हरित स्वप्नपूर्तीचा अथक रवि‘प्रयास’

    20-Mar-2023
Total Views |
Ravi Chaudhary

रवी चौधरीने छत्रपती संभाजीनगरसह देशातील अनेक शहरांत चार लाखांहून अधिक वृक्षांची केवळ लागवडच केली नाही, तर ती जगवलीसुद्धा. अशा या ‘ट्री मॅन’ रवी चौधरीच्या हरित स्वप्नपूर्तीचा हा प्रवास...

 
रवी चौधरीचा जन्म उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथील सिक्टा गावाचा. परंतु, इयत्ता तिसरीनंतर रवी महाराष्ट्रात दाखल झाला. कारण, त्याचे वडील छत्रपती संभाजीनगरला व्यवसाय करीत होते. शालेय जीवनात रवी ‘एनसीसी’मध्ये कॅडेट होता. संरक्षण सेवेत जाऊन देशसेवेचे त्याचे स्वप्न होते. छत्रपती कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन रवीने बारावी पूर्ण केली. त्या महाविद्यालयात ‘एनसीसी’ नसल्याने देशप्रेमी रवीने देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘एनसीसी’ छात्र असताना रवीला ‘आरडीसी’ कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधीदेखील मिळाली. इथेच रवीच्या मनात देशभक्ती आणि पर्यावरणरक्षणाचे बीजारोपण झाले.

२०१० मध्ये ‘आरडीसी’मध्ये राष्ट्रपती भवन येथे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेटून संवाद साधण्याची संधी रवीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ‘एनसीसी’मधून उत्तीर्ण झाल्यानंतरही राष्ट्रासाठी, समाज, पर्यावरणासाठी योगदान द्या, थांबू नका, असा संदेश तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रवीसह सहकार्‍यांना दिला. येथूनच रवीच्या मनात पर्यावरण, वृक्षसंवर्धनात काम करण्याची संकल्पना रुजली. शिक्षण घेतानाच रवी चौधरी, सुभाष चव्हाण आणि इतर चौघांनी ‘प्रयास गु्रप’ची स्थापना केली. प्रथम छ. संभाजीनगर येथे विद्यापीठामागील गोगाबाबा टेकडी येथे स्वच्छता अभियानाने कामाचा शुभारंभ झाला. पहिल्या वर्षी या गु्रपने ३७ झाडे लावली. मात्र, त्यातील एकच वडाचे झाड जगले. त्यानंतर झाडे जगवण्यासाठी रवीने वृक्षरोपणाला संशोधन आणि अभ्यासाची जोड दिली सुरु केला. दरम्यान, कामामुळे लष्कारात जाण्याचे स्वप्न मागे पडले.


मराठवाड्यात जंगले नसल्याने भीषण दुष्काळ पडतो, हे अभ्यासाअंती सिद्ध निघाल्यानंतर रवीने ‘प्रयास’च्या माध्यमातून वृक्षारोपण आणि जलसंधारणाचे काम करावे, याकडे लक्ष केंद्रित केले. दर रविवारी ’प्रयास’चे सदस्य श्रमदान करुन लागले. स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असा प्रवास सुरु झाला. या चमूला छत्रपती संभाजीनगर येथे देशी वृक्ष कमी असून विदेशी वृक्ष अधिक असल्याचे दिसत होते. त्यामुळे मग वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुन, अशा देशी वृक्षांची लागवड ‘प्रयास’तर्फे केली जाऊ लागाली. चार-पाच जणांच्या ग्रुपला पुढे अनेक लोक जुळत गेले आणि ‘प्रयास’च्या कामाचे स्वरुप अधिकच व्यापक झाले.

