मुंबई : ग्रँट रोड परिसरात माथेफिरुने चाकूहल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पार्वती मेन्शन या बिल्डींगमध्ये एका माथेफिरुने एकाचवेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केला आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यु तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री अशी मृतांची नाव आहेत. तर चेतन गाला असं आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावात आणि रागाच्या भरात हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. चेतनचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यामुळे त्याचा शेजाऱ्यांवर राग होता. शेजारी पत्नीला फूस लावतात, असा त्याला संशय होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात शेजाऱ्यावर हल्ला केला.
दरम्यान, उर्वरीत तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. डी.बी मार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.