करीत असे. संघ परिवार व भारतीय जनता पक्षात त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत होती. त्यांनी ठरविले असते, तर कुठल्याही मोठ्या पदावर जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्विवाद होती.
परंतु, प्रत्यक्ष प्रकाशात न येता पडद्यामागे राहून कार्यकर्त्यांना बळ देण्याची त्यांची कामाची पद्धत वाखाणण्याजोगी होती. २००० साली महाराष्ट्रभरात शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी मी कुणबी सेनेची निर्मिती केली. त्यासाठी महाराष्ट्रभर शेतकर्यांच्या चळवळी उभ्या केल्या, त्या प्रत्येक चळवळीची दादांनी मनात कुठलाही किंतु न ठेवता, नेहमीच आपुलकीने चौकशी केली. त्यांचे व माझे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध अबाधित राहिले.संघ विचारांच्या प्रचार व प्रसाराचे पाईक असलेल्या एक कर्तृत्ववान व नम्र व्यक्तीला आपण मुकलो आहोत. त्यांचे अपुरे राहिलेले कार्य पुढे चालू ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरू शकेल.
-विश्वनाथ पाटील