आनंदकेसा ऐसा
या श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ओळी आज स्मरण्याचे कारणही काहीसे तसेच. फक्त हा आनंद आपल्या हिंददेशाऐवजी दूर युरोपात फिनलंडमध्ये साजरा होताना दिसतो. त्याचे कारण म्हणजे, सलग पाचव्या वर्षी फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. त्याखालोखाल नंबर लागलेले देशही असेच ‘नॉर्डिक’ युरोपातील देश. याच यादीत आपल्या भारताचा क्रमांक युद्धग्रस्त असलेल्या रशिया, युक्रेन आणि पाकिस्तानपेक्षाही मागे. एकूण १५६ देशांपैकी आनंदी देशांच्या यादीत आपण आहोत तब्बल १२६व्या क्रमांकावर! त्यानिमित्ताने फिनलंडमध्ये खरंच लोकं एवढी आनंदी कशी, हे समजून घेणे औत्सुक्याचे ठरावे.
फिनलंड हा उत्तर युरोपातील तसा एक संपन्न देश. या देशाच्या पश्चिमेला स्विडन, तर पूर्वेला भलामोठा रशिया. उत्तरेला बर्फाळलेला आर्क्टिक महासागर, पश्चिम-दक्षिणेला बाल्टिक समुद्र. म्हणूनच युरोपियन देशांमध्ये फिनलंडचे स्थानही तसे मोक्याचे. या देशाची लोकसंख्याही अवघी ५.६ कोटी. शिक्षण, नोकरी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा बहुतांश बाबतीत हा देश तसा सुखवस्तूच. पण, उत्तर गोलार्धात असल्यामुळे तापमान, सूर्यप्रकाशाच्या वेळा याबाबतीत मात्र फिनलंड कायम गारठलेला. तापमानाचा पारा बहुतांशी-२० अंशांच्या खाली. मग तरीही फिनलंडवासीय इतके आनंदी कसे काय? तर त्याचे उत्तर फिनलंडच्या समाजजीवनात दडलले दिसते. फिनलंडमध्ये सामाजिक सलोखा, ‘एकमेका साहाय्य करू’ ही वृत्ती जणू त्यांच्या ‘डीएनए’मध्येच. त्यातच माणूस कितीही श्रीमंत असला तरी श्रीमंतीचे तिथे ओंगळवाणे प्रदर्शन नाही. हेच उदाहरण बघा. फिनलंडमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीलाही म्हणे आपल्या बाळाची बाबागाडी घेऊन साध्या ट्राममध्ये चढताना अनेकांनी पाहिले आहे. विशेष म्हणजे, त्याचे अप्रूपही या फिनलंडवासीयांना नाही. म्हणजे बघा, आपल्याकडे लगेच एखादा मंत्री, अभिनेता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतो, तर त्याची बातमी होते. परंतु, फिनलंड याला अपवाद. एवढेच नाही,तर फिनलंडवासीयांनी आपले काम आणि कौटुंबिक जीवन यामध्येही सुयोग्य ताळमेळ साधलेला.
उन्हाळ्याच्या चार आठवड्यांच्या सुट्ट्यांमध्ये फिनिश नागरिक कुटुंबासकट चक्क देशातील ग्रामीण भाग गाठतात. तिथे कदाचित वीज नसेल, पाणीही नसेल, तरीही निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हायला फिनिश नागरिकांना आजही आवडते. त्याचबरोबर कडक कायद्यांमुळे कमीतकमी प्रदूषण, शिस्तप्रिय नागरिक, तत्पर प्रशासन व्यवस्था, उत्तम वैद्यकीय सेवासुविधा, मोफत शिक्षण यांसारख्या कित्येक बाबतीत फिनलंड हा सर्वस्वी उजवा ठरतो. त्याचबरोबर फिनिश नागरिकांचा प्रामाणिकपणा, गुन्हेगारीचे नगण्य प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांप्रती असलेला विश्वास हादेखील तितकाच वाखाणण्याजोगा. या परस्पर विश्वासाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय ‘कोविड’ महामारीच्या काळात दिसून आला. एकेकाळी युरोपियन देशांमध्येही कोरोनाने थैमान घातले असताना फिनलंड, स्विडन, डेन्मार्क यांसारख्या ‘नॉर्डिक देशांचा समूह’ म्हणून ओळखल्या जाणार्या युरोपीय देशांमध्ये मात्र महामारी तुलनेने आटोक्यात होती.
या देशांमध्ये कोरोना मृत्यूचे प्रमाण हे एक लाखांमागे २७ मृत्यू, तर उर्वरित युरोपात हेच प्रमाण ८० टक्के इतके होते. त्यामुळेच आनंदाच्या या नागरी सर्वेक्षणात, सर्वच कसोट्यांवर फिनलंडने बाजी मारलेली दिसते. आर्थिक प्रगती ही कुठल्याही देशाच्या विकासाचे एक मुख्य निर्देशक. पण, एखादा देश आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम, सबळ असला तरी त्या देशातील नागरिक आनंदी असतीलच असे नाही. म्हणजे अमेरिका हा महासत्तेचा, जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था असलेला देश. पण, आनंदी देशांच्या बाबतीत मात्र हा देश १५व्या क्रमांकावर. त्यामुळे आनंदी देशासाठी त्या देशाचे नागरिक आनंदी, समाधानी हवे. कारण, आनंद हा पैशात मोजता येत नाही, तर एका सामान्य माणसाच्या दैनंदिन घडामोडींशी, जीवनशैलीशी त्याचा अगदी जवळचा संबंध असतो. तेव्हा, युद्धखोर रशिया, युक्रेन आणि दिवाळखोर पाकिस्तानपेक्षाही आपण या यादीत इतके मागे असू, तर निश्चितच हा चिंतनाचा विषय ठरावा. ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही, तर एक भारतीय म्हणून, एक समाज म्हणून आपले ध्येय-उद्दिष्ट काय, याचाही विचार यानिमित्ताने करणे क्रमप्राप्त ठरावे!