राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जनसेवा न्यासाची स्थापना १९९७ मध्ये झाली. प्रामुख्याने समाजातील दुर्बल आणि गरजू मुलांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबन आणि प्रशिक्षण देण्याच्या हेतूने अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. नावातच लोकसेवेचा संकेत असलेले जनसेवा न्यास हे पुण्यातील नागरी परिसरात असलेल्या वंचितांच्या सेवेसाठी तत्पर असलेले संघटन आहे. अण्णा वाळिंबे आणि अतुल लिमये यांच्या पुढाकारात सुरु झालेले हे सेवाकार्य आता त्या भागातील वंचित कुटुंबात सकारात्मकतेची भावना निर्माण करते आहे.
हडपसरच्या वैजुवाडी, रामटेकडी, माळवाडी, गाडीतळ, पापडेवस्ती अशा ३० वस्त्यांमध्ये राहणीमानात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जनसेवा न्यासच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. आरोग्य, संस्कार, शिक्षण आणि बदलत्या काळानुसार डिजिटल अभ्यासक्रमाचा उपयोग करुन या भागातील मुलांना शिक्षणाकडे वळविणे, आरोग्याबाबत जागरुक करणे आणि स्वावलंबी बनवणे, यावर भर दिला जात आहे.कोरोना काळात न्यासाने स्वखर्चाने दहा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करुन जवळपास ९० हजार जणांचे लसीकरण नि:शुल्क करण्याची कामगिरी केली आहे.या कामगिरीबाबत अधिक माहिती देताना जनसेवा न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कुलकर्णी आणि कार्यकारी विश्वस्त माधव राऊत यांनी सांगितले की, आम्ही सातत्याने या परिसरातील नागरिकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी सक्रिय आहोत. न्यासाकडून जे कार्य केले जाते, त्यात संस्कार वर्ग, अभ्यासिका, शिक्षकांचे प्रशिक्षण, आरोग्यविषयक कार्यक्रम आणि विशेष दिनांचे आयोजन केले जात असते.
नवीन शैक्षणिक वर्षात संस्कार वर्ग व अभ्यासिका शिक्षिकांचे प्रशिक्षण घेतले जाते. तसेच जागतिक योग दिनानिमित्त संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, ‘पर्वतासान’, ‘भुजंगासन’, ‘पद्मासन’, ‘वज्रासन’, ‘वृक्षासन’, ‘गोमुखासन’, ‘ताडासन’. इ योगासने शिकविली जातात. मुलांना व्यायामाचे व योगासनांचे आपल्या आयुष्यात असणारे महत्त्व यामुळे समजते. कोरोनानंतर दोन वर्षांनी मुले शाळेत परत जाऊ लागली तेव्हा जनसेवा न्यासाच्यावतीने सर्व अभ्यासिकेतील जवळपास ७६४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य यज्ञात ज्या अज्ञात क्रांतिवीरांनी समर्पण दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहणे हे आपले परमकर्तव्य आहे, या भावनेतून ’अज्ञात क्रांतिवीर’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ‘जागतिक पेपर बॅग दिना’चे औचित्य साधून आणि प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास हानिकारक आहेत, ही जागृती करण्याच्या हेतूने सर्व विद्यार्थ्यांनी पेपर बॅग दिनाच्या निमित्ताने अनेक पेपर बॅग तयार करून वस्तीतील फळ भाजी विक्रेत्यांना दिल्या.
_202303212214410824_H@@IGHT_392_W@@IDTH_696.jpg)
पिशव्या देताना विद्यार्थ्यांनी फळ भाजी विक्रेत्यांना ‘प्लास्टिक पिशवी चा वापर टाळा, प्रदूषणाला बसेल आळा’ व ‘पेपर बॅग वापरा’ हा संदेश दिला. तसेच पेपर बॅग वापरताना जपून वापरावी. पेपर बॅगसाठी झाडे तोडावी लागतात, याची जाणीव ठेवून पेपर बॅगचा गरजेपुरताच वापर करावा, असे सांगितले.या वस्तीतील मुलांचे क्रीडा क्षेत्रातील गुण विकसित करण्यासाठी आणि आरोग्याच्यादृष्टीने खेळ आणि व्यायाम याचे महत्त्व उलगडून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विशेषतः स्वरक्षणासाठी दीड वर्षांपासून या विद्यार्थ्यांसाठी कराटे प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत. विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत न्यासाच्या १४ विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केले. आता एकूण आठ वस्त्यांमध्ये कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून संस्कार वर्गातील मुलांकडून लंगडी, खोखो, कबड्डी, लगोरी, असे मैदानी खेळ खेळून घेतले जातात. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत संस्था दरवर्षी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेत असते. हडपसर भागातील कार्यशाळेत ४०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. काही शालेय विद्यार्थी काही तरुण युवक-युवती तर काही वरिष्ठ मंडळी सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये जनजागृती होऊन आता ते ’पीओपी’ची मूर्ती न घेता घरी स्वतः शाडू मातीची मूर्ती तयार करून त्या मूर्तीची स्थापना करतात. त्यामुळे जनसेवा न्यासाचा या कार्यशाळेमागचा हेतू साध्य झाल्यासारखे वाटते.
विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, आत्मविश्वास वाढविणे, आपले सादरीकरण कसे असावे, यावर वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय त्यांचे प्रात्यक्षिक घेण्याच्या दृष्टीने जनसेवा न्यासाने सर्व शिक्षिका व टीम लीडरसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनदेखील केले जाते.दरवर्षी या स्वयंसेवक महिला दुचाकी रॅली, स्टोअरी कट्टा कार्यशाळा, गणपती वर्कशॉप, त्रिपुरारी पौर्णिमा, हडपसर भागातील सेवावस्तीतील मुलांना भेटून त्यांच्या सोबत वेळ व्यतित करणे, व्याख्याने अशा अनेक उपक्रमात सहभागी होत असतात. यावर्षीही फक्त या सर्व स्वयंसेवकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करावा, असा विचार होता, ज्यातून संस्थेला अजून स्वयंसेवक जोडल्या जातील. नवरात्रीत गरबा तर आपण नेहमीच खेळतो. म्हणूनच नवरात्रीच्या निमित्ताने जनसेवा न्यासाने सगळ्या स्वयंसेवक मैत्रिणींसाठी खास भोंडल्याचे आयोजन केले. तसेच संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी दीप अमावस्या, महापुरूष जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, कारगिल दिन, रक्षाबंधन, बालदिन या दिवशी अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
आरोग्य तपासणी शिबीर
‘जनसेवा न्यास’तर्फे हडपसरमधील विविध सेवावस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबीर घेतली जातात. शिबिरात मुलांचे वय, उंची, वजन घेण्यात येते आणि त्यांची तपासणी करून त्यांना डॉक्टर औषधे लिहून देतात. मुलांची काळजी कशी घ्यायची, हे उपस्थित पालकांना सांगितले जाते. मुलांची दंततपासणी होऊन मुलांना पोषक आहाराविषयी मार्गदर्शन केले जाते. शरीराची स्वच्छता कशी राखावी, याबद्दलही मार्गदर्शन केले जाते.
दिवाळी किट
संस्थेला वर्षभर अनेक देणगीदार, संस्था, कंपन्या विविध प्रकारचे मार्गदर्शन करतात. काही जण वस्तुरूपात मदत देतात, तर कोणी आर्थिक स्वरूपात मदत पुरवतात. काही स्वयंसेवक स्वतःचा मौल्यवान वेळ देऊन संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. या सगळ्या हितचिंतकांसाठी ‘जनसेवा न्यासा’च्या विद्यार्थ्यांनी ‘दिवाळी किट’ तयार केले. यात पणत्या, तोरण, आकाशकंदील व दिवाळीच्या शुभेचा देणारे भेटकार्ड आहे.
गणित दिन
२२ डिसेंबर हा दिवस भारतातील थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. या दिनाला अनुसरून जनसेवा न्यासाने सर्व अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचे गणित प्रदर्शन हडपसर भागात एकूण दहा ठिकाणी आयोजित केले होते. यामध्ये २१० विद्यार्थी सहभागी झाले होते. या गणित प्रदर्शनामध्ये मुलांनी वैदिक गणितातील सोप्या पद्धतीने गणित कसे सोडवायचे?, कमीत कमी वेळात वर्ग, घन, गुणाकार कसे करायचे?, अंक गणितातील अनेक गमती-जमती, गणितातील खेळ, गणिती कोडी, पाढे पाठ नसताना देखील फक्त अंक मोजणीने पाढे एकदम सोप्या पद्धतीने कसे लिहायचे? अशा अनेक गोष्टी प्रदर्शनात दाखवल्या. हे प्रदर्शन बघण्यासाठी हडपसर भागातील नागरिक, पालक वर्ग, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक यांनी प्रचंड गर्दी केली होती.
सामूहिक अथर्वशीर्ष पठण
सलग गेले पाच वर्ष आपण सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेत आहोत. याही वर्षी हडपसर भागातील जनसेवा न्यासाच्या सर्व सेवा वस्त्यांमध्ये दि. ७ सप्टेंबर रोजी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. या कार्यक्रमाचा प्रसाद तीन हजार विद्यार्थ्यांना ‘इस्कॉन’कडून देण्यात आला.