२०१४ मध्ये ‘प्रयास युथ फाऊंडेशन’ नावाने ‘एनजीओ’ची स्थापना झाली. रवीने स्थापन केलेल्या ‘प्रयास’ संस्थेच्या माध्यमातून पक्षिसंवर्धन, पर्यावरणपूरक उत्सव, कृत्रिम घरटे तसेच कापडी पिशवीनिर्मिती करुन तिचे वाटप, बीजसंकलन, पेपर रद्दी संकलन व पुनर्वापर, वाहतूक जनजागृती असे अनेक उपक्रम नियमितपणे सुरु झाले. वृक्षारोपणाला मानवी भावनांचा स्पर्श देण्यासाठी ‘प्रयास’ने लोकांचे वाढदिवस, त्याच्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस, स्मृतिदिनाचे आणि विशेष औचित्यांवर झाडे लावून ती जगवण्याचा उपक्रम सुुरु केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या ‘एनजीओ’ला शिक्षण, ज्ञानाचा फायदा व्हावा, यासाठी रवीने पुढे वाणिज्य शाखेतून ‘सामाजिक उत्तरदायित्व’ याच विषयावर ‘एम.फिल’पूर्ण केले.
 
‘प्रयास’तर्फे विविध गृहसंस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण यशस्वी होऊ लागले. नागरिकांना मोफत रोपटे आणि सेंद्रिय खत देत ‘प्रयास’ विविध नागरी वसाहती, कॉलनीत वृक्षारोपण करु लागली. लावलेल्या झाडांची निगा नागरिकांच्याच मदतीने राखली जात असे. पावसाळ्यात ’ना नफा ना तोटा’ तत्त्वावर ‘प्रयास’ नर्सरी विकसित करते. नागरिकांना अत्यल्प किमतीत रोपे, झाडे दिली जातात. शहरातील अनेक मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ‘प्रयास’ सोबत ‘सामाजिक उत्तरदायित्व’चा करार करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये छ. संभाजीनगर येथील वाळूंज ‘एमआयडीसी’त ‘प्रयास’ने ७५ हजार वृक्षांचा ’मियावाकी’ प्रकल्प पूर्ण केला. चिकालठाणा औद्योगिक परिसरात सुमारे २५ हजार वृक्ष लावण्यात आले.

राज्यातच नव्हे, तर देशातही वृक्षारोपणाचे प्रयोग यशस्वी होत गेले. राजस्थान-बिकानेर येथे ‘बीएसएफ’च्या सहकार्याने हिंदुस्थान-पाकिस्तान सरहद्दीवर वृक्षारोपण यशस्वी झाले. छ. संभाजीनगर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत रवी आज सदस्य म्हणून काम करत आहे. ’प्रयास’मध्ये आज ७० सक्रिय सदस्य असून सात पदाधिकारी आहेत. रवी अध्यक्षपद सांभाळत आहेत. गेल्या १३ वर्षांत ‘प्रयास’तर्फे देशभर साडेतीन लाख झाडे लावली असून त्यातील ९५ टक्के झाडे जगली आहेत.”प्रवासात अनेक अडथळे, आव्हाने होती. मध्यंतरी हृदयाच्या समस्यांमुळे आजारी झालो. त्यावर मात करुन ’प्रयास’चे काम सुरु ठेवले. सरहद्दीवर जाऊन सैनिक म्हणून लढण्याचे स्वप्न अपूर्ण असले, तरी वृक्षसंवर्धनात हिरवे स्वप्न साकारता येते याचे समाधान आहे,” असे रवी सांगतो.

‘प्रयास’ला पूर्ण वेळ वाहून घेतलेला रवी आज स्वत:चा ‘पेव्हर ब्लॉकनिर्मिती’चा व्यवसाय करतो. शेतकर्‍यांसह फळबाग लागवडीच्या माध्यमातून एक लाख फळझाडेही त्याने लावली आहेत. ‘शेतकरी आणि ‘अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री हाच विषय तो ‘पीएच.डी’साठी संशोधन करत आहे. २०२५ पर्यंत दहा लाख देश वृक्षांची मराठवाडा अन् उर्वरित राज्यात लागवड करण्याचा रवीचा मानस आहे. रवी चौधरीच्या वसुंधरा हिरवी करण्याच्या या आणि एकूणच सर्व स्वप्नांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा..!



-निल कुलकर्णी