सातववाडी हडपसर येथे राहते. माझा मुलगा आर्यन सोनावणे इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. यावर्षी कोरोनामुळे शाळा ऑनलाईन होत्या. पण माझा मुलगा सरासरी असल्याने त्याला ऑनलाईन शिकवलेले नीट समजत नव्हते. नोव्हेंबर महिन्यात ‘जनसेवा न्यासा’ची अभ्यासिका सुरू झाली आणि माझ्या मुलाला दहावीचा अभ्यास नीट समजून उमजून करण्याची नवी संधी चालून आली. नंतर जानेवारी महिन्यात आम्ही आर्यनला दहावीच्या परीक्षेसाठी समुपदेशनासाठी घेऊन गेलो. समुपदेशनाची चार-पाच सत्रे झाली आणि मला नक्की खात्री आहे की, आर्यनला या सगळ्याचा खूप फायदा होऊन चांगले गुण मिळाले. या सर्व मदतीसाठी मी ’जनसेवा न्यासा’चे खूप आभार मानते.(यशश्री सोनावणे)
माळवाडी हडपसर येथे राहत असून ’लॉकडाऊन’ पूर्वी मी खानावळ व साडी विक्रीचा व्यवसाय करत होते. पण अचानक कोरोना काळामध्ये महाविद्यालये बंद झाल्यामुळे सर्व परगावचे विद्यार्थी आपल्या घरी गेल्यामुळे माझे खानावळीचे डबे बंद झाले. लोकांकडे पैसा नसल्याकारणाने साड्या विक्रीच्या व्यवसायावर पण परिणाम झाला. मी व माझ्या कुटुंबाला अत्यंत आर्थिक गरज होती. अशाच परिस्थितीमध्ये मी संस्थेत जाऊन माहिती घेतली व त्यांच्या मदतीने कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्रे तयार करून संस्थेकडे जमा केली. त्यानंतर मला बँकेकडून ५० हजार रुपये कर्जाची मदत मिळाली व त्या मिळालेल्या पैशांतून आज माझ्या साड्या विक्रीच्या व्यवसायालाही पुन्हा भांडवल उभे झाले. मी ‘जनसेवा न्यासा’चे खूप खूप आभार मानते.(राधिका खळदकर)
हडपसर येथे राहत असून ‘लॉकडाऊन’च्या आधी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मावशी म्हणून काम करत होते. ‘लॉकडाऊन’मध्ये सर्व शाळा बंद झाल्यानंतर माझे शाळेतील काम बंद झाले. चार महिने मी घरी बसून होते. त्या काळामध्ये माझ्या कुटुंबाची खूप बिकट अवस्था झाली होती. सप्टेंबर महिन्यात मला ‘जनसेवा न्यास’ संस्थेतील संस्कार वर्गाच्या बाईंकडून रोजगार मेळाव्याची माहिती मिळाली. मी त्या रोजगार मेळाव्याला गेले. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी माझे शिक्षण त्या अटीत बसत नव्हते. पण तरीसुद्धा माझी व माझ्या कुटुंबाची गरज जाणून संस्थेने मला आधी एका ऑफिसमध्ये मावशी म्हणून काम लावून दिले. नंतर काही दिवसांत मला अजून दोन ठिकाणी काम मिळवून दिले. त्यानंतर मी आजपर्यंत या तीन ऑफिसमध्ये मावशी म्हणून काम करत आहे. मला सांगताना खूप आनंद होत आहे की, माझ्या शाळेच्या पगारापेक्षाही आज संस्थेने दिलेल्या कामांमध्ये मी जास्त उत्पन्न मिळवून माझ्या कुटुंबाची गरज चांगल्या पद्धतीने भागवत आहे. या सगळ्यासाठी मी ‘जनसेवा न्यासा’ची खूप आभारी आहे.(स्वाती गायकवाड)
सेवा वस्ती आणि ग्रामीण भागातील भागातील मुले विविध कला सादर करण्यास सक्षम असतात मात्र त्यांना संधी मिळत नाही. तसेच मूल्यशिक्षण मिळणेही दुरापास्त असते. मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळण्याचे प्रमाण खूप कमी असते. सेवा न्यासाच्या संयुक्त प्रयत्नांनी त्यांना योग्य मार्गावर घेऊन जाणे आणि पुनरावर्तीचे संस्कार बळकट करणे, हे आमचे ध्येय आहे. ‘जनसेवा न्यास’ शिष्यवृत्ती, ग्रंथालय, संस्कार केंद्र, अभ्यासिका , किशोरी विकास व वर्ग इत्यादी विविध मार्गांनी मुलांचे संगोपन करण्यात योगदान देत आहे. आम्हाला अधिक मुलांपर्यंत पोहोचायचे असल्याने मदतीची गरज आहे. अनेक वेगवेगळ्या मार्गांनी तुम्ही मदत करू शकता. देणगी देऊन, मौल्यवान वेळ देऊन, आपण सर्वजण एकजुटीने आपल्या भावी पिढीला जबाबदार, उज्ज्वल आणि सक्षम नागरिक बनवूया...(माधव राऊत, कार्यकारी विश्वस्त)
-अतुल तांदळीकर